मुंबईचा हा पाटील बाबा घराच्या दारात सोन्याचा ढीग वाळत घालायचा.

ब्रिटीशराज मध्ये असे अनेक अधिकारी होते ज्यांना भारतीय संस्कृतीबद्दल ,इथल्या माणसाबद्दल , इथल्या भाषेबद्दल उत्सुकता होती.

ज्या देशावर राज्य करायसाठी ते सात समुद्र पार करून आले होते त्या अनोळखी देशात अनेक वर्ष काढल्यावर इथल्या मातीचा काहीना काही परिणाम प्रत्येकावर झालाच असणार आहे.

अशा अधिकारयापैकी एक होते एस.एम.एडवर्डस.

१९१०ते १९१५ या काळात एडवर्डस हे मुंबईचे कमिशनर होते. या काळात त्यांनी मुंबई जवळून पाहिली, तिचा अभ्यास केला. या विद्वान अधिकाऱ्याने इंग्लंडला परत गेल्यावर आपल्या लाडक्या मुंबई वर चार पुस्तके लिहिली. या पुस्तकापैकी एक होते “by ways of bombay”. या पुस्तकात त्यांनी हा झुरन पाटलाचा किस्सा सांगितला आहे.

“नाखवा कोली, जात भोली

घरामध्ये द्रव्य महामार,

टोपीवाल्याने हुकुम केला,

बाटलीवाल्याच्या बराबार”

मुंबईच्या कोळीवाड्यात हे गीत फेमस आहे. कमिशनर साहेबांना हे गाण खूप आवडल. त्यांनी त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी त्यांच्या एका मित्राने या गाण्यामागची कथा सांगितली.

सुमारे दिडशे वर्षापूर्वीची गोष्ट. मुंबईमध्ये डोंगरी परिसरात एक श्रीमंत कोळी होता नाव होत झुरन पाटील. पाटीलबाबा मोठे जमीनदार होते . मांडवी परिसरात बरीच जमीन त्यांच्या नावे होती. दर्यातल्या माशांनी त्यांना बरीच संपत्ती मिळवून दिली होती.

घरात अफाट सोननाणं पडून होतं. झुरन पाटील घरातला सोन्याचा ढीग रस्त्यावर धुऊन वाळत घालायचे. येणारी जाणारी माणस पायाला मेण लावून सोने तुडवत जायची आणि त्याला चिकटलेल सोन चोरायची. बिचाऱ्या भोळ्या पाटीलबुवांना वाटायचं की जसं कडक उन्हात वाळल्यानंतर मासे कमी होतात तसंच सोन देखील कमी होत असाव.

त्याकाळचे पारसी अब्जाधीश सर जमशेदजी जीजीभाय बाटलीवाला हे झुरन पाटलांचे मित्र.

त्यांच्याच नावाने पुढे सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स सुरु झाले. एकदा हे सर जेजे पाटलांना भेटायला त्यांच्या घरी गेले. नेहमी प्रमाणे पाटीलबुवांनी घरातले सोने चांदी वाळत घातल होत. त्यावर लक्ष ठेवून दोघे घरासमोरच गप्पा मारत बसले .

योगायोगाने त्यावेळी तिथून नेमकी मुंबईच्या गव्हर्नरची बग्गी चालली होती. लॉर्ड फोकलंड किंवा लॉर्ड एल्फिन्स्टन असावेत. त्यांना जाता जाता हे गमतीदार दृश्य दिसले. त्यांनी बग्गी थांबवली. स्वतः गव्हर्नरला पाहून सर जे जे अभिवादन करायला अदबीने उभे राहिले. रांगड्या पाटलाना या शिष्टाचाराच्या पद्धती माहित नव्हत्या. ते आपल्या जागीच बसून राहिले.

गव्हर्नरनी सर जेजेनां जवळ बोलावलं. त्यांना विचारलं हे कोण? 

जमशेदजीनी भोळ्या पण अतिशय श्रीमंत असलेल्या झुरन पाटलांची इत्यंभूत सगळी माहिती सांगितली. गव्हर्नरना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी पाटलाना विचारलं

“तुमच्याकड एवढी संपत्ती आहे तर त्यापैकी थोडे पैसे सरकारला मदत म्हणून का देत नाही.”

झुरन पाटील म्हणाले,

“त्यात काय. सरकारला जितकी हवी तितकी देईन.”

गव्हर्नर म्हणजे किती जरी झालं तरी भारतात व्यापार करायला आलेल्या कंपनी सरकारचा हा अधिकारी. त्यान झुरन पाटलाना विचारलं, त्याबदल्यात तुम्हाला काय पाहिजे?

पाटीलबुवा म्हणाले,

“सरकार मला माझ्या घराला सोन्याची कौले घालायची परवानगी मिळावी”

गव्हर्नरला ही अजब अट ऐकून हसूच आलं पण त्याने जातीच्या व्यापार्याप्रमाणे त्यातही थोडी घासाघीस केली. अखेर झुरीन पाटीलबाबांना घरावर तांब्याची कौले घालण्याची परवानगी मिळाली. ह्या प्रसंगाच्या वेळी सर जेजे बाटलीवाला तिथे हजर होते . म्हणून त्या गाण्यात शब्द आहेत की,

“टोपी वाल्याने हुकुम केला बाटलीवाल्याच्या बराबर”

पोलीस कमिशनर एडवर्डस आपल्या लेखात म्हणतो की झुरन पाटलांच्या घरावर तांब्याची कौले चढली. तर घर आता डोंगरी स्ट्रीटवर आहे, तिथे त्यांचे वंशज महादेव धर्मा पाटील राहतात. आता तिथे ती तांब्याची कौले नाहीत. कालौघात ती खराब झाली असतील अथवा कोणीतरी चोरून नेली असतील.

आजही मुंबईच्या कोळी समाजात झुरन पाटील यांना आद्य कोळी म्हणून ओळखलं जात.

हे ही वाचा भिडू.

 

1 Comment
  1. Gajanan anjankar says

    छान good excellent

Leave A Reply

Your email address will not be published.