शाहरुख सिर्फ दो मिनिट..

राजू राहिकवार त्याचं नाव. खरं तर दुर्गा राहिकवार मूळ नाव. पण तो दिसतो शाहरुख सारखा. अगदी शाहरुखच्या फौजी मालिकेपासून लोक राजूला सांगायचे. शाहरुख तुझ्यासारखा दिसतो. नागपूरमध्ये राहणाऱ्या राजूला हळू हळू कळत गेलं की आता शाहरुख आपल्यासारखा नाही आपण शाहरुखसारखे दिसतो. कारण शाहरुखचा दिवाना हिट झाला होता. राजू आता ऐसी दिवानगी गाण्यावर गावात डान्स करून प्रसिध्द होऊ लागला होता. खऱ्या शाहरुखची लोकप्रियता हळू हळू एवढी वाढत गेली की भाजीपाला विकणारे पण राजूच्या आईकडून पैसे घेत नसत. शाहरुखची आई ही तिची ओळख झाली होती गावात. एक दिवस राजूला नागपूरच्या एका कार्यक्रमात नाचून झाल्यावर ऑटोग्राफ मागितला कुणीतरी. त्याला ऑटोग्राफ ही काय भानगड असते हे सुद्धा माहित नव्हतं. पण शाहरुख खान सारखं दिसण्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं होतं. राजू शाहरुख सारखं नाव कमवायला मुंबईत आला. संघर्ष केला. छोटे मोठे स्टेज शो वगैरे चालू होतं. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी मन्नत बंगल्यासमोर उभं राहणं, शाहरुख आपल्याकडे बघून अरे ये तो मेरे जैसा दिखता है असं म्हणून आपल्याला घरात बोलवून घेईल वगैरे स्वप्नं बघणं. असं काही घडलं नाही.

एक स्टेज शो कंपनी परदेशात शो करायची. सगळे डुप्लिकेट कलाकार घेऊन. संजय दत्त, सलमान, अमीर सगळे डुप्लिकेट. त्यात आता शाहरुख बनला राजू. आयुष्य बदलून गेलं. पन्नास साठ देशात तो शाहरुखसारखं नाचलाय. लोकांनी त्याचं कौतुक केलंय. एरव्ही धारावी पासून सगळीकडे तो शाहरुख बनून जातच असतो. जिथे खरा शाहरुख खान या जन्मात जाणार नाही तिथे राजू जातो आणि लोकांना खोटा का होईना आनंद देतो. पैसे कमवतो. या पैशावर मुंबईत स्वतःचं घर घेऊन संसार थाटला राजूने. एक मुलगी झाली तिचं नाव ठेवलं मन्नत. मन्नत शाळेत जाऊ लागली आणि प्रत्येकाला सांगू लागली माझे वडील शाहरुख खान आहेत. तिच्यासाठी राजूच शाहरुख खान होता. पण मित्रांनी फोटो दाखवायला सांगितला. फोटो बघून मुलांनी ओळखलं हा तर डुप्लिकेट शाहरुख. मुलीने घरी येऊन बापाला विचारलं, तुम्ही डुप्लिकेट आहात? त्या क्षणी राजूला काय वाटलं असेल माहित नाही. पण सत्य हे होतं की शाहरुखचा डुप्लिकेट असणं हेच त्याचं जगण्याचं साधन होतं.

राजू उत्तम पैसे कमवत होता. सगळं बरं चालल होतं. शाहरुखचा वाढदिवस स्वतःचा असल्यासारखा एक दिवस आधी साजरा करणे, सतत शाहरुखच्या जवळच्या लोकांचा नंबर मिळवून त्याला भेटायचा प्रयत्न करणे, शाहरुख जिथे शूटिंग करत असेल तिथे जाऊन भेटीची वाट बघणे. दोन मिनिट भेटायची इच्छा व्यक्त करने. पण शाहरुखने त्याला कधी भेट दिली नाही. आणि राजूने काही आपल्या दैवताला भेटायचा प्रयत्न थांबवला नाही. पुढे मित्रांनी सांगितलं आपण तुझ्या डुप्लिकेट असण्याच्या प्रवासावर documentary करू. ठरलं. पहिल्यांदा शाहरुख असल्याची खात्री कधी झाली, शाहरुखचा सिनेमा कुठे कितीवेळा पाहिला ते मुंबई पर्यंतचा प्रवास documentary मध्ये आला. राजू कसा शाहरुख खानचा वेडा fan आहे आणि त्याला भेटायला त्याने काय केलं हे सगळं त्यात चित्रित केलं. पण एवढ्याने राजू समाधानी नव्हता. त्याला खरा शाहरुख त्या documentary मध्ये पाहिजे होता. शेवटी फक्त दोन मिनीटांसाठी. ज्यात तो राजूला ओळखतो. मग पुन्हा शाहरुखला भेटायला संघर्ष सुरु झाला. योगायोगाने संजय दत्तच्या डुप्लिकेटने काहीतरी लिंक लावून दिली म्हणे. शाहरुखच्या लोकांनी काही मेसेजला उत्तरं पण दिली. मग माय नेम इज खान सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी राजू आणि त्याचे मित्र थेट जाऊन धडकले. पण त्यांना आत जाऊ दिलं गेलं नाही. गेटवरच त्यांच्या documentary ची सीडी घेऊन टाकली गार्डने. आत जाऊन दिली. पुढे राजूला एका जाहिरातीसाठी शाहरुख सोबत काम करायची संधी मिळाली. सोबत म्हणजे जिथे नटाचा चेहरा दाखवायची गरज नसते तिथे बॉडी डबल वापरतात. डमी म्हणतो आपण त्यांना. तसा डमी होता राजू त्या जाहिरातीत. त्याचं शूटिंग झालं. शाहरुख आला. घाईत. तेवढ्यात राजूने documentary चा विषय काढला. म्हणाला सर सिर्फ दो मिनिट. शाहरुख म्हणाला, हो. पाहिली. पण मी सध्या बिझी आहे. पुढच्या आठवड्यात भेटू. तो पुढचा आठवडा काही आलाच नाही. त्यानंतर काही वर्षांनी आली ती शाहरुख खानची फिल्म. fan. राजूला सगळ्या मित्रांनी fan पाहून सांगितलं की तुझीच गोष्ट आहे. documentary मधली प्रत्येक गोष्ट सिनेमात आहे. राजू संतापला नाही. fan च्या शोला गेला. सत्तर ऐंशी तिकीट काढली. येणाऱ्या लोकांना फुकट वाटली. शेवटी तो शाहरुखचा सच्चा fan. त्याने सिनेमा पण पाहिला. खूपशा गोष्टी त्याच्याच होत्या. पण त्याला दुखः एकाच गोष्टीचं वाटलं की सिनेमात शाहरुख सारखा दिसणारा त्याचा fan चक्क व्हिलन दाखवला होता. आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो.

राजूच्या गोष्टीचा शेवट असा झाला. तो अजूनही डुप्लिकेट म्हणून काम करत असेलच. तो अजूनही कट्टर fan असेलच. कदाचित अजूनही कुठे शाहरुख दिसला तर तो म्हणेल, शाहरुख, सिर्फ दो मिनिट…                                 

Leave A Reply

Your email address will not be published.