७ बायकांनी ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला “लिज्जत पापडचा” प्रवास !
साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी.
कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसलेल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की फावला वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल.
कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते. शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या.
पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या ८० रुपयातूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला.
आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती.
सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृह उद्योगात सामील होऊ लागल्या. पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती जवळपास ६००० रुपये.
या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं. पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पूरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती.
वर्क फ्रॉम होमची सुरवात.
तिसऱ्या वर्षाच्या पदार्पणात त्यांच्यासोबतच्या महिलांची संख्या खूप वाढली होती. घरी बसायला देखील जागा नसे. यावर उपाय म्हणून आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो त्या घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती. पण गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली.
लिज्जत नाव सुचवल्याबद्दल ५ रुपयांच बक्षीस देण्यात आलं होतं.
महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नांव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं. ‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नांव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं.
पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला. लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नांव झालं.
९० च्या दशकात लिज्जतने आपला व्यवसाय विदेशात देखील विस्तारायला सुरुवात केली.
आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. व्यावसायिक उलाढालीत त्यांनी मोठीच मजल मारलीये. देशभरातील अनेक ठिकाणी लिज्जतची कार्यालये आहेत. जवळपास ४५ हजार महिलांना रोजगार दिलाय.
लिज्जतच्या या शुन्यातून विश्व निर्माण करण्याच्या प्रवासात जसवंती जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास ठोदानी , उजमबेन नरानदास कुण्डलिया, बानुबेन तन्ना, लागुबेन अमृतलाल गोकानी, जयाबेन विठलानी या महिलांचा मोठी भूमिका राहिलेली आहे.
लिज्जतची यशस्वीगाथा ही काही फक्त एक व्यावसायिक यशकथा नसून ती महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनेही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. महिला सशक्तीकरणाच्या कृतीशील प्रयत्नांची देखील ती साक्ष आहे आणि त्यामुळेच प्रवास महत्वपूर्ण आहे.
हे हि वाच भिडू :
- किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.
- फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय
- कॉपी करूनही कसं यशस्वी होता येतं याचं उदाहरण म्हणजे या ब्रँडचा मालक चीनचा स्टिव्ह जॉब्स