निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यातल्या नेत्यांचं इनकमिंग आऊटगोईंग जोरात सुरूय!

संस्कृती आणि समाज यावर आपल्या इतिहासाचा खूप प्रभाव असतो. ऐतिहासिक घटनांमधून अनेक म्हणी वाक्प्रचार त्या त्या समाजाच्या बोलभाषेत प्रचलित होतात व भाषा समृद्ध होते. हल्ली हल्ली म्हणजे २०१४ पासून भारताच्या राजकारणात ‘आयाराम गयराम’  या म्हणीची जोरदार चलती आहे.

तसा या म्हणीचा इतिहास जास्त काही जुना नाही. पण आज या म्हणीचा आवर्जून उल्लेख करण्याचं कारण आहे, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बरेच नेते इकडून तिकडे तिकडून इकडे जात आहेत. म्हणजे कसं तर पक्षांतर करत आहेत. आणि माध्यमांमध्ये झळकतं आहेत. 

म्हणूनआपला हा लिखाणाचा आणि तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवण्याचा खटाटोप.

तर सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारसे स्थान असत नाही आणि गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात, तर विचारायची सोयच नाही.

गोव्याने राजकीय अवकाशात माकडांना लाजवणार्‍या कोलांटउड्या तीस वर्षांहून जास्त काळ अनुभवल्या आहेत. त्यामुळे आयाराम-गयाराम राजकीय संस्कृतीसाठी गोवा भलताच प्रसिद्ध आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या ४० पैकी तब्बल २७ आमदारांनी पक्षांतर केल होत.

विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना राज्यात पक्षांतराला मोठ्या प्रमाणात ऊत आला. काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो हे तृणमूलमध्ये गेल्यानंतर पक्षांतराला मुहूर्त लागला.  एकापाठोपाठ एक आमदार आपलं स्थान घट्ट करण्यासाठी राजकीय वारं ज्या बाजूनं वाहत आहे त्या बाजूने जाण्यास सुरवात केली. त्यानंतर काँग्रेसचे रवी नाईक यांनी भाजपमध्ये, तर भाजपच्या एलिना साल्ढाना व काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूलला मिठी मारली. गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर, अपक्ष रोहन खंवटे, अपक्ष गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये, तर भाजपचे मायकल लोबो, कार्लोस आल्मेदा, प्रवीण झांट्ये, अपक्ष प्रसाद गावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

४० आमदारांपैकी सुमारे २४ जणांनी आतापर्यंत पक्षांतर केले असून येत्या काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता हेच उत्तरप्रदेश मध्ये बघायला गेलं तर, 

उत्तर प्रदेश निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपला राज्यात एकापाठोपाठ एक खिंडार पडतंच आहे. एकापाठोपाठ एक मंत्री भाजप सोडत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत मंत्री धर्मसिंह सैनी यांच्यासह मुकेश वर्मा, विनय शाक्य आणि बालाप्रसाद अवस्थी या चार आमदारांनी मंत्र्यासह राजीनामे सादर केले.

याआधी मंगळवारी योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी, तर बुधवारी दारासिंह चौहान यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन मंत्र्यांसह या क्षणापर्यंत १४ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या १४ जणांमध्ये, 

स्वामी प्रसाद मौर्य (पडरौना, कुशीनगर), धर्मसिंह सैनी (नकुड, सहारनपूर), भगवती सागर (बिल्हौर), रोशनलाल वर्मा (तिलहर), विनय शाक्य बिधूना (औरैया), अवतारसिंह भडाना (मीरापूर), दारासिंह चौहान (मधुबन, मऊ), ब्रिजेश प्रजापती (तिंदवारी, बांदा), मुकेश वर्मा (शिकोहाबाद, फिरोजाबाद), दिग्विजय नारायण जय चौबे (खलिलाबाद), बालाप्रसाद अवस्थी (धौरहरा, लखीमपूूर), राकेश राठौर (सीतापूर), माधुरी वर्मा (नानपारा, बहराईच), आर. के. शर्मा (बिल्सी, बदायू).

आता या आयाराम गयारामांची लागण पंजबला सुद्धा झालेली दिसते.   

पंजाबमध्ये देखील अनेक नेते पक्ष बदलत आहेत. ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर जोगींदर मान यांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी पक्षाशी असलेले त्यांचे ५० वर्षांचे संबंध तोडले आहेत.

डिसेंबर २०२१ मध्ये शिरोमणी अकाली दलाचा नेता मंजींदर सिंग सिरसाने भाजपमध्ये प्रवेश केला तर पंजाब काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता प्रितपाल सिंग बालिवालने काँग्रेसला रामराम ठोकला. आता सर्वात मोठा धक्का होता तो म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा पण राजीनामा दिला. कॅप्टननी नवा पक्ष काढला. पक्षाला नाव दिलं पंजाब लोक काँग्रेस. आणि हो कॅप्टन काँग्रेस मधून स्वस्तात आऊट झाले नाहीत. तर जाता जाता त्यांनी काँग्रेसचे चार आमदार फोडून आपल्या पक्षात आणले. यात अमरिक सिंग अलिवाल, हरजिंदर सिंग ठेकेदार, प्रेम मित्तल, फर्जाना आलम हे नेते होते.

मणिपूरला ईशान्येकडील राज्यांचे रत्न म्हंटल जातं. 

मणिपूरची सत्ता दीर्घकाळ काँग्रेस आणि मणिपूर पीपल्स पार्टीच्या ताब्यात राहिली. पण सध्या मणिपूर मध्ये भाजपचं सरकार आहे. राज्यात भाजपची मुख्य लढत काँग्रेसशी आहे. २०१६ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एन बीरेन सिंग यांना गळाला लावून भाजपने राज्यात चमत्कार घडवला आणि १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता राज्यातून हाकलून दिली. बिरेन सिंग यांच्या नंतर लेटपाओ हाओकीप यांनी नॅशनल पीपल्स पार्टी सोडून भारतीय जनता पक्षाचं कमळ हाती धरलं.

आत्ताच्या निवडणुकांचं म्हणाल तर कोरुंगथांग यांनी काँग्रेस सोडत कमळ हाती धरलंय. सध्या तरी कोणी कोणता पक्ष सोडून जाणार आहे याची चर्चा मणिपूरात नाही.

आता राहता राहिलं उत्तराखंड 

उत्तराखंडमध्ये सध्या पक्षांतराची काही एवढी चर्चा नाही. मागे ऑक्टोबर २०२१ मध्ये भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य काँग्रेसमध्ये सामील झाले. राज्याच्या राजकारणात दलितांचा मोठा चेहरा समजल्या जाणाऱ्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर २५ वर्ष भाजप मध्ये राहिलेले आणि नंतर आप चे झालेले रवींद्र जुगरान हे परत भाजप मध्ये परतत आहेत. त्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्यांच्या हालचाली दिसून येत नाहीयेत किंवा मग तशा बातम्या नाहीयेत.

हां… आता मोठ्या लेव्हलवर झालेल आम्ही कव्हर केलंय. पण लोकल लेव्हलला कार्यकर्ते पक्ष सोडत असतील तर मग सगळ्यांची नाव देणं अवघड आहे भिडू. त्यामुळे तूर्तास तरी एवढंच ! 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.