फक्त धोनीच्या आग्रहामुळं द्रविड टी२० मॅच खेळायला उतरला होता…

साल होतं २०११. वर्ल्डकप जिंकलेली टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान अशा फॉर्ममधल्या संघांना धूळ चारत भारतानं वर्ल्डकप मारला होता. साहजिकच भारत इंग्लंडचा पण बाजार उठवणार असंच सगळ्यांना वाटत होतं.

२००७ च्या दौऱ्यावेळी भारतानं इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची किमया साधली होती. तेव्हा संघाचा कॅप्टन होता राहुल द्रविड. तर २०११ मध्ये ही धुरा होती, महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यांवर. दौऱ्याची सुरुवात झाली, ती टेस्ट मॅचेसनं. इंग्लंडनं भारताच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवलं.

पहिली टेस्ट आपण हरलो, दुसरी टेस्ट तर ३१९ रनांनी हरलो. तिसऱ्या टेस्टमध्ये भारत कमबॅक करेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण इंग्लंडनं आपला बाजार उठवला. तिसरी टेस्ट भारत हरला, एक इनिंग आणि २४२ रन्सनं. लाज राखायला का होईना, पण चौथी आणि शेवटची टेस्ट तरी भारत जिंकेल असं वाटलं. पण तिथंही अपेक्षाभंगच हाती आला. चारही टेस्ट मॅचेस गमावल्यानंतर, भारताचा आत्मविश्वास पार खच्ची झाला होता.

इंग्लंडमधल्या हिरव्यागार पिचेसवर, भारताचे बॅटर्स अक्षरश: लेझीम खेळले होते. अपवाद फक्त एकच होता.. राहुल शरद द्रविड. भारतीय क्रिकेटची भिंत असणाऱ्या द्रविडनं एकट्यानं खिंड लढवायचं काम केलं होतं. आपली मान खाली गेलेल्या त्या टेस्ट सिरीजमध्ये द्रविडच्या नावापुढं रन्स जमा होते, ४६१. जिथं बाकीचे बॅटर्स बॉल बॅटला लावण्यात अपयशी ठरत होते, तिथं द्रविडनं तीन शतकं बोर्डावर चढवली होती.

कसोटी मालिका झाल्यानंतर, टी२० सामना होता. टेस्ट क्रिकेटमध्येच भारताची फेफे उडाली होती, त्यामुळं टी२० मध्ये भारत तग धरणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं. आता इंग्लिश बॉलर्सच्या तिखट माऱ्यासमोर एकच भारतीय बॅटर टिकला होता, तो म्हणजे राहुल द्रविड. पण टी२० मध्ये मात्र द्रविड खेळत नव्हता.

त्यामागं एक कारणही होतं. २००७ चा वनडे वर्ल्डकप भारत फार वाईट पद्धतीनं हरला. सचिन-गांगुली-द्रविड ही तिकडी असूनही भारताची डाळ काही शिजली नाही. त्यानंतर झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये मात्र भारतानं पद्धतशीर बाजी मारली. त्या संघात भारताची ही त्रिमूर्ती नव्हती. कारण या तिघांनी एकत्र येऊन ठरवलं होतं, की आपल्याकडे क्रिकेटची अजून काही वर्ष बाकी आहेत. आपण भारताला २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतो. तंदुरुस्ती जपण्यासाठी यांनी आंतरराष्ट्रीय टी२० खेळणार नाही असा निर्णय घेतला होता.

साहजिकच इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव टी२० साठी द्रविड उपलब्ध होणार नाही, हेच पक्कं होतं. पण कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीची इच्छा होती, की टीमनं सात बॅटर्ससह मैदानात उतरावं, आणि त्यातला एक बॅटर राहुल द्रविड असावा. त्यानं आणि व्यवस्थापनानं द्रविडला विनंती केली, की तू ही टी२० खेळच.

स्वतःचे रेकॉर्ड्स, स्वतःची स्वप्नं टीमसाठी कायम बाजूला ठेवत आलेला द्रविड नाही म्हण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानं होकार दिला आणि आपल्या क्रिकेट करिअरमधली एकमेव टी२० खेळला.

आता द्रविडचा डिफेन्स आठवून तुम्हाला असं वाटत असेल, की द्रविड टी२० मध्ये काय खेळणार? तर जरा थांबा. भारताची पहिली बॅटिंग होती. ओपनिंग जोडी फुटली, पाचव्याच ओव्हरमध्ये. द्रविड क्रीझवर आला, जोडीला होता अजिंक्य रहाणे. या दोघांनी ‘टी२० मॅच’मध्ये भारताचा डाव सावरला.

डावातली अकरावी ओव्हर. द्रविडनं १६ बॉलमध्ये १८ रन्स केले होते. समित पटेल बॉलिंग करत होता, द्रविडनं ओव्हरच्या चौथ्या बॉलवर कडकडीत छकडा हाणला. पाचव्या बॉलवरही परत सिक्स आणि सहावा बॉलही स्टँड्समध्ये. थोडक्यात काय, तर भारत सोडा इंग्लंडनंही अपेक्षा केली नव्हती, ते त्या मॅचमध्ये घडलं. पुढे जाऊन भारत ती मॅच हारला, पण द्रविडची सलग तीन सिक्सने नटलेली २१ बॉलमधली ३१ रन्सची इनिंग चाहत्यांच्या कायम लक्षात राहिली.

आणखी एक गोष्ट चाहते विसरणार नाही, ती म्हणजे स्वतःचा स्वार्थ बाजूला सारत आपल्या कॅप्टनसाठी आणि आपल्या देशासाठी मैदानात उतरलेला राहुल शरद द्रविड!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.