नोटिस देवून दरोडा टाकणाऱ्या गंगाखेडच्या रुक्म्या डाकूच नाव अजूनही निघतं..

परभणीच्या परिसरात रुक्माजी नाव कोणाचं नसतं, आणि असेलच तर दिवसातून एकदा का होईना त्याचे मित्र त्याला रुक्म्या डाकू म्हणून हाक मारतात. दहशत, दबदबा आणि लोकांच प्रेम मिळालेला एका दरोडेखोराचा इतिहास देखील महाराष्ट्राने पाहिला होता.

त्या दरोडेखोराच नाव रुक्माजी उर्फ रुक्म्या डाकू.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळील अंतरवेली गावात एका गरिब दलित घरात जन्मलेल्या रुक्म्या परिस्थितीमुळे दरोडेखोर बनला होता पण इतर दरोडेखोरांपेक्षा याचे नियम अन् त्याची तत्व वेगळी होती.

घरातून बायकोला माझी वाट पाहु नको म्हणून निघालेल्या रुक्म्या डाकु सत्तर ते ऐंशीच्या दशकातला सर्वात मोठ्ठा दरोडेखोर म्हणून ओळखला जातो. या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या परिसरात त्याने पन्नासहून अधिक मोठे दरोडे टाकले. त्याची स्वत: वेगळी ओळख होती. त्याच दरोडा फक्त श्रीमंत लोकांच्या घरांवर टाकायचा. ते संपत्ती गरिबामध्ये वाटून टाकायचा आणि त्याहूनही वेगळी गोष्ट म्हणजे रुक्म्या दरोडेखोर या सगळ्या गोष्टी जाहिर सांगूनच करायचा. एखाद्याच्या घरावर रुक्म्या डाकू दरोडा टाकणार असेल तर तो त्या घरावर जाहिर नोटिस लिहून यायचा.

त्यावर लिहलेलं असायचं,

“अमुक अमुक तारखेला तुया घरावर मी दरोडा टाकणार आहे, अन् पोलिसांना सांगीतलस तर सगळ्या खानदानाचा मुडदा पाडीन.”

अन् दरोड्याच्या रात्री हलगीची दवंडी पेटवुन गावात शिरायचा.

सत्तर ऐंशी च्या दशकात कर्नाटक आंध्रप्रदेश अन् महाराष्ट्रात आपल्या जवळील सांडणीच्या मदतीने पन्नासहुन जास्त दरोडे टाकले ज्यांच्याकडं दरोडे टाकले त्यांच्यात आंध्रातील काही आमदारांचा पण समावेश होता. पण त्याच्याविरोधात एकही तक्रार दाखल करण्याच धाडस कुणीच केलं नाही.

रुक्म्या दरोडेखोराची अजून एक खासीयत होती. त्याने इतके दरोडे घातले. सोन-नाणं-पैसा-अडका नेला पण तो कधीच मंगळसुत्र घेवून जात नसायचा. एका दरोड्यात रुक्म्या डाकूच्या साथीदाराने मंगळसुत्र नेलं तर रुक्म्या डाकू परत आला, कशासाठी तर मंगळसुत्र परत करायला.

त्याची अजून एक वेगळी ओळख म्हणजे तो परस्त्रीला हात देखील लावायचा नाही. त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हातारे लोक आवर्जून सांगतात. ते म्हणतात सुरवातीच्या काळातच रुक्म्या डाकूला एक मुलगी आवडली होती. त्या मुलीला देखील रुक्म्या आवडायचा. रुक्म्या मुलीच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेला पण पोरगीच्या बापाने मुलगा दरोडा टाकतो म्हणून रुक्म्या डाकूला नकार दिली. रुक्म्या पोरगीला घेवून पळाला. त्याने तिच्यासोबत लग्न केलं. त्यापुर्वी आणि त्यानंतरच त्याच्या बद्दल परस्त्री बद्दल वाईट अस कधीच काही ऐकण्यात आल नाही.

रुक्म्या गरिबांची मदत करायचा. तो लुटलेले पैसै गरिबात वाटायचा त्यामुळे त्याच्याबद्दल एक सहानभुती निर्माण झाली होती. या सहानभुतीमुळे लोक त्याच्याबद्दल कधीच माहिती देत नसत. त्यांच्याबदल विषय काढल्यानंतर आमच्या गावचं चेअरमन म्हातारं म्हणालं होतं, रुक्म्या आपल्या गावात आठआठ दिवस रहात होता.

एक दिवस रुक्म्या डाकू दरोडा टाकून आपल्या सोबत सोन्यानं भरलेली पिशवी घेवून आडरानाने चालला होता. एका बेसावध क्षणाला एका शेतकऱ्याने आपल्या चारदोन सालगड्यांच्या मदतीने त्याला पकडला. शेतकऱ्याने मोठ्या शिताफीने त्याला पोलीसांच्या ताब्यात दिला.

असं म्हणतात,

की रुकम्याच्या हाताला हातकडी बसत नव्हती ती निसटुन जायची म्हणुन त्याच्या पायात बेड्या घालण्यात आल्या.

इकडं त्याच्या गैरहजरीत गावामध्ये त्याच्या जिवावर त्याचे भाऊ राम्या, लिंब्या, डिग्या, गोईंद्या लोकांना त्रास देऊ लागले होते. त्याच्या दहशतीचा फायदा घेवून गैरकृत्य करण्याचा सपाटा अनेकजण करत होते. अशा एका मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची गोष्ट बाहेर आली. तेव्हा गावातल्या काही जणांनी मिळून त्या चौघांना ठार केले.

हेच प्रकरण अतंरवेली हत्याकांड म्हणून ओळखले जाते. १९८२ साली झालेल्या या हत्याकांडामध्ये उच्च न्यायालयाने १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जेलमधून बाहेर आलेला रुक्म्या मात्र पुर्ण बदलला, त्याने परत दरोडा न टाकण्याचा निश्चय केला. आपल्या भावांच्या हत्येचा बदला घेण्यास देखील त्याने नकार दिला कारण त्याच्या तत्वांमध्ये ते बसत नव्हत. त्यानंतर रुक्म्याने हातभट्टीचा व्यवसाय चालू केला. तो दरोडे टाकत नसला तरी तो संपला नव्हता. पंचक्रोशीत त्याच्या नावाचा दबदबा अजूनही तसाच होता. म्हातारी माणसं सांगतात तो धंद्याला लागलेला पाहून पुढेमागे आपल्याला काही नुकसान नको म्हणून राजकिय नेत्याने त्याला दारू विकण्याचे प्रमाणपत्र त्याच्या घरी जावून दिले.

भावांच्या हत्याकांडानंतर रुकम्या गंगाखेडला दारूचे दुकान चालवु लागला. नंतर त्याला राजकारणाचे वेध लागले आणि बघता बघता त्याने नगराध्यक्ष पदापर्यन्त मजल मारली.

शेवटी रुक्म्या डाकू म्हातारपणातच गेला. रुक्म्याच्या काळात त्याला लपायला, निसटुन जायला मदत करणारे गावोगावचे लोक त्याच्या भेटायला येवू असत. हळुहळु ती गर्दी देखील कमी होतं गेली व रुक्म्या डाकू हे नाव असच काळाच्या पडद्यामागे गेलं. पण आजही एखाद्याचं नाव ऐकलं की लोकं रुक्म्या डाकूच नाव काढतात. त्याच्यासोबतचे किस्से सांगू लागतात. काही वर्षांपुर्वी रुक्मा डाकूवर अंतरवेळी नावाचा सिनेमा देखील आला होता.

हे ही वाचा.

3 Comments
  1. Hiraman says

    मस्त आहे, मी हिरामण बाबू, मूळ चा परभणी चा. हल्ली मुक्काम औरंगाबाद.

    रुक्मया बद्दल एक गोष्ट सांगायची राहिली. ती म्हणजे, तो कोंत्याही भिंतीवर चढायचा म्हणून, पंतप्रधान इंदिरा गांधीने आदेश दीला होता कि, तो कोण रुक्मया डाकू आहे त्याला हजार करा, मला बघायचे आहे त्याला तो कसा भिंतीवर चढतो. ते पाहून तिने त्याची पुढील सजा माफ केली होती व त्याला दारू चे licence इंदिरा गांधी ने दिले होते……

  2. vijay parsode says

    माझे आजोबा सांगायचे की हा गृहस्थ त्याच्या सांडणी वर उलट दिशेला तोंड करून बसत असे आणि आपला कुणी पाठलाग करत नाही ना याची शहानिशा करत असे,

  3. Ravi Dube says

    मी पाहिल त्यांना आमच्या गंगाखेड मधे रहात होते , कित्येकदा त्यांच्या सोबत माझे गप्पा पण झाले , ते भिंतीवर घोरपडी च्या मदतीने चढायचे आणि इंदिरा गांधी सोबत त्यांची भेट झाल्यानंतर हस्तांदोलन करते वेळी त्यांनी अंगठी चोरली हे प्रात्यक्षिक पाहिल्यावर श्रीमती गांधी नी त्याला हे काम सोडून दे तुझी सजा माफ करते व धंद्यांचा परवाना देते म्हणल्यावर त्याने हातभट्टि चे लायसंस दिले ….!

Leave A Reply

Your email address will not be published.