त्यांनी ३०० बॉम्बने ब्रिटीश आर्मी उडवायची योजना बनवली होती !

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सशस्त्र क्रांती आंदोलनाचा देखील अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. मातृभूमीसाठी शहीद झालेल्या अशाच काही क्रांतीकारकांपैकी एक नाव म्हणजे विष्णू गणेश पिंगळे. त्यांचा आज शहीद दिवस.

कोण होते विष्णू गणेश पिंगळे…?

२ जानेवारी १८८८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ढमढेरे इथे  जन्मलेल्या  विष्णू गणेश पिंगळे यांना १९१५ साली आजच्याच दिवशी आपल्या इतर ७ साथीदारांसह साथीदारांसह लाहोर सेन्ट्रल जेलमध्ये फासावर लटकावण्यात आलं होतं.

तळेगाव ढमढेरे येथील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या विष्णू गणेश पिंगळे यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण भारतात पूर्ण केलं होतं. दरम्यानच्या काळात आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या क्रांतिकारी चळवळीमुळे ते प्रभावित झाले आणि ते भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडले गेले.

pingle 1

भारतातलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पण तिथे देखील त्यांच्यातला देशभक्त जागा होता. तिथे गेल्यानंतर त्यांचा  संपर्क लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. खानखोजे, भाई कर्तारसिंग यांच्याशी आला. जे की विदेशात राहून भारताचा स्वातंत्र्यलढ्याला मदत करत होते. या सगळ्यांच्याच संपर्कात पिंगळे हे ‘गदर पार्टी’चे सक्रीय सदस्य बनले.

‘गदर पार्टी’ सोबत काम करताना त्यांनी आपल्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग बॉम्ब बनविण्यासाठी करायला सुरुवात केली. ‘गदर पार्टी’च्या क्रांतिकारी कृत्यांमध्ये त्यांनी बनवलेल्या बॉम्बचाच उपयोग केला जात असे. असं सांगितलं जातं की जेव्हा भारतीय क्रांतीकारकांना बंदूक मिळवणं दुरापास्त होतं, त्यावेळी विष्णू पिंगळे यांनी ३०० बॉम्ब बनवले होते.

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी पंजाब प्रांतात कार्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान भारतीय सैनिकांमध्ये बंड घडवून आणण्यची योजना गदर पार्टीने बनवली होती. त्यासाठी ‘गदर पार्टी’ कडून प्रकाशित केले जाणारे दैनिक आणि वेगवेगळी पत्रके गुप्तपणे ब्रिटीश सैन्यात काम करणाऱ्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहचवून, त्यांच्यात ब्रिटीश सत्तेविरोधात विद्रोहाची भावना तयार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

भारतीय सैन्यामध्ये विद्रोह घडवून आणून मग देशभरात सशस्त्र क्रांतीचा नारा बुलंद करण्याची ही योजना मात्र फंदफितुरीमुळे यशस्वी होऊ शकली नाही. ब्रिटिशांनी क्रांतीकारकांना ताब्यात घेतलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. मेरठ येथे पोलिसांच्या तावडीत सापडले त्यावेळी पिंगळे त्यांच्याकडे १८ बॉम्ब मिळाले होते.

त्यानंतर ब्रिटिशांनी १६ नोव्हेंबर १९१५ रोजी लाहोर सेन्ट्रल जेलमध्ये पिंगळे यांच्यासह कर्तारसिंग सराबा, सरदार बक्षीससिंह, सरदार जगनसिंह, सरदार सुनारायणसिंह, सरदार बुटासिंह, सरदार ईश्वरसिंह, सरदार हरनामसिंह या ७ जणांना देखील फासावर चढवलं.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.