सकाळी सकाळी पुण्याची बत्तीगुल होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ?

फेब्रुवारी महिना आला गड्या खरं पुण्यातली थंडी काही कमी झाली नाही. त्यात आणि सकाळी सकाळी लाईट गेली! माझी अवस्था मग ही अशी झाली.

ba04ae5a 9537 11e7 8e40 f0ddfb773b93

रोज अंघोळ करताना मी देवांची नाव घेतो, आज सकाळी मात्र महावितरणची घेत होतो. 

सकाळी रूमवर लाईट नव्हती म्हणून आसपासच्या मित्रांना फोन केला पण त्यांच्याकडे पण लाईट नव्हती. आजूबाजूलाच काय तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत झाल्याचे मॅसेज व्हाट्सएपच्या ग्रुपवर पडायला लागले. कशामुळे हे सगळं सुरू होतं माहीत नाही, पण रोजगारी लोकांसाठी हा सामान्य दिवसच होता असं मानून मी माझ्या बाईकला किक मारली. माझ्या ऑफिसला जाण्याच्या रस्त्यात नाही म्हणलं तरी तीनेक सिग्नल आहेत. आज त्यांना पण सुट्टी दिली होती महावितरणने !

म्हणून मघाशी महावितरणला दिलेल्या शिव्यांच्या बदल्यात मनातल्या मनात सॉरी म्हणून थँक्स म्हंटल आणि सुसाट ऑफिसात पोहोचलो. आता ऑफिसात पण लाईट नव्हतीच, म्हणून जरा अजून खुश झालो. पण आज महावितरण आमच्या सारख्या घाण्याला जुपलेल्या बैलांवर एवढं मेहेरबान का ? अहो म्हणजे लाईट का गेली हे खुळ काय डोक्यातून निघायला तयार नव्हतं. त्यात मोबाईल स्क्रीच्या स्टेटसबार एक बातमी पडली !

महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही (४०० KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी ट्रिपिंग झालयं. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं. या ट्रिपिंगमुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. सकाळी ६ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही समोर आली आहे.

मग शोधायला बसलो. महावितरणमध्ये काम करणाऱ्या एका मित्राला फोन केला.

त्याला पहिला प्रश्न विचारला की बाबारे ट्रीपिंग म्हणजे काय ? वीज कुठं दौऱ्यावर गेलीय का ?

तर त्याने सांगितल की, राज्यात वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण ही प्रमुख सरकारी कंपनी आहे. ग्रामीण भागासह अनेक मोठ्या शहरांमध्येही वीज गेल्याचा अनुभव येतो. हा अनुभव पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्त असतो. हेच प्रमाण इतर ऋतूंमध्ये मात्र कमी असतं.

बऱ्याचदा निकामी झालेली चिनी मातीची विद्युत उपकरणे, किंवा अधिकचा भार एखाद्या रोहित्रावर आल्यामुळेही वीज प्रवाह खंडित होतो. पशु-पक्षांच्या स्पर्शाने किंवा धक्क्याने देखील अनेकदा वीज जाते. तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते.

पण आता पुण्यात थंडीचा कडाका वाढलाय. अशात अतिशय दाट धुकं आणि दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असते.

आता वीज गेल्यानंतर लोकांचा सगळा राग निघतो तो महावितरणवर. पण महावितरणचे अधिकारी लाईनमन आणि विद्युत पुरवठा कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. वीज पुरवठा खंडित झाल्याबरोबर तो नेमका कुठे झाला असावा याचा अंदाज लाईनवर नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतो.

जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो त्याची माहिती लगेच त्या भागातील सबस्टेशनमधील विद्युत नियंत्रण यंत्रावर कळते. अलार्म वाजायला सुरुवात झाली की कोणत्या फीडरवर प्रवाह खंडित झाला याची अचूक माहिती मिळते.

सबस्टेशनला रात्र-दिवस नियुक्त असलेले ऑपरेटर मग लगेच याची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि त्या-त्या भागातील लाईन स्टाफ यांना देतात. नियमाप्रमाणे प्रवाह खंडित झाल्यानंतर पाच मिनिटांनी ऑपरेटर सबस्टेशनच्या यंत्रावरून पहिला ट्रायल घेतात. त्या नंतरही सप्लाय टिकला नाही तर दुसरा प्रयत्न दहा मिनिटानंतर केला जातो. त्या नंतर १५ मिनिटांनी शेवटचा प्रयत्न केला जातो. त्या नंतरही विद्युत प्रवाह सुरळीत झाला नाही तर यंत्र बंद करून त्याची माहिती वरिष्ठ अधिकारीही आणि संबंधित भागातील लाईन स्टाफ यांना दिली जाते. या नंतर सुरु होते बिघाड शोधण्याची मोहिम.

आता महावितरणची शोध मोहीम बहुतेक पूर्ण झाली असावी कारण लाईट आलीय!

 

Leave A Reply

Your email address will not be published.