चिकन तंदुरी, बटर चिकन, दाल मखनीचा शोध या माणसाने लावला.

निर्वासित लोकं. बोलीभाषेत आपण त्यांना निर्वाशी म्हणतो. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर लाखों हिंदू कुटूंब भारतात आश्रयाला आली. मोठमोठ्या शहरांच्या बाहेर त्यांच्या वस्त्या झाल्या. संपुर्ण भारतात ती मिसळून गेली. पाकिस्तानात मोठ्या श्रीमंतीत राहिलेली हि कुटूंब भारतात येवून शुन्यातून सुरवात करु लागले. 

या लाखोंच्या गर्दीत होते कुंदनलाल गुजराल.

त्यांच्या जन्म १९१० चा. पाकिस्तानातल्या झेलम जिल्ह्यातल्या चकवाल गावचा. पण त्याचं सर्व कुटूंब पेशावरला स्थायिक झालेलं. त्याच्या वडिलांच कापडाच दुकान होतं. घरात एकच नियम होता तो म्हणजे दोनचार इयत्ता शिकल्या की पोरं कामाला सुरवात करायची. खरची परिस्थिती चांगली, तरिही आठ दहा वर्षांच्या पोरांना काम करणं हा नियम. कुंदनलाल दहा वर्षाचा झाला आणि पेशावर मधल्या एका कबाबच्या दुकानात कामाला लागला.

कबाब विकणाऱ्या दुकानदाराच नाव होतं मुखा सिंग. छोट्याशा गल्लीत असणाऱ्या या दुकानात फक्त कबाब मिळायचं. त्या काळात तंदुर भट्टी हा प्रकार नव्हता. नान, रोटी भाजण्यासाठी आणि ती विकत घेण्यासाठी वेगळी दुकानं असत. लोक कबाबच्या दुकान येत कबाब घेवून नानच्या दुकानात जात आणि नान घेत असा सगळा प्रकार. 

ग्राहक थांबण्यासाठी मुखा सिंग कबाब सोबत नान बाहेरून विकत आणत. त्या दूकानात बसण्यासाठी देखील जागा नव्हती.मग लोक उभ्याउभ्या कबाब आणि नान खात. १० वर्षाचा कुंदनलाल हे सगळं टिपत होता. दोन वर्ष मुखा सिंगच्या दुकानात काम केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नान विकत आणण्यासाठी खूप पैसे खर्च होतात. शिवाय ज्या पैशात आपण नान घेतो त्याच पैशात लोकांना ते द्यावे लागतात. त्यापेक्षा आपणच नान बनवायला सुरवात केली तर. 

त्या वेळी हॉटेल किंवा कबाबच्या दुकानात तंदुर भट्टी असण्याचा संबध नव्हता, पण दुकानात काम करणाऱ्या १२ वर्षांच्या कुंदनलालने हे फायद्याच गणित मुखासिंग यांच्या डोक्यात उतरवलं. मग तंदुर भट्टीचा विचार केला आणि कबाबच्या कोळशाच्या शेंगड्याशेजारी पहिल्यांदा तंदुर भट्टी लागली. 

ते साल होतं, १९२२ चं. 

पेशावरच्या छोट्याशा कबाबच्या दुकानात पहिली तंदुरी भट्टी लागली. तिथल्या तिथ नान मिळत असल्याने हा फायद्याचा व्यवहार ठरू लागला. त्यानंतर वर्षभर झालं आणि मुखा सिंग एक दिवस आजारी पडला. रात्री जेवायला काहीतरी हलकं कर अस त्यानं कुंदनलालला सांगितलं. 

कुंदनलालने काय केलं तर कबाब करण्यासाठी आणलेली अख्खी कोंबडी न कापता तशीच ठवली. त्यावर तिखट, आललसूण आणि दही लावून अर्था तास मुरवत ठेवली. दुकानामागे असणारी कपडे वाळत घालायची जाड लोखंडी तार घेतली आणि संपुर्ण कोबंडी त्यात खोवली. मीठ, मीरची लावली आणि त्यावर लिंबू पिळून आख्खी कोंबडी तंदुरात सोडून दिली.

हे जगातलं पहिल तंदुरी चिकन होतं. 

मुखा सिंगन विचारलं जेवायला काय केलय, तेव्हा कुंदनलालनं नव्यानं तयार केलेली तंदुर चिकन त्याच्या पुढे ठेवलं. तेलकट नसणारा ते लुसलुसीत चिकन खावू मुखा सिंह येरबाडला. तंदुर चिकन खायला नान ची आवश्यकता नव्हती. लागलीच दोघांनी कोणता मसाला लावायचा काय करायचं याचा विचार करायला सुरवात केली. दोन दिवस घालवले आणि मस्तपैकी दूसरं चिकन तंदुरी बनवलं. 

झालं त्या दिवशीपासून पेशावरच्या गल्ल्यात नवा पदार्थ मिळू लागला, चिकन तंदुरी. 

लोकं चिकन तंदुरी खायला गर्दी करू लागले. एकामागोमाग पेशावरच्या गल्यात चिकन तंदुरी मिळू लागली.  तंदुरचा वापर अरब देशात पुर्वीपासून केला जात होता पण त्यामध्ये चिकन भाजलं जावू शकतं असा विचार कोणीच केला नव्हता. तंदुरमध्ये फक्त नान, रोटी आणि केक केले जायचे. नाही म्हणायला तंदुरमध्ये मटण केल जायचं पण ते डब्यामध्ये घालून तंदुरमध्ये ठेवलं जायचं. अख्खी कोंबडी अशा प्रकारे भाजण्याचा हा जगातला पहिला प्रयोग होता.

मुखा सिंग आणि कुंदनलाल यांना जोरदार नफा मिळू लागला. मुखा सिंग यांना पुर्ण जाणिव होती की हा पदार्थ कुंदनलालनेच शोधून काढला आहे. १९२७ साली पेशावरच्या गोरा बाजारात या दोघांनी मिळून एक हॉटेल काढलं त्या हॉटेलच नाव होतं मोतीमहल. हळुहळु पेशावर मधील सर्वात मोठ्ठ हॉटेल म्हणून मोतीमहल गणलं जावू लागलं.

कुंदनलाल आणि मुखा सिंग हे दोघेही मोठ्ठे व्यावसायिक म्हणून गणले जावू लागले आणि एक दिवशी…. 

ठरल्याप्रमाणे भारताची फाळणी झाली. सत्तेचाळीसच्या सप्टेंबर महिन्यात मुखा सिंग आणि कुंदनलाल आपल्या कुटूंबाला घेवून दिल्लीत आले. त्या काळात कुंदनलाल यांच्या खिश्यात बारा हजार रुपये होते. रक्कम मोठ्ठी होती पण त्याहून कित्येक पट कमावलेली संपत्ती त्यांनी पेशावरमध्येच ठेवली होती. ते दर्यागंज येथे आपल्या पाहूण्याकडे राहिले. मुखा सिंग आपल्या बहिणीकडे डेहराडूनला गेले आणि इकडे फक्त कुंदनलाल आणि त्यांच कुटूंब राहिलं. 

काहीतरी काम करणं गरजेचं होतं. संपुर्ण आयुष्य जेवण करण्यात घालवलं होतं.  दूसऱ्या दिवशी कुंदनलाल उठले आणि कामाच्या शोधात दर्यागंजचे रस्ते पालथे घालू लागले. दर्यागंजमध्ये फिरता फिरता त्याना भल्ला मोठ्ठा ठेरा दिला. त्यांनी तो विकत घेतला आणि दर्यागंजमधल्या एका गल्लीत खोदून त्यान तंदुर भट्टी तयार केली. छोटसं दुकान तयार झालं. कुंदनलाल यांनी दिल्लीमध्ये तंदुरी चिकन विकण्यास सुरवात केली.

एकतर दिल्लीकरांसाठी हा पदार्थ नवीन होता. त्यातही बाहेरच वातावरण पाहता लोकं बाहेर पडत नव्हते. मात्र हळुहळु लोकांना तंदुर चिकनची चव कळाली आली कुंदनलाल यांच दुकान तेजीत आलं. चार पैसै हाती येताच कुंदनलालने दिल्लीच्या दर्यागंजच्या गल्लीत नवीन रेस्तरॉं काढलं, त्याच नाव होतं. 

मोतीमहल. 

पेशावरमधल्या दूकानाची आठवण. 

पेशावरच्या मोतीमहल मध्ये मिळणार तंदूरी मुर्ग दिल्लीमध्ये तंदुरी चिकन झालं. व्यवसाय वाढू लागला आणि एकदिवस कुंदनलाल यांना आठवण आली ती मेहर चंद खन्ना यांची. मेहर चंद देखील पेशावरचे. पेशावरमध्ये असताना ते कुंदनलाल यांच्या तंदूरी मुर्गचे चाहते. 

कुंदनलाल यांनी चिकन तंदुरी पार्सल केली आणि मेहरचंद खन्ना यांना पाठवून दिली.

डब्बा उघडताच. पेशावरच्या आठवणीत मेहरचंद खन्ना गेले. हि तर कुंदनलाल यांच्या दुकानातील मुर्ग तंदुरी. मेहरचंद हे फाळणीपुर्वी पेशावर मधून दिल्लीत आले होते. शिवाय ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात देखील होते. मेहरचंदांनी कुंदनलाल यांना बोलावून घेतलं आणि बेत ठरवा. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांना बोलावून घ्यायचं. सोबत संपुर्ण मंत्रीमंडळ देखील असेल आणि जेवणाची जबाबदारी कुंदनलाल यांच्याकडे असेल. कुंदनलाल यांच्यासाठी हा मोठ्ठा चान्स होता. ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नेहरू आणि संपुर्ण मंत्रीमंडळ मेहरचंद यांच्याकडे जेवणासाठी आले. 

सुरवात झाली ती चिकन तंदूरीने. पंडित नेहरूसह सर्वजण हा पदार्थ पहिल्यांदाच खात होते. तंदुरीमध्ये भाजण्यात आलेलं चिकन हे सर्वांसाठी अनपेक्षित होतं. 

हळुहळु मोतीमहल ने कात टाकण्यास सुरवात केली. सुरवातीला छोटसं दुकान असणारं मोतीमहल आत्ता रेस्तारॉं झालं. इथे बसून लोक गाण्याची फर्माइश देखील करु लागले. उत्तोमत्तम कव्वाली मोतीमहल मध्ये सादर होवू लागली. पंतप्रधान नेहरू देखील इथे खास तंदुरी चिकन खाण्यासाठी येवू लागले. आजही रेस्तारॉं च्या सुरवातीलाच कुंदनलाल पंडित जवाहरलाल नेहरूच्या तोंडातली सिगरेट पेटवून देतानाचा फोटो लावण्यात आला आहे. 

लाल बहादूर शास्त्री, फक्रुदीन अहमद, दिलीपकूमार, नर्गिस अशा सेलिब्रिटींच्या रांगा या मोतीमहल समोर लागू लागल्या. 

एक दिवस मोतिमहल मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद इराणच्या शहाला धेवून आले. पुढे निक्सन, ख्चुश्चेव यांनी देखील कुंदनलाल यांच्या चिकन तंदुरीची चव चाखली. कुंदनलाल पंतप्रधान निवासावर येणाऱ्या पाहूण्यासाठी मेजवानीची सोय पाहू लागले.

त्यातूनच देशभरातल्या प्रमुखांना “चिकन तंदुरीचा” हा नवा पदार्थ समजू लागला. ख्रुश्चेव यांनी तर कुंदनलाल यांना मॉस्को मध्ये एक शाखा सुरू करण्यास सांगितलं आणि ती सुरू देखील झाली. रशियात देखील पहिला चिकन तंदुरी घेवून जाण्याच काम कुंदनलाल यांनीच केलं.  

चिकन तंदुरीची ख्याती जगभर झाली. इकडे मोतीमहल मध्ये कुंदनलाल वेगवेगळे प्रयोग करत होते. त्या काळात फ्रिज करुन ठेवायची सोय नसल्याने बऱ्याचदा माणसांचा अंदाज न आल्याने तंदुर तसेच रहात असे. अशा वेळी कुंदनलाला यांनी तंदुरमधून भाजलेल्या चिकनमधून नवा पदार्थ शोधून काढलां.

त्याच नाव बटर चिकन अर्थात मुर्ग मखनी. पुढे शाकाहारी लोकांच्या खाण्याचा प्रश्न आला तेव्हा पेशावरमधल्या उडदाचं वरण आणि मखनी ग्रेव्ही एकत्र करून त्यांनी दाल मखणी बनवली. पनीर माखनवाला, व्हेज माखनवाला हे पदार्थ देखील त्यांनीच तयार केले. 

१९९७ साली कुंदनलाल वारले. तेव्हा संपुर्ण जगभर त्यांच्या शाखा विस्तारल्या होत्याच पण भारतातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर देखील चिकन तंदुरी मिळू लागलं होतं. त्यांची मुलाखत खुशवंतसिंग यांनी घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते. पेशावरमध्ये तीस वर्ष राहिलो. पण दिल्लीने मला जगभर पोहचवलं. दिल्लीने मला आपलं केलं. घर दिलं पैसा दिला आणि इज्जत दिली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.