डॉ.मनमोहन सिंह यांच्या भेटीचे ‘वो सत्तर मिनिट’…

२६ मे २०१८ ह्या दिवशी मी, सुजय, मेघा, कुमार केतकर सर, किरण शिंपी आणि डॉ.चालसानी आम्ही सगळे डॉ.साहेबांना त्यांच्या घरी दिल्लीत भेटलो. आमचे पुस्तक Dr. Manmohan Singh – A Tempestuous Tenure हे द्यायचे होते. त्या भेटीत काय बोललं गेलं आणि कोणते विषय चर्चेत आले ह्याची गोपनीयता मी पाळणार आहे.

परंतु दोन उदाहरणं मी इथे देईन जी डॉ. मनमोहन सिंह हा काय प्रकार आहे ह्याची योग्य ती झलक देतील.

आम्हाला सकाळी ११ वाजताची वेळ मिळाली होती. आम्ही नव्या ‘महाराष्ट्र सदन’ मध्ये उतरलो असल्यामुळे तिथून कॅब ने त्यांच्या घरी जाणे, वाटेत एक पुष्पगुच्छ विकत घेणे आणि साधारण तिथला सेक्युरिटी चेक-अप ह्या साऱ्याचा अंदाज घेऊन आम्ही १० वाजताच निघालो. त्यांच्या घराबाहेर सेक्युरिटी चेक-अप साठी थांबलो तेव्हा १०:२० झाले होते. SPG असल्यामुळे थोडा वेळ लागला आणि आम्हाला जेव्हा आत सोडले तेव्हा १०:५० झाले होते.

आम्हाला त्यांच्या मीटिंग-रूम मध्ये बसायचे होते. ११ वाजता डॉ. साहेब येतील आणि भेट देतील असं साहजिकच माझ्या मनात होतं.

पण आम्ही त्या खोलीपर्यंत जात असताना मला लांबूनच ओळखीच्या असलेल्या दोन गोष्टी दिसल्या – निळी पगडी आणि पांढरा शुभ्र कुर्ता! तो एक सेकंद आनंद, आश्चर्य आणि दडपण ह्या मिश्रणात गेला. एवढा मोठा माणूस, अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि माजी पंतप्रधान आमची वाट बघत थांबला होता!

आम्ही आधी जाणार मग ठरलेल्या वेळेत ते येणार वगैरे प्रोटोकॉल नाही! डॉ. साहेब समोर येताच त्यांनी ‘So who is the writer this time?’ असं म्हणत माझ्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारला. ‘I am very happy to know about this’ असं पुढे म्हणाले आणि आम्हाला बसायला सांगितले.

ashay gune

आधी सांगितल्याप्रमाणे मी आमची चर्चा ह्या माध्यमावर जाहीर करणार नाहीये. पण जी दोन उदाहरणं सांगणार आहे ती अशी:

‘प्रथम’ मुळे मला आतापर्यंत ९ राज्यांमध्ये कामानिमित्त फिरण्याचा योग आला आहे आणि त्यातील काही खेडी तर दुर्गम म्हणावी अशी देखील आहेत. त्या खेड्यांमधील बदल आणि UPA सरकारच्या सामाजिक क्षेत्रातील योजनांबाबत मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. माझी वाक्य साहजिकच ‘तुमच्या सरकारमुळे’ अशी होती. “तुमच्या सरकारच्या social sector schemes मुळे बऱ्याच लोकांच्या हातात पैसे आले, they became buyers and they are connected due to roads and mobile phones”, असं मी बोलत होतो. तेव्हा माझे हे वाक्य पूर्ण होताच, आणि मी पुढे काही बोलण्याआधी ते स्वतः म्हणाले,

“But you should not forget that there are still many people below the poverty line and till the time we do not lift them up our work will not be finished.”

सरकार म्हणून त्यांना आणि त्यांच्या धोरणांना श्रेय द्यायला जावं तर त्यांचे हे उत्तर होते. पंतप्रधान पद सोडून चार वर्ष झाली पण तरीही ‘आम्ही अमुक केले’ पेक्षा ‘अजून बरेच काही करणे क्षिल्लक आहे’ हा त्यांचा विचार आहे.

दुसरे उदाहरण. हे सुद्धा ‘प्रथम’शी संबंधित.

‘प्रथम’ दर वर्षी जो ‘असर’ हा शिक्षण-संबंधित अहवाल सादर करते त्यात २०१७ ह्या वर्षी असे आढळले होते की २००४ ह्या वर्षी इ.आठवीत असलेल्या मुलांची संख्या ११ मिलियन इतकी होती आणि २०१४ ह्या वर्षी ती २२ मिलियन म्हणजे दुप्पट झाली. ‘प्रथम’ची मांडणी राजकीय नाही. मात्र मला ह्यात social transformation आढळते. कोणत्याही गरीब परिवाराच्या हाती पैसे आले आणि त्याच्या पोटाची सोय झाली की त्यांची पुढची पिढी शाळेत जाऊ लागते असा अर्थशास्त्राचा किंवा अगदी समाजशास्त्राचा नियम आहे.

तर मी त्यांना सांगायला सुरुवात केली, “UPA च्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली आणि हे तुमच्या धोरणांमुळे..”

पण माझे बोलणे मध्येच थांबवून ते मला अगदी शांतपणे म्हणाले,

“मुलं शाळेत जाणं हे बरोबर आहे but their learning levels should also improve.”

सतत पुढच्या ध्येयाचा विचार करणारी माणसं कशी असतात ह्याचे दर्शन मला ह्या भेटीला घडले. त्यांना स्वतःची स्तुती, ‘मी अमुक केलं, मी तमुक केलं’ ह्यात अजिबात रस नसतो. ते त्याच्या पलीकडे केव्हाच गेलेले असतात. त्यांचे आयुष्य हे कर्मकांडात न गुंतून राहता तत्त्वज्ञानाच्या उंच शिखरावर नांदत असतं. त्यामुळे त्यांच्यावर झालेली असंबद्ध टीका, अश्लील शेरेबाजी, पात्रता सोडून बोलली गेलेली वाक्य, अपमान, देशद्रोही किंवा एजंट असल्याचे आरोप (१९९१ ते २०१४) हे सारे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण तो असतो राजकीय कर्मकांडाचा भाग. शिखरावरचे संवाद वेगळेच असतात.

मला सुरुवातीला वाटलं होतं की डॉ. साहेब पुस्तक स्वीकारतील आणि दहा मिनिटे वेळ देतील. मात्र त्या दिवशी ते आमच्याशी ७० मिनिटे बोलले. १०:५० ते १२:०० ‘चक दे’ सिनेमा सारखीच ही माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारी ‘वो सत्तर मिनिट.’  

डॉ सिंह यांची राज्य-सभेची टर्म आता संपणार आहे आणि त्याच बरोबर ते आपल्या सोबत नेहरूवादचा एक मोठा कालखंड घेऊन जाणार आहेत. अर्थव्यवस्थेची वाढ होत राहिली पाहिजे, मात्र त्याच बरोबर वंचितांसाठी कल्याणकारी योजना आणि मानव विकास निर्देशांकात (Human Development Index) सुधारणा व्हावी म्हणून शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्तपन्न या संबंधित योजनांचा सरकारी धोरणात समावेश असावा हा तो विचार आहे.

आणि म्हणूनच, १९९१ चे उदारीकरण आणि नेहरूवाद यात विरोधाभास आहे असं ते मानत नाहीत. पण ते पंतप्रधान असताना ७.५% या सरासरी ने वाढलेल्या अर्थव्यवस्थेने शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, नोकरीची गॅरंटी (नरेगा), नॅशनल हेल्थ मिशन या सारखे लोकाभिमुख निर्णय देखील अनुभवले. त्यामुळे उच्चवर्ग आणि मध्यमवर्ग यांचे उत्पन्न तर वाढलेच, मात्र जवळजवळ १४ कोटी लोकांनी दारिद्र्यरेषा सुद्धा ओलांडली. ही सर्वसमावेशकता ते आपल्या बरोबर घेऊन जातील, कारण आताच्या सरकारच्या धोरणात आणि वर्तनात ती कुठेही नाही.

या व्यतिरिक्त डॉ सिंह हे ‘टीका’ ही लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे आणि ती होऊ द्यावी या पिढीतील नेता आहेत.

१९९१ पासून ते ज्या टीकेला सामोरे जात आहेत (तेव्हा त्यांना वर्ल्ड-बँक एजंट/अमेरिकेचे एजंट म्हणत असत) तो सिलसिला ते २०१४ नंतर विरोधी पक्षात गेले तरीही सुरु होताच. २०१४ नंतर तर सरकार विरोधी पक्षावर (मीडियाच्या साहाय्याने) टीका करीत असल्याचे आपण पाहत आहेत.

त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारवर टीका करावी हे लोकशाहीचे तत्वज्ञान मान्य करणाऱ्या कालखंडातील नेता अशी डॉ. मनमोहन सिंह यांची ओळख इथे नमूद करावी लागेल.

  • भिडू आशय गुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.