दर ६ महिन्यांनी या बेटाचा देश बदलतो…!!!

 

फ्रांस आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान एक बेट असं आहे की ज्याचा देश दर ६ महिन्यांनी बदलतो. विश्वास ठेवायला थोडसं जड जात असलं तरी ही बातमी अगदी खरी आहे. ६ महिने या बेटाची मालकी फ्रांसकडे असते, तर पुढचे ६ महिने स्पेन या बेटावर आपला हक्क सांगतो. विशेष म्हणजे ही अशी देशाच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेची गेल्या ३५० वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे.

१ फेब्रुवारी ते ३१ जुलै पर्यंत या बेटावर स्पेनची मालकी असते आणि त्यानंतर १ ऑगस्ट ते ३१ जानेवारी दरम्यान हे बेट फ्रांसकडे असतं. याच नियमानुसार सध्या बेटाची मालकी स्पेनकडे आहे, जी १ ऑगस्ट २०१८ रोजी परत फ्रांसकडे येईल. अशाप्रकारचं संयुक्त सार्वभौमत्व असणारं हे जगातील सर्वात प्राचीन बेट आहे.

pheasant island
वाटाघाटीदरम्यान स्पेन आणि फ्रांसचे राजे

जग या बेटाला  ‘पीजेंट आईलैंड’ म्हणून ओळखतं. बेटाची लांबी साधारणतः २०० मीटर असून, रुंदी ४० मीटर इतकी आहे. हे एक निर्जन बेट असून ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. फ्रांस आणि स्पेन या देशांच्या सीमांची विभागणी करणाऱ्या ‘बिदासोआ’ नदीच्या किनाऱ्यावर हे बेट आहे. बेटाच्या एका बाजूला फ्रांसचं स्पेनच्या सीमेवरील शेवटचं शहर हेंडेई आहे तर दुसऱ्या बाजूस स्पेनचं फ्रांसच्या सीमेवरील इरून शहर आहे.

बेटाला ऐतिहासिक महत्व आहे. या बेटाच्या मालकीवरून फ्रांस आणि स्पेन या दोन्ही देशांदरम्यान युद्ध झालं होतं. पण शेवटी १६५९ साली युद्धसमाप्तीनंतर जवळपास ३ महिने या बेटावर वाटाघाटीच्या बोलणी या दोन्ही देशांदरम्यान पार पडली. वाटाघाटीअंती या बेटावर दोन्ही देशांची संयुक्त मालकी असेल आणि दर ६ महिन्यांनी हे बेट दोन्ही देश एकमेकांकडे हस्तांतरित करतील असा करार झालेला आहे. ‘पायरेनिस करार’ या नावाने हा करार दोन्ही देशांच्या इतिहासात ओळखला जातो. विशेष म्हणजे या कराराच्या वेळीच फ्रांसचे राजे किंग लुईस चौदावे यांनी स्पेनचे राजे फिलीप चौथे यांच्या मुलीशी लग्न करून या शांतापूर्ण करारास एक ऐतिहासिक महत्व प्राप्त करून दिलं.

2 Comments
  1. Kiran says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.