अहमदनगरची तत्वशुन्य राजकारणाच्या दिशेने होत चाललेली वाटचाल…!

वैभवसंपन्न आणि ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख सर्वत्र आहे. एकेकाळी सहकार चळवळ, मोठी बाजारपेठ, समृध्द शेती, कला, क्रिडा, सांस्कृतिक शैक्षणिक आदींचा वारसा लाभलेलं शहर म्हणून सर्वत्र अहमदनगरचा नावलौकिक होता आहे. अहमदनगरचे कारभारपण अनेक अनुभवी, अभ्यासू, सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिंनी निभावलं आहे. 

मात्र, अलिकडच्या काही राजकीय घटना पाहिल्यास या ऐतिहासिक शहराची वाटचाल तत्वशुन्य राजकारणाच्या दिशेने सुरु आहे असेच म्हणावे लागेल. 

निवडणूकीच्या काही महिने आधी झालेल्या पोटनिवडणूकीत केडगाव येथे दोन शिवसैनिकांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या झाली. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. या हत्येमागे केडगावमधील काँग्रेस नेते भानुदास कोतकर व त्यांचे कुटूंबिय असल्याचा ठपका आहे. या हत्येनंतर शिवसेनेनं नगरसहित महाराष्ट्रभर आंदोलनांच्या माध्यमातून रान पेटविले होते. या हत्येचा फायदा महानगरपालिका व विधानसभा निवडणूकीत कसा घेता येईल याचे त्यावेळी शिवसेनेनं पुरेपुर नियोजन केलं होतं.

या हत्येचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर ही करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली म्हणून आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी एसपी कार्यालयाची तोडफोड व दगडफेक करुन आमदार संग्राम जगताप यांना फिल्मीस्टाईलने पळवून नेलं होतं. त्यावेळी स्थानिक भाजप नेते व भाजप खासदार या सर्वांनी राष्ट्रवादी आणि आमदार जगताप यांच्या गुंडगिरीवर सडकून टिका केली होती. 

त्यानंतर काहीच दिवसात दुसरी घटना घडली कि,

‘भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर गदारोळ उठला होता.’ शिवद्रोही छिंदमच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तीव्र आंदोलनं उभारले. शिवसेनेने शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांच्यावर प्रचंड टिका करुन त्याला पळता भूई थोडी केली होती. 

निवडणूका लागल्या, अर्ज दाखल करायच्या काही तास आधीच तिसरी घटना घडली. ती केडगावमध्ये. 

केडगाव हा काँग्रेसचा अर्थात भानुदास कोतकर यांचा पुर्वापार बालेकिल्ला म्हणून समजला जातो. या केडगामध्ये महानगरपालिकेचे दोन प्रभाग आहेत. या दोन्ही प्रभागात कोतकर सांगे, त्या प्रमाणे निकाल लागे. अशी अवस्था होती. मात्र, अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना दोन्ही प्रभागातील अंतिम झालेले काँग्रेसचे उमेदवार भाजपवाशी झाले. निम्मा प्रचार हाताच्या चिन्हावर केला होता. अर्ज भरल्यानंतर याच उमेदवारांनी त्याच हातांनी भाजपाच्या कमळ चिन्हाचा प्रचार केला. रातोरात सर्वत्र चिन्हांचा बदल केला. 

निवडणूकीच्या काळात अनेक नगरसेवकांनी, विविध पक्षांच्या निष्ठावंत म्हणविणारे नेते आणि पदाधिका-यांनी वेगवेगळ्या पक्षात कशी कोटीच्या कोटी उड्डाने करित पक्षांतर केले. हे नगरकरांनी अनुभवलं आहेच. कोणाला किती दिले, कोणी किती घेतले याच्या चर्चा निवडणूकीत सर्वत्र ऐकायला मिळत होत्या. 

अहमदनगरमध्ये सोधा (सोयरे-धायरे) राजकारणाला फार महत्व आहे. काँग्रेस नेते भानुदास कोतकर यांचे चिरंजीव, भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे साडू, शिवसेना नेते शशिकांत गाडे यांच्या पुतण्याचे साडू माजी महापौर संदिप कोतकर हे सध्या खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

निवडणूकीच्या आधी ज्या भाजपाने काँग्रेस नेते असलेले कोतकर यांच्या खुनी, गुंडगिरी, दादागिरी राजकारणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ला चढविला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूकीत कोतकर समर्थकांना तिकिटे देऊन पक्ष प्रवेश करवून घेतला. इतकचं काय परंतू, शिक्षा भोगत असलेल्या संदिप कोतकर यांच्या फोटोबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा व भाजप नेत्यांचे फोटो फ्लेक्स, बॅनर आणि पत्रकांवर लावून धुमधडाक्यात प्रचार ही केला होता. नेहमीच पार्टी विथ डिफरन्स म्हणविणा-या भाजपच्या मुख्यमंत्र्यासहित पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक भाजप नेत्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मित्र पक्ष असलेल्या शिवसैनिकांच्या हत्या ज्यांनी केल्या त्यांच्याच समर्थकांना भाजपाने उमेदवारी देऊन राजकीय तत्वं गुंडाळून ठेवल्याचे भाजपाने दाखवून दिलं. अनेक जण या निर्णयावर नाराज झाले. मात्र, त्याची फिकीर भाजपाने केली नाही. तसेच शिवद्रोही श्रीपाद छिंदम याविरोधात असंख्य उमेदवार निवडणूकीत उभे राहिले. छिंदमचा विषय महाराष्ट्रभर उठविणा-या सर्वांचा आवाज प्रत्यक्ष निवडणूकीत शांतच राहिला. भाजपाने छिंदमला सहकार्य होईल अशीच भूमिका घेतल्याचा आरोप काहींनी केला.

यापलिकडे एकमताने छिंदमचा विरोध केला नाही. कदाचित छिंदमचा पराभव झाला असता. मात्र, ते कुठल्याच पक्षानं केलं नाही. 

आरोप-प्रत्यारोप होऊन निवडणूका झाल्या, २४ जागा जिंकून सेना प्रथम क्रमांवर राहिली. राष्ट्रवादी १८, भाजप १४ अनुक्रमे दुस-या व तिस-या क्रमांवर राहिले. काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. सेना, राष्ट्रवादी मधील समर्थकांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये एकत्रित येऊन जातीय गणितं लक्षात घेऊन बसपाच्या हाती चिन्हावर निवडणूका लढविल्या. या चार ही जागी बसपाचा हाती विजयी झाला. समाजवादी पार्टी-१, अपक्ष-२ असे एकूण ६८ जागा असलेल्या महानगरपालिकेचे निवडणूकीनंतर संख्याबळ राहिले. 

मात्र, कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यामूळे खरी कसोटी सर्वांचीच होती.

सहा वेळा विजयी झालेले तसेच शिवसेना, अपक्ष, राष्ट्रवादी असा प्रवास करुन आलेले माळीवाड्यातील अनुभवी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना शिवसेनेने महापौर पदाची उमेदवारी दिली. भाजपाने अनुभवी आणि राजकीय चालबाजीत तरबेज असलेले सावेडीचे बाबासाहेब वाकळे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने डमी उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक संपत बारस्कर यांना उमेदवारी दिली. 

सत्ता मिळविण्यासाठी सेना, भाजपा व राष्ट्रवादीने नको त्या विचारांच्या पलिकडे जाऊन मॅजिक फिगर गाठण्यासाठी आणि सत्तेची गणितं जुळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. 

राज्य आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष असला तरी तो काही जिल्हांमध्ये स्थानिक सुभेदारांच्या दावणीला बांधलेला पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप व वडिल आमदार अरुण काका जगताप यांना सर्वाधिकार दिले होते. जगताप पिता-पुत्रांनी सत्ता मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे डाव टाकून बघितले. मात्र, सत्तेचे सुत्र कुठेच जुळत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेची जिरविण्यासाठी मला नाही तर तूला पण नाही याप्रमाणे भाजपला साथ द्यायची ठरविली. विधानसभेची गोळाबेरिज लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सोधाचे (सोयरे-धायरे) राजकारण केले.

भाजपमधून महापौर पदाचे खासदार पुत्र आणि सुनेचा पराभव झाल्यावर खासदार दिलीप गांधी यांनी थोडं बाजुला राहणं पसंद केलं. त्यानंतर भाजपाची सर्व सुत्रे आमदार शिवाजी कर्डिले यांनी हाती घेतली.

पुन्हा सोधा राजकारणाला नगरमध्ये जोर आला. सोधा राजकारणाला जोड म्हणून साम,दाम, दंड भेद नितीचे वापरकर्ते जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांची सकाळी महापौर पदाच्या निवडणूकीसाठी अहमदनगरमध्ये एंट्री झाली.

संख्याबळाने क्रमांक तीनवर आणि फक्त १४ नगरसेवक पाठिशी असताना भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने बाबासाहेब वाकळे यांच्या रुपाने महापौर तर मालन ढोणे यांच्या रुपाने उपमहापौर पद पदरात पाडून घेतले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जातीयवादी पक्षाला सहकार्य नको म्हणून सभात्याग करुन तटस्थ राहणं पसंत केलं.

हेच डॉ.सुजय विखे पाटील काल-परवा सांगत होते की, वडिल आई दुसऱ्या पक्षात असले म्हणून काय झालं. मला कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे. काँग्रेस नगरसेवकांचा सभात्याग किंवा तटस्थ भूमिका हि आधीच ठरलेली स्क्रिप्टेटड नौटंकीच होती. हे समजायला नागरिक काही दुधखुळे राहिले नाहीत. 

आता प्रश्न राहतो की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, पक्षाचे प्रमूख नेते अजित पवार आणि पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षादेश देऊन ही जर राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देत असतील तर आमदार संग्राम जगताप यांचे राजकारण बुऱ्हाणनगर मधील सासऱ्यांच्या दिशेने चालले आहे हे स्पष्ट आहे. कदाचित उद्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि वडिल अरुण काका जगताप हेही भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यावेळी भाजपवाले रेड कार्पेट टाकून जणू काही झालेच नाही, असं म्हणत जगताप पिता-पुत्रांचा जंगी पक्षप्रवेश सोहळा करतील.

मग, कालचे संग्राम जगताप यांच्यावरील आरोप, त्यांची दहशत, दादागिरी भाजपसाठी फायद्याची असेल, हे सत्य आहे. तसेच याआधी खुन, मारामाऱ्या, दरोडे, गुंडिगिरी, दादागिरी या आरोपांचे धनी कोतकर हे समर्थकांकरवी भाजपवाशी झालेलेच आहेत. भाजपाच्या १४ नगरसेवकांमध्ये कोतकर समर्थक नगरसेवकांचा समावेश आहेच. 

संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे केडगाव हत्याकांड झाल्यावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी सर्व बाजूने त्यांच्यावर टिकेची झोड उठविली होती. तेव्हा, अजित पवार यांनी कोल्हापुरात सांगितलं होतं, आमचा संग्राम असं काही करणार नाही तो निष्पाप आहे. पक्ष आणि मी त्याच्या पाठिशी आहे. संकटाच्यावेळी अजित पवार यांनी सोबत करुन ही अजित पवारांचा व्हिप आणि आदेश आमदार संग्राम जगताप यांनी ऐकला नाही. याचा अर्थ राष्ट्रवादीत शरद पवार, अजित पवार आणि पक्षाध्यक्ष यांच्या आदेशाला स्थानिक सुभेदार काही फारशी किंमत देत नसल्याचे सिध्द होतयं. हे पक्ष म्हणून राष्ट्रवादीला फार अवघड दुखणं असेल. 

भाजपचा महापौर निवडूण आल्यावर सर्वाधिक जागांचा जनादेश पाठिशी असलेल्या शिवसेनेला सर्वजण कसे एका बाजूला येऊन खिडिंत पकडतात, याची सहानुभूती मिळविण्याची नामी संधी चालून आली होती. तसेच महापौर निवडणूकीत शिवसेनेच्या बाजूनं मतदान केलं म्हणून शिवद्रोही श्रीपाद छिंदम याला शिवसेना नगरसेवक यांनी चोप दिला होता. या सेना स्टाईलने शिवद्रोही छिंदमला धडा शिकविल्याने सेनेचे वजन वाढलं होतं.

मात्र, काही मिनिटांतच छिंदम यांनी एक अॅडिओ क्लिप माध्यमांसमोर आणली. या अॅडिओ क्लिपमध्ये महापौर पदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी शिवद्रोही श्रीपाद छिंदमला पाठिब्यांसाठी फोन करुन मतदान करण्याचं आवाहन आणि विनंती केल्याचे चव्हाट्यावर आलं आहे, एका बाजूला छिंदम शिवद्रोही म्हणून राजकारण करायचं आणि महापौर निवडणूकीत त्याच शिवद्रोही छिंदमचं मत मागायचं. त्यातून शिवसेनेचा सुध्दा खरा चेहरा नगरकरांसमोर उघड झाला आहे. 

नगरमध्ये भाजपाचा महापौर झालाच पाहिजे असा आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तोच आदेश शिरसावंद्य मानून साम, दाम, दंड भेद नितिचा वापर करुन शेवटी भाजपाचा महापौर विजयी झाला आहे. आता खरी उत्सुकता ही आहे की, भाजपाचा महापौर त्या बदल्यात केडगावच्या पाहुण्यांची सुटकेसाठी हातभार या सेटलमेंटची.  जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले केडगावचे पाहुणे आणि आमदार कर्डिले यांची खुनाच्या आरोपात फरार असलेली कन्या उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासाठी काय आणि कसा लाभ मिळणार. त्यातून भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात आणखी बाहेर येतील हे त्रिवार सत्य आहे.    

भाजपाने राष्ट्रवादी,काँग्रेस बसपा आणि अपक्ष नगरसेवकांना किती दिले, कसे दिले याच्या चर्चा दिवसभर ऐकायला मिळत आहेत. काल परवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आपलेच नगर सेवक कसे लाचार होतात. हेही नगरकरांनी अनुभवलं आहे.

आता मुद्दा एकच राहतो, महापौर भाजपाचा करा, शहराच्या विकासासाठी ३०० कोटी देतो असं मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे म्हणाले होते. आता ३०० कोटी कुठल्या रुपाने शहराला येताऐत याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

शेवटी, सत्तेसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि बसपा हे सर्वजण कसे तत्वहिन राजकीय माळेचे मनी आहेत, हे मागील काही घटनांमधून पुन्हा पुन्हा सिध्द झालं आहे. तेव्हा, नगरकर या सर्व घटनांमधून बोध घेऊन राजकारणाची नवी दिशा शहराला देतील काय हाच खरा प्रश्न शिल्लक राहिला आहे. 

नवीन पवार (राजकीय अभ्यासक. पुणे)

9270652834

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.