बुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे…

साहित्य संमेलनामुळे यवतमाळ सर्वांनाच माहिती झालं असेल अशी आशा व्यक्त करतो.  कुंडलकरही झोपेत यवतमाळ कुठे आहे विचारलं तर सांगतील आत्ता अचूक उत्तर देवू शकतात. साहित्य संमेलनामुळे इतर गोष्टीत काय बदल झाला हे आज सांगण अवघड असलं तरी “यवतमाळ” माहित नाही अस म्हणण्याच धाडस कोणी करणार नाही हा बदल मात्र शंभर टक्के झाला आहे. 

असो, यवतमाळ माहित नसणाऱ्यांना यवतमाळ कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे हे सांगण हा मुख्य उद्देश. तर आजचा विषय यवतमाळची विशेष ओळख असणारा आणि जागतिक स्तरावर ब्रँड बनलेला ‘बुढीचा चिवडा’. 

 मुख्यमंत्रीदेखील हा चिवडा खाण्यासाठी सर्वसामान्यांसारखे रांगेत लागायचे. तुम्हाला नाशिकचा चिवडा माहिती असेलच. हल्दीरामचा चिवडा देखील माहित असेल. पण हा बुढीचा चिवडा म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज त्याबद्दल सांगतो. 

तर बुडीचा चिवडा फक्त यवतमाळलाच मिळतो. त्याची शाखा कुठेही नाही, हा एक ब्रँड असल्याने याची भ्रष्ट नक्कल यवतमाळमध्ये जागोजागी मिळेल. पण ओरिजनल ‘यौत्माड’चा बुढीचा चिवडा म्हणजे आझाद मैदानावरचा. तिथे तुम्हाला बुढीचा चिवडेवाला असा बोर्डच लावलेला दिसेल.

बुढीचा चिवडा म्हणजे नक्की काय? 

काय आहे त्यात वेगळं की जो खाण्यासाठी लोक दुरदुरून येतात. मंत्रीही यवतमाळला असल्यास बुढीचा चिवडा खाल्याशिवाय परत जात नाही. तर बुडी म्हणजे म्हातारी. एका म्हातारीने बनवलेला हा चिवडा आहे. हा चिवडा जाड पोह्यांचा असतो. मस्त झणझणीत, चटपटीत असलेल्या या चिवड्यावर मोटेची उसळ, कांदा, टोमॅटो घालून त्यावर मस्त लिंबू मारलं जातं. मस्त लाल चटपटीत हा चिवडा एका कागदावर दिला जातो त्यावर जाड पुठ्याच्या तयार केलेल्या चमच्याने हा खायचा असतो..

हा चटपटीत, झणझणीत कांदे, लिंबू असं म्हटल्यावर आता आजच रात्री बसून ट्राय करतो, असा विचार तुमच्या नक्कीच आला असेल. तर सावधान… जरा हलक्यात घ्या. हा चिवडा बसून नाही तर उभ्यानेच ट्राय करा. हा प्रकार चकण्यात एन्जॉय करण्यापेक्षा याची खरी मजा ही नुसती खाण्यातच आहे.

Screen Shot 2019 01 12 at 8.01.35 PM

या चिवड्याला जवळपास 70 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून जेव्हा यवतमाळला चौपाटी वगैरे काही नव्हती तेव्हा अंजनाबाई बुजाडे नामक एक वृद्ध महिला आझाद मैदानात चिवडा घेऊन बसायची. तेव्हा आझाद मैदान हा भाग सुनसानच होता. काही लोक तिथे येऊन चिवडा खाऊ लागले. हा चिवडा इतर चिवड्यापेक्षा वेगळा होता. विदर्भात जसा पातळ पोह्यांचा चिवडा मिळतो तसा तो नव्हता, तर हा जाड पोह्यांचा होता. चटपटीत होता. शिवाय हा चिवडा मोठ, कांदे, टोमॅटो व त्यावर लिंबू पिळून द्यायचे. हा प्रकार यवतमाळकरांना चांगलाच भावला.

बुढीचा चिवडा नाव कसं पडलं?

यवतमाळकरांच्या या चिवड्यावर उड्या पडल्या. एक व्यक्ती दुसऱ्यांना या चिवड्याची महती सांगू लागली. आजीबाईचं तर दुकान नव्हतं. त्या टोपलीत चिवडा घेऊन बसायच्या. आता दुकान नाही तर पत्ता कसा शोधायला हा प्रश्न खवय्यांना पडला. मग अडचण येऊ नये म्हणून लोकांनीच बुडीचा चिवडा हे नाव दिलं. चिवड्याला आणि दुकानाला एकच नाव बुडीचा चिवडा. या चिवड्याचा प्रसिद्धीमुळे पुढे गर्दी वाढून हेच आझाद मैदान यवतमाळची चौपाटी बनली.

यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक. वसंतराव नाईक हे देखील मुख्यमंत्री असताना हा चिवडा खायला यायचे. ते ही अगदी सर्वसामान्यांसारखे. इतर लोकांना जसा रांगेत चिवडा मिळायचा तसाच तेही सर्वसामान्यांसारखे आझाद मैदानात येऊन चिवडा खायचे अशी आठवण अंजनाबाईं बुजाडेंचे नातू अशोक बुजाडे सांगतात.

1977 साली अंजनाबाई बुजाडे यांचं निधन झालं. मात्र त्यांचा चिवडा हा एक ब्रँड बनला होता. त्या गेल्यानंतर त्यांच्या मुलाने हा व्यवसाय हाती घेतला. मात्र त्या गेल्यानंतरही चिवडा बुढीचा चिवडा याच नावाने ओळखला जायचा. आज अंजनाबाईंची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते. आधी हा चिवडा काही आण्यामध्ये मिळायचा. आता हा चिवडा दहा रुपये प्लेटने मिळतो.

बुढीचा चिवडा पोहोचला परदेशात…

यवतमाळमध्ये विविध कॉलेज असल्याने देशभरातून विद्यार्थी इथे शिकायला येतो. आज हे विद्यार्थी पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली यासोबतच अमेरिका, दुबई, इंग्लंड इत्यादी देशात देखील स्थायिक झाले आहेत. आजही ते यवतमाळला आले की आवर्जून आझाद मैदानात चिवडा खायला येतो व सोबतच पार्सल देखील घेऊन जातात अशी माहिती अशोक बुजाडे यांनी दिली. सोबतच जिल्ह्यातले आमदार मंत्री जेव्हा यवतमाळला येतात तेव्हा गाडी बाजूला लावून नेहमीच चिवड्याचा आनंद घेतात अशीही माहिती त्यांनी दिली.

आज नाशिक चिवडा असो किंवा हल्दीरामचा चिवडा असो हा चिवडा योग्य मार्केटिंगमुळे सर्वदूर पोहोचला मात्र मार्केटिंगचं पुरेसं तंत्र अवगत नसल्याने बुढीचा चिवड मात्र विशेष असा सर्वदूर पोहोचला नाही. आजही अंजनाबाईची तिसरी पिढी एका छोट्याशा जागी हा चिवडा विकतात. स्वातंत्र्याच्या आधी भाकरीच्या शोधात अंजनाबाईं यवतमाळला आल्या. ओसाड असलेल्या एका मोकळ्या मैदानावर त्यांनी चिवड्याचा व्यवसाय सुरू केला. त्याही अशा काळात जेव्हा महिलांना घराबाहेर पडणे अवघड होतं. त्या काळात त्यांनी व्यवसाय सुरू करणे एक क्रांतीकारक पाऊलच होते. आज एक साधा चिवडा हा ब्रँड बनला आहे.

यवतमाळला ठिकठिकाणी बुडीचा चिवडा मिऴेल मात्र ही भ्रष्ट नक्कल आहे. ओरिजनल बुडीचा चिवडा म्हणजे फक्त आझाद मैदानावरचा. साहित्य संमेलनात गेला असेल आणि काही झणझणीत, चटपटीत हवं असेल तर ते फक्त बुढीच्या चिवड्यातच मिळेल.

निकेश जिलठे 9096133400

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Mangesh Gawande says

    budhicha chivada mast aavadala

Leave A Reply

Your email address will not be published.