बोर्डाच्या परीक्षेला सर्वात जालीम उपाय म्हणजे आमच्या मराठवाड्याचा, “मंठा पॅटर्न”.

मी लहान असताना मंठ्यात या दिवसात कॉप्या महोत्सव भरायचा. वर्षभर माश्या मारत बसलेले बूक स्टोर, कॉम्प्युटर वर Xप्या बघणारे झेरॉक्स सेंटर आणि लहान-मोठ्या दुकानदारांपासुन तर पोलीस, होमगार्ड, मास्तरांपर्यंत सगळ्यांचा सिजन. मैन रोड वर, शाळा-कॉलेज मागच्या गल्ल्यानी जिगरबाज युवकांची वर्दळ असायची त्यामुळे वातावरणात एक धाडसी पणा तयार होयाचा आणि जिगर ईज ईक्वल टू ‘नाईन्टी’ अन इकडं तर कित्येक नाईन्ट्या लागायच्या…

त्यामुळे वाईन शॉपी, बार आणि मावा-गुटख्याच्या फेमस पानटपऱ्या सगळे धंदे कसे तेजीत असायचे.

एकंदरीत उत्सहवर्धक असा हा महोत्सव.

त्यानंतर ३-४ वेळेस पेपरात कॉपी सेंटर म्हणून मंठ्याच नाव झळकल्याच मला आठवत त्यामुळे मराठवाड्यात बऱ्यापैकी नावलौकिक झाला होता. शेजारी-पाजारी जिल्ह्यातून कॉपी बहादरांनी मंठ्याकड कूच करायला चालू केलं. शाळा-कॉलेज चे ऍडमिशनं अशीही वाढतात हे याठिकाणी बाकीच्या शिक्षण संस्थानी लक्षात घेतलं पाहिजेल.

परीक्षा केंद्रापासून जवळ-जवळ 500 मीटरवर रानात एखादी इंडिका उभा असायची ह्या अशा इंडिका म्हणजे महोत्सवाच्या “वॉर रूम”च. ज्याच्या घरचे किमान दोन मेंबर किंवा नातेवाईकांच्या पोरी परीक्षेला असायच्या त्या युवानेत्याची ही इंडिका, मागच्या सीट वर एम.ए.डि.एड. होऊनपण मास्तर न झालेले दोन कोचिंग क्लास चे मालक प्रश्नपत्रिका सोडवत बसायचे.

एका पानावर दोन उत्तर अशा हिशोबाने ती पान त्या वॉर रूम मधून सुटतं पुढं मग त्याच्या कितीतरी झेरॉक्स पडतात…

इंडिका अन मास्तर लावायची ऐपत नसलेले झेरॉक्स सेंटरवरच उभा असताचे आणि मग चालू होतो असली मर्दानी खेळ. या खेळात पण ‘पोरी फर्स्ट’ हे महिलांच्या हिताचं धोरण काळजीपूर्वक राबवल जायचं. मध्येच मग कुठूनतरी कानावर यायचं ‘अपेक्षित पान नंबर 27-28 वर 5 मार्काचा प्रश्न आलाय’ ‘निबंध कोहिनूर मधला आलाय’ तेव्हा मग 80 रु.च अपेक्षित 120-150 पर्यंत जायचं अन दुकानदार शिव्या द्यायला पण कोणाला वेळ नसायचा.

महोत्सवा दरम्यान शाळा-कॉलेज वर पैसे भरून लागल्यावर फुकटच घसणाऱ्या नवशिक्षकापेक्षा पर्मनंट शिपायाच वजन जास्त असत हे अधिक तीव्रतेने लक्षात येत. पेपर संपत आल्यावर अशाच शिपायांवर कॉप्या-चिठ्या ची विल्हेवाट लावायची महत्त्वाची जीमेदारी असायची. पोर घरी गेल्यावर शिपाई लोक शाळा पाठीमाग अपेक्षित, कोहिनूर, विनर, चिठ्याची होळी करायचे.

नजरेत भरणार दृश्य असायचं ते.

बाकीच्या परीक्षा केंद्रावर पेपर सुटल्यावर हा प्रश्न आला-तो प्रश्न राहिला असल्या पांचट चर्चा ऐकल्या असतील तुम्ही इकडं पेपर सुटल्यावर “XXX मास्तर ने कॉपी हिसकावून घेतली अन त्याच्या पोरीला दिली” पासून तर कोणी किती बांबू खाले, मास्तर ची गचंडी धरली, माझ्या डाव ला दुसऱ्याच कोणीतरी कॉप्या दिल्या पर्यंत वाक्य कानावर येत असायचे.

खेळी-मेळी च्या वातावरणात महोत्सव पार पडायचा.

पुढं मग आबा गृहमंत्री झाल्यावर कॉपी मुक्त महाराष्ट्र राबवल त्यात बैठे पथक-धावते पथक असलं काय-काय चालू झालं आणि त्या दरम्यान या कॉप्याच्या पंढरीत बऱ्याच धाडी पडल्या पण अजूनही मंठ्याचा विध्यार्थी म्हणल की मराठवाड्यातल्या शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आताच्या येणाऱ्या पिढीमध्ये मार्क पडायचा जुनुन राहिला नाही किंवा आशिक मंडळी जिगरबाज राहिली नाही….

काय म्हणावं हल्ली महोत्सव थोडा थंडावला याच दुःख एक दुकानदार म्हणून कायम सलत राहत. पण विद्यार्थी म्हणून मनाला समाधानच वाटत राहिल. 

– पंकज मोरे

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.