दलाई लामांची निवड कशी केली जाते..?

दलाई लामा.

जगभरात शांततेचा संदेश देत फिरणारे तिबेटीयन धर्मगुरू.

दलाई लामांना आपण सगळेच त्यांच्या चेहऱ्याने ओळखत असतो. पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असेल की दलाई लामा ही कुणी व्यक्ती नसून ‘लामा’ हे एक पद आहे आणि दलाई लामांच्या निवडीसाठी काहीएक निवडप्रक्रिया देखील आहे. आज ‘माहितीच्या अधिकारात’ जाणून घेऊयात दलाई लामा नेमके निवडले कसे जातात आणि त्यांच्या घडणीची प्रक्रिया काय असते याविषयी.

पुनर्जन्माच्या आधारावर निवड

तिबेटी भाषेत लामांना ‘ब्ला-मा’ असं म्हंटल जातं. या तिबेटी शब्दाचा अर्थ सर्वात श्रेष्ठ व्यक्ती असा होतो. लामांची निवड पुनर्जन्माच्या आधारावर केली जाते. तिबेटी परंपरानुसार अशी मान्यता आहे की जेव्हा कधी लामांच्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यानंतर ते दुसऱ्या कुठल्यातरी मनुष्यजीवाच्या रुपात पुनर्जन्म घेतात. त्यानंतर या मुलाचा शोध घेतला जातो आणि एकदा का तो सापडला की त्याला लामा म्हणून नियुक्त केलं जातं. या प्रक्रियेत कधी-कधी अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो.

तिबेटचे सध्याचे दलाई लामा ‘तेनजीन ग्यात्सो’ यांच्या शोधासाठी जवळपास ४ वर्षांचा अवधी लागला होता. १९३५ सालचा जन्म असलेले तेनजीन ग्यात्सो हे १९३७ सालापासून दलाई लामा आहेत.

दलाई लामांचा शोध

तिबेटीयन मान्यतेनुसार दलाई लामा बदलत नाहीत, ते कायमस्वरूपी एकंच असतात. ते ज्या व्यक्तीच्या रुपात जन्म घेतात ती व्यक्ती फक्त बदलत जाते. लामाचा शोध घेण्याची जबाबदारी तिबेटी सरकारवर असते. दलाई लामा चिरंजीव असून ते तिबेटचे संरक्षक असतात, अशी देखील मान्यता आहे.

नवीन दलाई लामांच्या शोधाच्या प्रक्रियेची सुरुवात उच्च लामा यांना दिसणाऱ्या दृश्यावरून आणि स्वप्नांवरून होते. एका प्रथेनुसार आधीच्या दलाई लामांच्या मृत्युनंतर ज्यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी त्यांच्या चितेवरून निघणाऱ्या धुरामध्ये त्यांच्या पुनर्जन्माचे संकेत असतात.

dm2
दलाई लामा

संकेत मिळाल्यानंतर उच्च लामा तिबेटची पवित्र नदी मानली जाणाऱ्या ला-तसोच्या किनाऱ्यावर ध्यानधारणेस बसतात. या ध्यानधारणेदरम्यान त्यांना पुढील शोध कुठल्या दिशेने करायचा याचे संकेत मिळतात. ला-तसोच्या किनाऱ्यावरच ध्यानास बसण्यामागे देखील एक कथा आहे. या कथेनुसार या पवित्र नदीच्या आत्म्याने प्रथम दलाई लामांना वचन दिलं होतं की ही नदी कायमच दलाई लामांच्या वंशजांचा शोध घेण्यात मदत करेल.

प्राप्त संकेतांनुसार शोध घेतल्यावर ज्यावेळी दलाई लामांनी ज्या मुलाच्या रुपात जन्म घेतलाय तो सापडतो त्यावेळी त्याला अनेक खडतर परीक्षांचा सामोरे जायला लागतं. सापडलेला मुलगाच दलाई लामा आहे ना, याची खात्री करण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना तो यशस्वीपणे सामोरे गेल्यानंतर तिबेटी सरकार आणि जनतेला त्याविषयी माहिती दिली जाते.

लामा म्हणून नियुक्तीसाठी शोधण्यात आलेल्या मुलाला बौद्ध धर्माची शिकवण दिली जाते. बौद्ध धर्माचे आणि तिबेटचे देखील नेतृत्व करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्यांना तयार करण्यात येते. विश्वशांतीसाठी अविरत काम करणं आणि जगाला मानवतेचा संदेश देऊन हे जग मनुष्य जातीसाठी अधिक चांगलं ठिकाण होईल यासाठी दलाई लामा पुढे आयुष्यभर काम करतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.