दस का दम: ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती नसलेल्या दहा गोष्टी !

भारतातला  साहित्यक्षेत्रातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार कुठला असेल तर तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार!!

आजच या वर्षीच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. २०१८चा ज्ञानपीठ सन्मान मिळाला आहे जेष्ठ कादंबरीकार अमिताव घोष यांना. सिटी ऑफ पॉपीज या त्यांच्या कादंबरीला बुकर या जागतिक प्रतिष्ठेच्या पुरस्काराचेही नामांकन मिळाले होते. अमिताव घोष यांना यापूर्वी भारत सरकारचा पद्मश्री आणि साहित्य अकादमी सन्मानही मिळाला आहे. 

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला की साहित्यिकांना आपण आयुष्यभर केलेल्या साहित्यसेवेच्या कार्याचा सर्वोच्च सन्मान झाल्याची भावना असते.

तर चला जाणून घेऊया या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल दस का दम

१. आपल्यापैकी अनेकांना असा गैरसमज असतो की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारत सरकार कडून दिला जातो. सगळ्यात आधी हा गैरसमज काढून टाका.

टाइम्स ऑफ इंडियाचे मालक साहू जैन यांच्या ५१व्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या पत्नीने रमा जैन यांनी ज्ञानपिठ पुरस्काराचा ठराव मांडला. साहू जैन यांनी १९४४साली स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. भारत सरकारतर्फे साहित्यसेवेसाठी दिला जाणारा सन्मान म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार.

२. जरी सरकारतर्फे ज्ञानपीठ दिला जात नसला तरी या पहिल्या पुरस्कार निवडसमितीचे अध्यक्षपद पहिले राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांना देण्यात आले होते.

१९६१ साली ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना करण्यात आली. यानंतर पूर्ण देशभरातून एका संमेलनात गोळा झालेल्या ३००विद्वानांनी या पुरस्काराचे स्वरूप ठरवले आणि या समितीचे प्रमुखपद महामहीम राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांना दिले गेले. पण दुर्दैवाने पहिला पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच १९६३साली त्यांच निधन झालं. त्यांच्यानंतर काका कालेलकर आणि संपूर्णानंद यांनी निवडसमितीची जबाबदारी सांभाळली.

३. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी शंकरा कुरूप यांना १९६५साली देण्यात आला.

ओटक्कुषल या त्यांच्या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी त्यांना केंद्र सरकारकडून दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता.

४. हा पुरस्काराचे सन्मानचिन्ह म्हणून वाग्देवीची कास्य प्रतिमा देण्यात येते.

ज्ञानपीठ पुरस्कार म्हणून देण्यात येणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा मधल्या धार येथील सरस्वतीमंदिरातील मूर्तीची प्रतिकृती आहे. असं म्हणतात की या मंदिराची स्थापना भोज राजाने इसवीसन १०३५ साली केली होती.आज ही मूर्ती लंडन मधल्या ब्रिटीश म्युझियम मध्ये आहे.

५. पहिल्या पुरस्कारावेळी पुरस्कार रक्कम १ लाख रुपये होती.

१९६५ साली असलेली पुरस्काराची १ लाख ही रककम २००५साली वाढवून ७ लाख करण्यात आली होती. आज ही रक्कम ११लाख इतकी आहे.

६. ज्या भाषेतल्या साहित्यिकाला हा ज्ञानपीठ दिला जातो त्यानंतर ३ वर्षे त्या भाषेतल्या साहित्यिकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जात नाही.

या पुरस्काराची नियमावली अतिशय काटेकोरपणे पाळली जाते. पुरस्कार देताना कोणत्याही भाषेवर अन्याय होऊ नये म्हणून पुरस्कारविजेत्या साहित्यिकाच्या भाषेला ३ वर्षाचा गॅप नंतरच पुरस्कारासाठी विचारात घेतले जाते.

७. हिंदी भाषेतला पहिला ज्ञानपीठ सुमित्रानंदन पंत यांना मिळाला होता.

सुमित्रानंदन पंत हे हिंदीमधले महान कवी होते. यांनीच हरिवंशराय बच्चन या आपल्या मित्राच्या आझाद नावाच्या मुलाला अमिताभ हे नाव दिले.

८. १९७४ साली मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला.

त्यांच्यानंतर १९८७साली कुसुमाग्रज यांना हा पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांच्या सोबत चर्चेसाठी दुर्गा भागवत यांचही नाव होत. मात्र दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या आठवणीनुसार दुर्गाबाई यांनीही कुसुमाग्रजांना हा पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती. मराठी साहित्यिकांमधील निकोप स्पर्धा हे दिल्लीमध्ये चर्चेचा विषय होता.

९. १९८२पर्यंत हा पुरस्कार साहित्यकलाकृतीच्या नावाने दिला जायचा. त्यानंतर ज्ञानपीठ साहित्यिकाच्याच नावाने हा पुरस्कार दिला जाऊ लागला.

१९८२मध्ये महादेवी वर्मा यांच्या यामा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ देण्यात आला. त्यानंतर मात्र साहित्यिकांच्या एका कलाकृतीपेक्षा त्यांच्या पूर्ण साहित्यिकप्रवासाला सन्मान म्हणून ज्ञानपीठ दिला जाऊ लागला.

९. अमिताव घोष यांच्या रुपात पहिल्याच इंग्लिश लेखकाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.

राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत लिखाण करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. इंग्लिशही या २२ भाषांच्या यादीमध्ये असलेली  एकमेव परदेशी भाषा आहे. अमिताव घोष हे ज्ञानपीठ जाहीर झालेले पहिलेच इंग्लिश लेखक आहेत.

१०. मराठीमध्ये यापूर्वी२००३ साली विंदा करंदीकर आणि २०१४ साली भालचंद्र नेमाडे यांनाही त्यांच्या साहित्यिक प्रवासासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.