राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं.

नाईनटीज किड्स हा प्रकार खूप विचित्र आहे. आम्हाला आठवणी मध्ये रमायला आवडते. आमच्या मते खरं क्रिकेट त्याकाळात खेळल गेलं. आताच क्रिकेट आम्ही बघतो, विराट कोहली आम्हाला पण आवडतो पण गांगुली, सेहवाग-सचिन, रिकी पॉन्टिंग यांची बातच निराळी होती. असाच एक किस्सा आमच्या वेळच्या क्रिकेटचा.

भारत पाकिस्तानच्या मॅचेस आज सुद्धा रंगतदार होतात पण त्याकाळात ते एखाद युद्ध लढल्याप्रमाणे खेळल जात असे.

२००४ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा इंग्लंडमध्ये होत होती. तेव्हा या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल जात होतं. नुकताच झालेल्या वर्ल्डकप फायनल पर्यंत गेलेली गांगुलीची टीम फेव्हरेट होती. पण आपला गट पाकिस्तान बरोबर होता. इंझमामच्या नेतृत्वाखाली असलेली पाक टीम तगडी होती. शोएब अख्तर विरुद्ध सेहवाग युद्ध पाहायला मिळणार म्हणून जनता खूष होती.

पण बर्मिंगहॅममध्ये झालेल्या मॅचमध्ये भलतच घडल. सचिन शिवाय खेळणारी भारतीय टीम अवघ्या २०० धावांमध्ये आटोपली. गांगुली तर पहिल्याच ओव्हर मध्ये डक वर आउट झाला होता. शोएब अख्तर आणि नावेद उल हसनने ४-४ विकेट घेऊन भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले.

फक्त द्रविड एकटाच या फास्ट बॉलिंग अटॅक पुढे टिकू शकला. त्याने ६७ धावा बनवल्या होत्या.

भारतीय बॉलिंग एवढी मजबूत नव्हती. पाकिस्तानने तीन विकेट राखून भारतावर विजय मिळवला. आपण सिरीजमधून बाहेर फेकलो गेलो होतो.

मच संपली. स्टेडियममधल्या पाकिस्तानी फॅन्सनी मैदान डोक्यावर घेतलं होतं. प्रेझेन्टेशन सेरेमनी सुरु झाला. आपले खेळाडू खांदे पाडून उभे होते. अचानक द्रविड पाशी एक पाकिस्तानी प्लेअर आला आणि  तो त्याच्या बटिंग संदर्भात हेल्प मागू लागला. द्रविड म्हणाला आपण नंतर बोलू.

तो प्लेअर म्हणजे युनुस खान होता. त्याला पाकिस्तानी टीममध्ये येऊन दोन तीन वर्षे झाली होती पण म्हणावं तशी चमकदार कामगिरी होत नव्हती.

या सिरीजमध्ये तर तो राखीव बेंचवरच होता. खरंतर युनुस बराच मेहनती होता, शिकायची आवड होती. त्याने अनेकांकडून आपल्या फलंदाजी बद्दल सल्ला घेतला होता पण खूप मोठा फरक पडला नव्हता.

युनुस खानने या दौऱ्या आधीच ठरवल होतं की भारता बरोबर च्या मच वेळी द्रविड कडून टिप्स घ्यायच्या. पण भारत मच हरल्यामुळे द्रविडचा मूड प्रचंड खराब होता. युनुसला वाटले आता आपला चान्स गेला. कधी नव्हे ते पाकिस्तान जिंकल्याबद्दल त्याला थोडस वाईट वाटून गेलं.

मॅचनंतरच्या रात्री जेवण झाल्यावर युनुस आपल्या हॉटेलरूममध्ये बसला होता. अचानक त्याच्या रूमची टकटक झाली. दार उघडून बघतोय तर बाहेर राहुल द्रविड उभा होता.   

युनुस खानला धक्का बसला. द्रविड सारखा सिनियर भारतीय प्लेअर आपल्यासारख्या ज्युनियर पाकिस्तानी प्लेअरला मदत करण्यासाठी चार मजले उतरून त्याच्या रूममध्ये येतो ही एक मोठी गोष्ट होती. युनुस खानने त्याला आपल्या शंका विचारल्या. राहुल द्रविडने सगळ्याची उत्तरे दिली. काही महत्वाच्या टिप्स देखील दिल्या.

अवघ्या दहा पंधरा मिनिटाची ती भेट. मात्र युनुस खान म्हणतो की त्यानंतर माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं.

एखाद्या आदर्श शिष्याप्रमाणे युनुस खानने राहुलने सांगितलेल्या टिप्स प्रत्यक्षात उतरवल्या. २००४ नंतरचा युनुस खान हा वेगळाच होता. त्याच टेम्परामेंट, त्याची शैली, त्याच टेक्निक एकदम सुधारलं. त्याने पाकिस्तानला अनेक कसोटी मचेस जिंकून दिले. त्याने अनेक विक्रम मोडले. त्यांच्या सवोत्तम फलंदाजामध्ये त्याचा समावेश होतो.

कसोटीत दहा हजारपेक्षा जास्त धावा बनवणारा तो एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे आणि या सर्वाच श्रेय तो आजही त्या राहुल द्रविडच्या भेटीला देतो.

त्याकाळात भारत पाकिस्तानमध्ये सामने चुरशीने खेळले गेले मात्र तितकाच भाईचारा देखील सांभाळला गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.