असं होत माणूस आणि वाघाचं नात..!
आदिवासींचे जीवन पावन करणारा दिवस म्हणजे “वाघबारस”.
आदिवासी भागातील चालीरीती प्रथे प्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे “वाघबारस”. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस. आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे. सबंध भारतीय मुलखात व मुलखाबाहेरील भारतीय लोक दिवाळी हा सण वसुबारसेच्या दिवशी करत असतानाच अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपली आहे.
खरं तर आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले आहे.
गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते व हा सण मोठा उत्सव साजरा करून सर्वानी एकत्र नवसपूर्ती केली जाते. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्याची गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकड चा नैवैद्य दाखवला जातो तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो.
अकोले तालुक्यातील अनेक गावांत वाडय़ा-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. काही आदिवासी भागांतही अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. यासोबतच या दुर्गम भागातील प्रत्येक गावात किंवा गावाच्या वेशीवर वाघोबा मंदिर असते.
सह्याद्रीतील घाटरस्त्यांना आपल्याला वाघोबाच्या मूर्ती व औट्यांवर असलेली मंदिरे पाहवयास मिळतात.
जुन्नरला तळमाचीला ,ठाणे, इगतपुरी, आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे वाघोबाची मंदिरे आहेत तर काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावुन ती या ठिकाणी ठेवलेली आढळतात. अकोले तालुक्यात पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी,घाटघर, हरिचंद्रगड पायथा, पेठयाचीवाडी, देवगाव,म्हैसवळण घाटात, झुल्याची सोंड भागात वाघबारस साजरी होत असते.
वाघबारस दिवाळी दरम्यान आणि दिवाळीनंतरही चालू असते.पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात व प्रत्येकाचं अथवा कुटुंबाचं एक कोंबडं कापून नैवेद्य दाखवितात.पाचनई जवळ कोडय़ाच्या कुंडातील झऱ्याजवळही अशाच पद्धतीने वाघबारस साजरी होते.
वाघबारसेच्या दिवशी येथील प्रत्येक घरातून अथवा कुटुंबातून वाघाला एक कोंबडा नैवेद्य म्हणून बळी द्यावा लागतो.
कबूल केलेला कोंबडा दिला नाही, तर वाघ रात्रीच्या वेळी घरी येऊन कोंबडा पळवतो. त्याचबरोबर कुटुंबाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या बनातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा अख्यायिका जुन्याजाणत्या लोकांकडून ऐकण्यास मिळतात.
या दिवशी मोठा उत्सव असतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. त्यात रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर लावला जातो.
गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाते. सगळे लोक तेथे जमतात गुराखी मुले वाघ, काहीजन अस्वल तर काहीजण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यातल्या एखाद्याला वाघ बनवले जाते. या वाघाला पळायला लावून ‘आमच्या शिवारी येशील का’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पळायचा असा खेळ खेळला जातो.
वाघबारशीच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात. नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात.
“आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया,जनावरांनपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे ,आजारांना दूर ठेव “
हे मागणं मागितल जातं.
रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते, रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमी वातावरणात हे सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी ,म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या”!
असे वेगवेगळी गीते म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात.
सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते, तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो, सर्व प्राण्याची पुज्या केली जाते व त्यांहा गोडधोड चा नैवद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरूणी रंगबिरंगी कपडे घालून एकत्र जमून तारपकऱ्याच्या तालावर नाचायला आपल्या वाडीवस्तीत निघतात आपल्या परिसरात बेधुंद नाचतात .
तारपकरी आपल्या तारप्यावर वेगवेगळी चाली वाजवून मजा आणतो . प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो . ह्या चाली वेगवेगळा नावाने परिचित आहेत. मोराचा = मुऱ्हा चाली, बदक्या चाली , लावरी चाली. बायांची, देवांची, रानोडी, टाळ्यांची, नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या चाली असतात
मात्र काळाच्या ओघात हे सर्व लोप पावत चाललेले दिसते. कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे…ती पण आपल्या सोयीनुसार…
वाघ संपले… भीती संपली.. वाघ बारस हळूहळू कमी होत चालली …!
- रवी ठोंबाडे. (अकोलेमाझा-8390607203)
हे ही वाच भिडू.
- वाघ कसा दिसतो ?
- लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा !
- यवतमाळची वाघीण वनखात्याच्या सुगंधी सापळ्यात अडकणार काय..?