भारतीय साहित्यातील पहिली ‘लेस्बियन कथा’ लिहिणारी लेखिका !!!

भारतीय साहित्य विश्वात ‘इस्मत आपा’ नावाने सुपरिचित असणाऱ्या उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांची आज पुण्यतिथी.

उत्तर प्रदेशातील बदायुं येथील एका मुस्लीम कुटुंबात इस्मत अपांचा जन्म झाला होता. मोठे भाऊ मिर्झा अजीम बेगम यांच्याकडून प्रेरणा घेत खूप लहानपणापासूनच त्यांनी लिहायला सुरुवात केली होती.  महिला स्वातंत्र्य आणि खुल्या विचारांना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या इस्मत आपांना त्यांच्या लिखाणासाठी खूप प्रसिद्धी देखील मिळाली आणि अनेक वादांचा सामना देखील करावा लागला.

ismat

मुस्लीम मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इस्मत यांचा संघर्ष घरातूनच सुरु झाला होता. त्यावेळच्या सामाजिक परंपरेनुसार वयाच्या १५ व्या वर्षीच कुटुंबीयांनी त्यांचं लग्न ठरवलं होतं पण इस्मत यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी या निर्णयाचा विरोध केला.

कुटुंबियांची समजूत घातल्यानंतर त्यांनी लखनऊमधील इसाबेला थोबर्न कॉलेजमधून बी.ए.पूर्ण केलं. त्यानंतर पुढे त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून शिक्षणशास्त्रातील पदवी देखील मिळवली. त्यावेळी २ पदवी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय मुस्लीम पहिला ठरल्या होत्या. शिक्षण सुरु असताना त्यांच लिखाण देखील सुरूच होतं.

१९३० सालापर्यंत त्या प्रागतिक विचारांच्या लेखकांच्या संघटनेशी जोडल्या गेल्या होत्या. इथेच त्यांच्या लेखणीला धार यायला लागली. १९३९ साली त्यांची पहिली कथा कथा ‘साकी’ या त्याकाळच्या प्रतिष्ठीत मासिकात प्रकाशित झाली होती.

‘लिहाफ’ कथेने मिळाली ओळख

१९४२ साली इस्मत आपांनी ‘लिहाफ’ नावाची कथा लिहली. लाहोरमधून निघणाऱ्या ‘आदाब-ए-लतीफ’ या मासिकात ही कथा सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि एकच हल्लकल्लोळ माजला. कारण ही कथा दोन महिलांमधील समलैंगिक संबंधांवर आधारित होती. एका धनाढ्य जमीनदाराची बायको आणि तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या दरम्यान फुलत जाणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट होती.

१९४२ साली २ महिलांमधील समलैंगिक संबंधांवर लिहिणं ही किती आव्हानात्मक गोष्ट असली पाहिजे याचा अंदाज आपल्याला यावरून यावा की आज २०१८ मध्ये देखील या विषयावर बोलताना आपली जीभ चाचपडते. अनेक जणांना खुलेपणाने या गोष्टीवर स्पष्टपणे काहीएक भूमिका घेता येत नाही. इस्मत आपांनी १९४२ साली हे आव्हान अगदी लीलया पेललं होतं आणि त्यासाठी पुराणमतवाद्यांच्या रोषाचा देखील खंबीरपणे सामना केला होता.

Screenshot 1 1

‘लिहाफ’ प्रसिद्ध झाली तीच सोबत वादविवाद घेऊन. या कथेसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करायला लागला. आपल्या साहित्यातून अश्लीलता पसरवित असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. इस्मत यांनी माफी मागावी यासाठी निदर्शने झाली. पण इस्मत आपांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि २ महिलांमधील समलैंगिक संबंधांचं  निग्रहाने समर्थन केलं.

आजघडीला ‘लिहाफ’ला उर्दू साहित्यात अतिशय मानाचं स्थान असलं तरी त्यावेळी मात्र इस्मत आपांवर अश्लीलतेचा आरोप ठेवत काही लोकांनी ‘लिहाफ’ या कथेवर बंदी आणण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. पण न्यायालयीन लढाईत इस्मत आपांचा विजय झाला आणि त्यांचे इरादे देखील बुलंद झाले.

लेडी चंगेज खान

इस्मत आपांनी पुढे आपल्या कथांमधून महिलांशी संबंधित अनेक मुद्यांना हात घातला. महिलांच्या विषयांना अतिशय खुलेपणाने आणि निर्भीडपणे मांडण्याची  सुरुवात करण्याचं  श्रेय निर्विवादपणे त्यांच्याकडे जातं. त्यांच्या अशाच प्रकारच्या लिखाणामुळेच उर्दू साहित्यात त्यांचं नाव अजरामर झालं. त्या इतक्या निर्भीडपणे लिहत होत्या की उर्दू लेखिका कुरर्तुल हैदर यांनी त्यांना उर्दू साहित्यातील ‘लेडी चंगेज खान’ असं नाव दिलं.

उर्दू साहित्यात कथा लेखनाचे ४ स्तंभ मानले जातात. याच ४ स्तंभांनी उर्दू कथेला नव्या  उंचीवर  नेऊन ठेवलं. त्या ४ स्तंभांपैकी एकमेव महिला नाव म्हणजे इस्मत आपा होत. बाकी ३ नावांमध्ये सआदत हसन मंटो, कृष्ण चंदर आणि राजेंदर सिंह बेदी यांचा समावेश होतो.

इस्मत आपांच्या उर्दू साहित्यातील योगदानाचा भारत सरकारने पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरव केला होता. २४ ऑक्टोबर १९९१ रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.