पोस्ट कार्ड मॅन ऑफ इंडिया : प्रदीप लोखंडे.

बारा तारखेला असणाऱ्या बोल भिडूच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे एकसे बढकर एक भिडू लोक. नुकतीच तुम्हाला अशाच अफाट भिडू अभिजीत घोरपडेंची गोष्ट सांगितली होती. या यादीतलं दूसरं नाव देखील असच आहे,

या अफाट भिडूचं नाव आहे, प्रदीप लोखंडे.

वाई सारख्या एका छोट्या गावातला मुलगा ते आज जगभरात ग्रामीण भारताचं मार्केटिंग करणारा गुरु. प्रदीप लोखंडेच्या आयुष्याचा हा प्रवास आपल्या पैकी सगळ्यांनाच चकित करणारा आहे.

वाई गावातल एक बेतास बेत परिस्थिती असणारं कुटुंब. चार मुलांच्यातला सर्वात थोरला. अंगात उत्साह आणि उर्मी. शाळा कॉलेजमधलं शिक्षण चालू असतानाचं गॅरेज मेकॅनिकच्या हाताखाली काम करण्यापासून व्यवहारी आयुष्यात शिकण्याची सुरवात केली. प्रत्येक टप्प्यावर आयुष्याने जे अनुभव शिकवले त्याची शिदोरी बनवली. भवितव्य घडवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभ राहण्याचं बळ दिल.

शाळा कॉलेजचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं. पुण्याच्या आयएमडीआर महाविद्यालयात मार्केटिंगच्या डिप्लोमासाठी कच्च्या इंग्रजीमुळे प्रवेश मिळू शकला नाही. पण असंख्य खटपटीमधून तो प्रवेश मिळाला. प्रदीपनी इंग्रजीच्या भीतीला मागे टाकायचं ठरवलं. तिच्याशी दोन हात केले. प्रयत्नांनी अखेर यश मिळवून दिल. इंग्रजीशी मैत्री तर झालीच शिवाय कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन सारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवली.

या नोकरीमध्ये देशभर फिरले. कष्ट करून तिथे प्रगती केली. पण नोकरीच्या उबदार पिंजऱ्यात राहणारं हे व्यक्तिमत्व नव्हत. एक दिवस मोठ्या पगाराच्या नोकरीचे बंध सोडून मोकळ्या आभाळात झेप घेतली. चुकत आणि त्यातून शिकत आपल्या मार्केटिंगच्या व्यवसायाला आकार दिला. जिथ जातील तिथे माणसे जोडली.

या सगळ्या प्रवासात त्यांना अजूनही आपली नेमकी वाट सापडली नव्हती.

थोड्याच दिवसात या क्षेत्राचाही कंटाळा येत होता. शेवटी एका मित्राच्या सल्ल्याने मुंबईला एका लेक्चरला आले. ते व्याख्यान होत गुरुचरण दास यांच. एका मोठ्या कंपनीचे अध्यक्ष आणि भविष्यात पुढे जाऊन सिटी बँकेचे अध्यक्ष झालेले गुरचरण दास हे मार्केटिंगचे महागुरू होते. त्यांनी आपल्या सव्वा तासाच्या फर्ड्या इंग्लिश मधल्या भाषणात ४० मिनिटे ग्रामीण भारतावर दिली.

“उद्याचा भारत, उद्याच मार्केट हे ग्रामीण भारत असणार आहे. माणस खेडी सोडून शहरात जात असली, तरी मार्केटिंग ग्रोथचा उद्याचा चेहरा ग्रामीण भारत हाच असणार आहे.”

गुरुचरण दास यांचे शब्द मनात साठवून प्रदीप लोखंडे पुण्यात परतले. त्यादिवशी त्यांच्या आयुष्याने एक मोठा टर्न घेतला होता. त्यांना आपली वाट, आपलं क्षितीज लक्षात आलं होत. प्रदीप लोखंडेनी आपला चालत असणारा आणि पुढे निश्चितपणे विस्तारणारा तेजीतला व्यवसाय भावाच्या हाती सुपूर्द केला आणि आपल्या नव्या प्रवासाला लागले.

या प्रवासाची दिशा ग्रामीण भारत ही निश्चित झाली होती.

भारतभर पसरलेल्या खेड्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षाना नव्या इंडियाने दुर्लक्ष केलेले होते. मोठमोठ्या कंपन्याना आपले प्रोडक्ट ग्रामीण जनतेपर्यंत पोहचवायचे होते पण त्यांच्या गरजा तिथली नेमकी माहिती नसल्यामुळे ग्रामीण भारत त्यांच्या परिघातून वगळला गेलेला होता.

प्रदीप लोखंडेनी या ग्रामीण भारताची नेमकी माहिती गोळा करायचं ठरवलं.

सुरवात तर महाराष्ट्रातून करायची होती. एका महाराष्ट्रात चाळीस हजार खेडी होती. या सगळ्या खेड्यात हा एकटा माणूस पोहचण शक्य नव्हत. त्यांनी छोट्या पाउलापासून सुरवात करायचं ठरवलं. दहा हजार पेक्षा कमी लोक संख्या असलेली गावं निवडली. अशी सहा हजार गाव निघाली. या गावांपर्यंत पोहचण्याच साधन काय? त्याकाळी इंटरनेट टेलीफोन या चैनीच्या गोष्टी होत्या.

मग उत्तर मिळालं “पत्र” !!!

प्रत्येक दोन तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात पोस्ट ऑफिस असणार. एखादी माध्यमिक शाळा, ग्राम पंचायत या गोष्टी निश्चित असणार. या ठिकाणी काम करणाऱ्या पोस्टमास्तर, शाळा हेडमास्तर, सरपंच या लोकांशी गावकऱ्यांचा दैनंदिन संबंध येत असणार. प्रत्येक गावाच्या ग्रामस्तंभ असणाऱ्या या तीन व्यक्तींना पत्र पाठवायचं प्रदीप लोखंडेनी ठरवलं. या पत्राचा मजकूर एकच होता.

“आपल्या गावात आठवडी बाजार भरतो का? तिथे साधारण किती लोक येतात?”.

सहा सात महिन्यात प्रदीप लोखंडेनी पाठवलेल्या या प्रश्नांची उत्तरे त्यांनी पाठवलेल्या जोडकार्डावरून येऊ लागली. सुरवातीला फक्त तीनशे पत्रांना उत्तरे आली. हा प्रयोग फसतो कि काय असे वाटत होते. पण प्रदीप लोखंडेनी जिद्द सोडली नाही. हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आणि यातूनच रुरल रिलेशन्स या संस्थेचा जन्म झाला.

ते १९९६ चं वर्ष होतं.

गावोगावच्या त्यांच्या ग्रामस्थांनी दिलेली माहिती गोळा करून ती माहिती एका संगणकावर साठवली जाऊ लागली. ती माहिती कंपन्याकडे पास केली जाऊ लागली. एकेका गावाची ओळख करून दिली गेली. उत्पादन गावात कसे वापरले जाईल किंवा ते राबवण्याची प्रक्रिया सांगितली जावू लागली. अशाने गावाचा विकास होण्यास मदत झाली आणि कंपनीलाही नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली.

हे करत असताना सामाजिक जबाबदारीचं भान त्यांनी विसरलं नाही. यातूनच “ग्यान की लायब्ररी” या कन्सेप्टचा जन्म झाला. २०१७ साली त्यांनी उघडलेली ३,६०० ग्रंथालये सुरू आहेत. त्यांना ६,२५,००० पुस्तके दिली गेली आहेत. प्रत्येक ग्रंथालयात १८० च्या आसपास पुस्तके आहेत. याचा फायदा साडेआठ लाख मुलांना होत आहे.

आज ते ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना आपल्या जवळच एक पुस्तक भेट देतात आणि त्या सोबत एक पोस्ट कार्ड. या कार्डावर पत्त्याच्या जागी फक्त “प्रदीप लोखंडे पुणे १३” एवढंच लिहिलेलं असतं.  पुस्तक वाचणारा प्रत्येक माणूस त्यांना उत्तर पाठवतोच.

आजवर त्यांना अशी लाखो पत्रे मिळाली आहेत. या पत्रातून नवनिर्माणाच्या लाखो गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासात प्रत्येक पावलावर नवीन शिकायला मिळालचं, अफाट पैसा ही कमावला. पण सगळ्यात महत्वाचं माणसं जोडली.  असा हा माणूस जोडणारा अवलिया आपणाला भेटण्यासाठी येत आहे, दिनांक १२ मार्च रोजी ठिक ५ वाजता. पत्रकार भवन पुणे येथे. तर भिडू लोक यायला लागतंय. 

53333097 2355925068017781 9051376583973011456 o 1

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.