‘बिग-बॉस’च्या घरात बायकोला बॅगमध्ये लपवून नेत होतो-विनीत भोंडे

 

‘चला हवा येऊ द्या..’ या झी मराठी वरील कार्यक्रमात हवा केल्यानंतर सर्वांचा लाडका अभिनेता विनीत भोंडे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग-बॉस’ या कार्यक्रमाच्या मराठी आवृत्तीत पोहोचला. ‘बिग-बॉस’च्या घरात देखील त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. पण गेल्या आठवड्यात मात्र त्याला ‘बिग-बॉस’च्या घरातून बाहेर पडावं लागलं.  ‘बिग-बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या तेथील वास्तव्याविषयी, या अनुभवाविषयी त्याने ‘बोल भिडू’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. जाणून घेऊयात त्याच्या एकूण प्रवासाविषयी आणि अनुभवांविषयी…

‘बिग-बॉस’मधनं बाहेर पडलात..पहिली प्रतिक्रिया काय आणि काय होता एकंदरीत या घरातील अनुभव..?

विनीत- ‘बिग-बॉस’मधून बाहेर पडलो. तो ऑडियन्सचा कॉल होता. वोटिंग झालं आणि मला बाहेर पडायला लागलं. माय-बाप रसिकांची तशीच इच्छा होती, तर मी त्याचा रिस्पेक्ट करतो. आणि ‘बिग-बॉस’ हा शेवटी गेम आहे, तर मी ते खूप स्पोर्टिंगली रिसीव्ह करतोय. अनुभवाचं म्हणत असाल तर ‘बिग-बॉस’मधील पंधरा दिवसांच्या अनुभवाने मी खूप काही शिकलोय. या पंधरा दिवसांनी माझ्या आयुष्यात बरेच सकारात्मक बदल घडून आलेत. स्वतःला समृद्ध होतानाच्या माझ्या प्रवासाचा मी या कालावधीत साक्षीदार राहिलोय. माझ्या व्यक्तिमत्व विकासात या पंधरा दिवसांचा रोल फार मोठा राहिलाय असं मी म्हणेन. जो माणूस चार-चौघात बोलायला घाबरत असे आणि ज्याला कायमच दुर्लक्षित केलं जात असे, अशा माणसाला ‘बिग-बॉस’नं आवाज मिळवून दिलाय. त्यामुळे आता स्वतःवरची जबाबदारी अधिक वाढली असल्याची जाणीव होतेय.

‘बिग-बॉस’ महेश मांजरेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता..?

विनीत- खरं सांगायचं तर मांजरेकर नांव ऐकल्याबरोबरच मला धडकी भरते. मलाच काय हो, इंडस्ट्रीतल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना महेश सरांचं नांव ऐकून धडकी भरते. तो माणूस खऱ्या अर्थाने ‘बिग-बॉस’ आहे. टीव्ही स्टुडीओमध्ये जरी आम्ही फार मोकळेपणाने वावरत होतो, तरी बाहेर आल्यानंतर ज्यावेळी मी त्यांना भेटलो त्यावेळी परत मी घाबरलो होतो. पण खरं सांगायचं म्हणजे तो माणूस फार इंटरेस्टिंग आहे, अनेक लोकांना ते मदत करत असतात. त्यांच्याविषयी भीती असली तरी ती आदरयुक्त भीती आहे. पण एकंदरीत मज्जा आली त्यांच्यासोबत काम करताना.

‘बिग-बॉस’च्या घरातील वास्तव्या दरम्यान सर्वात छान केमिस्ट्री कुणाबरोबर जुळली आणि सर्वाधिक त्रास कुणी दिला..?

विनीत- वाईट असा अनुभव कुणाबरोबर फार नाही आला. कुणी मला फारसा त्रासही नाही दिला पण ‘अनिल थत्ते’ हा माणूस मात्र मला थोडासा विक्षिप्त वाटला. पण ते ही ठीके. कदाचित त्यांचा तो स्वभाव असेल किंवा तो त्यांच्या ‘गेमप्लान’चा भाग देखील असू शकेल. कारण आता गेममधून बाहेर पडल्यानंतर मी विचार करतोय की ज्या माणसाची सत्तरी जवळ आलीये, तो माणूस असा कसा उगाच एखाद्या व्यक्तीला खोचक बोलेल. उद्या कदाचित बाहेर येऊन ते मला ‘सॉरी’ देखील म्हणतील. इट्स ओके. घरात फक्त त्यांच्याशीच माझं पटलं नाही, पण त्यांचं कुणाशीच पटलं नाही, हे ही तितकंच खरं. बाकी जवळपास सगळ्यांबरोबरच माझं ट्युनिंग छान जुळलं पण राजेश शृंगारपुरे आणि सुशांत शेलार हे दोघं जरा जास्त जवळ आले. सुशांत तर मला खूप व्यवस्थित समजून घेत असे.

तुझं नुकतंच लग्न झालं होतं आणि तू ‘बिग-बॉस’च्या घरात जाऊन धडकलास. महेश मांजरेकरांनी तर तुला छेडलेलं देखील ‘हनिमून’सोडून इकडे कुठे..?

      विनीत- खरं तर हा फार ‘विनोदी’ प्रश्न आहे, पण यामागे एक ‘सिरिअस’ कारण होतं की माझ्या बायकोचं सध्या बी.एस्सी नर्सिंग फायनल वर्ष सुरु आहे. तीचा शैक्षणिक ग्राफ खूप चांगला आहे. त्यामुळे तिने अजून खूप शिकावं असंच मला वाटतं. शिक्षणासाठी ती पुण्यात असते. मी मुंबईत किंवा औरंगाबादेत. त्यामुळे टेक्नीकली आमचं लग्न झालेलं असलं तरी, आमचा ‘संसार’ अजून सुरु व्हायचाय. त्यामुळे ‘बिग-बॉस’च्या घरात जाण्याचा निर्णय घेणं तसं फार अवघड नव्हतं. आता एक गमतीदार किस्सा सांगतो की, मी प्रयत्न देखील केला होता, बायकोला ‘बिग-बॉस’च्या घरात घेऊन जाण्याचा पण तो फसला. घरात जाताना आम्हाला २ बॅग देण्यात आल्या होत्या. एका बॅगमध्ये माझे कपडे होते आणि दुसऱ्या बॅगमध्ये मी बायकोला लपवून घेऊन गेलो होतो. पण ज्यावेळी बॅग चेक झाल्या त्यावेळी त्यांनी आम्हाला पकडलं आणि सांगितलं की बायकोला नाही नेता येणार म्हणून. मग त्यांनी बायकोला घराच्या बाहेरच थांबवून घेतलं आणि माहेरी पाठवून दिलं, असा तो रंजक प्रकार होता.

तू घरात असताना अनेकदा माईक विसरत होतास, त्यामुळे तुला शिक्षा देखील झालेली. काय होतं नेमकं हे प्रकरण..? मुद्दामहून करत होतास…?

विनीत- नाही हो..खरं सांगायचं तर मी फार विसरभोळा आहे. नाही राहात मला गोष्टी आठवणीत. अनेकदा तर मी माझे डायलॉग देखील विसरतो. तुम्ही मला आता यावेळी जरी २ डायलॉग सांगितले, तरी मी ते विसरेन. मला रिहर्सलची खूप गरज असते. माईक विसरणं हा त्या सवयीचाच एक भाग होता. अजून एक गंमत सांगायची तर मला झालेली शिक्षा मी जवळपास ४  तास भोगली. त्यावेळी मला वेळेचा देखील विसर पडला होता. मला वाटलं की ३ तास बसलो असावा, पण नंतर कुणीतरी सांगितलं की मी ४ तास शिक्षा भोगत बसलो होतो. मला नाही माहित की नट म्हणून मी त्या घरात कसा वागलो ते, पण माणूस म्हणून मला जितकं चांगलं वागणं शक्य होतं तितकं मी तिथे वागलोय. एक मात्र निश्चित की आज या घडीला त्या गोष्टींकडे ‘फनी एलीमेंट’ म्हणून बघतो. पण ते देखील लोकांना आवडत होतंच की.

मराठी ‘बिग-बॉस’चं पहिलंच सत्र आणि त्यातला तू पहिला ‘कॅप्टन’. ही जबाबदारी कशी पार पाडलीस..?

विनीत- ‘बिग-बॉस’चा कॅप्टन ही मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली होती आणि ते मी बऱ्यापैकी केलंय, असं मला वाटतं. कॅप्टनपदाच्या काळात माझ्यातील नेतृत्वगुण वाढीस लागले. यापूर्वी कधी मी चमचा-लिंबूच्या किंवा गोट्या खेळायच्या स्पर्धेत देखील कुठल्या टीमचा कॅप्टन नव्हतो झालो हो...इथे तर थेट एवढ्या मोठ्या टीमचा कॅप्टन होण्याची संधी मिळाली होती. शिवाय माझ्या कॅप्टन पदाच्या काळात घरातील सर्वच सदस्य कॅप्टन होते. या कामात मला सगळ्याचंच सहकार्य मिळालं.सगळ्यांच्या सहकार्यामुळे ती जबाबदारी पार पाडणं सोप्पं गेलं.

पण ‘कॅप्टन’पदाच्या काळात बऱ्याच काँट्रोव्हर्सिज देखील झाल्या, त्याबद्दल काय सांगशील…

विनीत- काँट्रोव्हर्सिज झाल्या असं नाही मला वाटतं. उलट मी म्हणालो तसं मी कॅप्टन असताना सगळेच कॅप्टन होते. थोडं फार मी टीम मीटिंग जास्त बोलवायचो, असं म्हंटलं गेलं पण मला नाही वाटत की असं काही झालं. मिटिंगच्या बाबतीत एवढं नक्की सांगीन की एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी सांभाळताना नियोजनाच्या दृष्टीने ते आवश्यकच होतं. शिवाय तो पहिलाच आठवडा होता, त्यामुळे कुणाला काय करायचंय याचा नीटसा अंदाज कुणालाच नव्हता. आता मात्र कळतंय की त्या मिटिंग घेणं किती गरजेचं होतं ते. माझ्या कॅप्टनपदाच्या काळात मी ज्या गोष्टी ठरवून दिल्या होत्या त्याच पुढे या घरात होताहेत…!!!

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.