दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.
बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही.
महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, किर्तनकार बाळासाहेब भारदे अशी त्यांची कित्येक ओळख सांगता येईल.
अहमदनगर जवळच्या शेवगाव मध्ये बाळासाहेब भारदेंचा जन्म झाला. त्यांच मूळ नाव त्र्यंबक शिवराम भारदे. गांधीच्या विचारांनी भारावून जायचा तो काळ होता. बाळासाहेब नगर जिल्ह्यात काम करणारे एक छोटे कार्यकर्ते होते. १९३६ साली अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसने सत्याग्रहाचा विचार तळागाळात पोहचावं म्हणून संघशक्ती हे साप्ताहिक सुरु केलं . पुढे त्याची जबाबदारी भारदेंवर सोपवण्यात आली. बाळासाहेबांनी जनतेची गाऱ्हाणी अत्यंत प्रखरपणे मांडली. त्यांच्या लिखाणातून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती यायची.
अत्यंत साधेपणा हे बाळासाहेबांचे वैशिठ्य होते. १९५७ साली जेव्हा यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात बाळासाहेब भारदेंचा समावेश सहकारमंत्री म्हणून केला.
महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री म्हणून झालेल्या निवडीची अनपेक्षित बातमी बाळासाहेबांना रेडीओवर कळाली. त्यांनी लगेच मुंबईला जाणाऱ्या एसटीचं तिकीट काढलं. आज नगरसेवकपद मिळाल्यावर सरकारी इतमामाशिवाय घराबाहेर न पडणाऱ्या अनेकांना पाहिल्यावर त्याकाळातल्या गांधीवादी नेत्यांच्या त्यागाची कल्पना येते.
पूर्ण वेळ राजकारणी असून त्यांनी कीर्तन करणे कधी चुकवले नाही. ज्ञानेश्वरीचं सार जाणलं असल्यामुळचं की काय त्यांच्या जिभेवर कायम मिठास असायची. प्रचारातलं भाषण असो वा कीर्तन ते कायम नर्मविनोदीशैलीत जिवाभावाच्या गोष्टी सांगायचे.
त्यांच्या हजरजबाबी पणाचा एक किस्सा ना.श्री. कुलकर्णी यांनी आपल्या ‘मी एक प्रशासक’ या पुस्तकात लिहून ठेवलाय.
बाळासाहेब भारदे सहकारमंत्री असताना नाशिक मधल्या एका सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना बोलवण आलं होत. कुलकर्णी तेव्हा नाशिक जिल्ह्याच्या सहकार खात्यामध्ये होते. आणि त्याच बँकेच्या व्यवहारांची चौकशी करत होते. तपासणीमध्ये त्यांच्या लक्षात आले की बँकेने अपुऱ्या तारणावर बेहिशोबी कर्जवाटप केलं होत.
दोनशे रुपयाची शाईचे पोते घेऊन त्याबदल्यात दोन लाखाचे कर्ज देण्यात आले होते. बँकेची चौकशी सुरु करून तिथे प्रशासक नेमावा या निर्णयापर्यंत कुलकर्णी आले होते.
पण इतक्यात त्यांना कोणीतरी सांगितले की बँकेचा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला स्वतः सहकारमंत्री येत आहेत.
मंत्र्यांनी हजर राहून गौरव करण्यासारखी बँकेची परिस्थिती नव्हती. कुलकर्णी यांनी बँकेवर कायदेशीर कारवाई सुरु आहे हे भारदेंच्या पिए च्या कानावर घातलं. बाळासाहेबांचा त्यांना लगेच फोन आला. कुलकर्णीनी त्यांना स्पष्ट सांगितलं,
“बँक बुडण्याच्या मार्गावर आहे, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय. त्यामुळे आपण वर्धापनदिनाला आला नाहीत तर बर होईल.”
बाळासाहेब म्हणाले मी पाहून घेतो तुम्ही काळजी करू नका.
ठरलेल्या दिवशी मंत्रीमहोदय नाशिकला आले. कुलकर्णीना आश्चर्याचा धक्का बसला. नाशिकवरून इगतपुरीला जाताना भारदेनां गाडीत त्यांनी सगळी बँकेच्या कारभाराची आकडेवारी दाखवली. बाळासाहेब भारदे तरीही शांत होते. एवढं सांगूनही भारदे त्या कार्यक्रमाला जात आहेत याचं राहून राहून कुलकर्णीना वाईट वाटत होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्र्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. बाळासाहेब सगळ्यांशी आस्थेनं बोलत होते. अखेर त्यांच्या भाषणाची वेळ आली. बाळासाहेब उभे राहिले.
” बारशाला गेल्यानंतर आपण त्या लहान मुलाचा मृत्यू लवकरच आहे असे कधीही सांगत नसतो.परंतु ते मुल अतिशय अशक्त असल्याने आज दुर्दैवाने माझ्यावर अशी पाळी आली आहे. आपली ही बँक ऑक्सिजनवर असून कधी राम म्हणेल ते सांगता येत नाही.”
अत्यंत स्पष्ट शब्दात बँकेचे संचालक आणि कार्यकर्त्यांची सर्वांदेखत हजेरी घेतली. वर्धापनदिनाच्या दिवशी असा प्रसंग कोणत्याही संस्थेच्या वाटेला आला नसावा.
हे हि वाच भिडू.
- पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे देशभक्त रत्नाप्पा कुंभार !
- खान्देशचा दादासाहेब फाळके : मास्टर दत्ताराम !
- अहमदनगरच्या नवलमल फिरोदियांनी जगाच्या पाठीवर ऑटो रिक्षा नेली.
- त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !