अशोक वैद्य, सुधाकर म्हात्रे की बाजीराव पेशवे ; वडापावचा शोध कोणी लावला ? 

सोशल मिडीयावर सर्वात चर्चेत असणारा पदार्थ म्हणजे मिसळ. इथली चांगली का तिथली. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा ब्रॅण्ड. नाशिक, पुणे, कोल्हापूर, ठाणे, या शहरात युद्ध सुरू झालं तर फक्त आणि फक्त मिसळीमुळच होईल अस वाटतं. त्यात आत्ता चुलीवरची, बंबातली, निखाऱ्यातली, उघड्यावरची असे मिसळीत वेगवेगळे प्रकार आलेच आहेत. 

पण खरा मुंबईकर अजूनपण वडापाव वर टिकून आहे. बसता उठता झोपता खाण्यासारखा पदार्थ म्हणजे वडापाव. जागतिकरणाच्या लाटेनंतर मुबळक प्रमाणात पैसे आले असले तरी माणसांनी वडापाव खाणं सोडलं नाही. मुंबई म्हणलं की इथला वडापाव भारी का तिथला वडापाव भारी या चर्चा रंगतातच.

मुंबई ठाणे आसपासच्या भागात तर प्रत्येकाचे आवडीचे वडापाव आहेत. नुसत्या मुंबईतले म्हटले तर CSMT स्टेशन बाहेरचा आराम भायखळ्याच्या ग्रॅज्युएट वडापाव दादर किंग जॉर्ज जवळचा बाबू कीर्ती कॉलेज जवळचा अशोक. ठाणे म्हटलं तर स्टेशन जवळ जगदीश बुक डेपो जवळचा कुलकर्णी कोपरी नाखवा हायस्कुल जवळचा वडापाव गजानन राजमाता असे चिक्कार…

प्रत्येकाच नाव लिहणं अशक्य आहे. भावना दुखावल्या तर टेन्शन घेवू नका. कारण विषय कुठला वडापाव चांगला आणि कुठला वडापाव वाईट हा नाहीच. 

आजचा विषय आहे, जगातला पहिला वडापाव कुठला? वडापाव कोणी बनवला? 

आत्ता पहिला वडापाव कुणाचा याबातीत वेगवेगळी मतं आहे. अनेकजण वडापावच्या शोधाचं श्रेय अशोक वैद्य व त्यांच्या पत्नी मंगला वैद्य यांना देतात. 

त्या काळी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची संख्या मोठ्ठी होती. गिरणी कामगारांच्या पोटाची भूक भागवेल. कुठेही उभा राहून खाता येईल आणि मुख्य म्हणजे खिश्याला परवडेल म्हणून वडापाव लोकप्रिय झाला. १९६६ साली दादर स्टेशनच्या जवळ पहिली वडापावचा गाडा सुरू झाला. तो अशोक वैद्य यांचा. अशोक वैद्य यांनी बटाट्याची भाजीचे गोळे केले आणि ते बेसणाच्या पिठात कालवले. तेलात सोडले आणि वडा तयार झाला. (काय वडाय). त्यानंतर वडे विकताना त्यांना तो पावासोबत देण्याची आयडिया मांडली आणि लोकांनी ती उचलून धऱली. 

याच काळात मुंबईत शिवसेना आपले पाय पसरत होती.

बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या घोषणा देण्यात येत होत्या. त्या काळात हॉटेल व्यवसायामुळे मुंबईत दाक्षिणात्य लोकांच वर्चस्व वाढू लागलेलं. लोकांना देखील खाण्यासाठी डोसा आणि इडलीच होती. हे दोन्ही पदार्थ खिश्याला परवडणारे नसले तरी खाण्यासाठी दूसरी कोणतीच गोष्ट नसल्याने लोकप्रिय झाल्या होत्या. अशा वेळी वडापाव आला आणि अशोक वैद्य यांच्या वडापावची नक्कल करत मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वडापावच्या गाड्या सुरू झाल्या. दाक्षिणात्य लोकांच्या अर्थव्यवस्थेला मराठी माणसाचा वडापाव हादरे देवू शकतो हे ओळखून शिवसेनेकडून वडापावचा प्रसार करण्यात आला. त्यातून मराठी माणसांनी ठिकठिकाणी वडापावच्या गाड्या सुरू केल्या. पुढे शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक वडापाव गाड्यांना पाठबळ देण्याचच काम केलं. 

१९७० ते ८० च्या काळात मुंबईतल्या जागेच्या किंमती वाढू लागल्या आणि गिरणी बंद पडू लागल्या. बेरोजगार झालेल्या कित्येक तरुणांनी वडापावची गाडी टाकून कुटूंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. राहता  राहिला सुधाकर म्हात्रेचा विषय तर याच काळात दादर परिसरात वडापावची विकण्यास सुरवात केल्याच सांगितल जातं. पण बहुतांश लोक याच श्रेय अशोक वैद्य यांनाच देतात. 

आत्ता वडापाव सोबत वेगवेगळे प्रकार करण्याचे कामे सुरू झाले. किर्ती कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या वडापाववाल्याने सर्वात प्रथम चुरा दिल्याचं सांगितल जातं. आत्ता त्याने तो चुरा कोणाला दिला ते आम्ही सांगू शकत नाही पण हाच मुंबईचा पहिला वडापाव वाला होता त्याने चुरा सिस्टिम मार्केटमध्ये आणली. मग कुंजविहारमध्ये पावाचा आकार मोठा करुन जंबो वडापावच नाव दिलं. ठाण्याच्या गजानन वडापाव वाल्यांनी पिवळी बेसनाची चटणी देण्यास सुरवात केली. वडापाव सोबत हे प्रयोग अगदी छोटेछोटे होते. कारण वडापावमध्ये विशेष अस काही वेगळ करण्यासारखं नव्हतं देखील. 

थोडक्यात काय तर वडापावच्या शोधाच श्रेय निर्विवादपणे अशोक वैद्य यांच्याकडे जातं पण काहीजण याचं श्रेय थेट बाजीराव पेशव्यांना देतात.

काही जणांच्या मते बाजीराव पेशव्याच्या खाऩसाम्याने पहिल्यांदा वडापाव बनवला होता. त्यावेळी पोर्तुगीज भारतात असल्यामुळे बटाटा आणि पाव हे दोन्ही घटक भारतात आले होते त्यामुळे शंका घेण्यासारखं वातावरण नाही. पण त्याबद्दल अधिक अशी माहिती उपलब्ध नाही. राहून राहून अशी देखील शंका वाटते की, वडापावच्या शोधाच क्रेडिट मुंबईला मिळू नये म्हणून काही धुर्त पुणेकरांनी थेट बाजीरावांचा उल्लेख करुन पुडी सोडली असावी. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.