औरंगजेब महाराष्ट्रात गुंतला होता आणि छत्रपती दिल्लीवर भगवा फडकवण्याच्या तयारीला लागले होते..

राजाराम महाराज.. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र.. महत्वकांक्षी आणि राजनीतीधुरंधर छत्रपती..
एकीकडे औरंगजेब खासा दख्खनेत उतरला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा कुटुंबकबिला, महाराणी येसूबाई राणीसाहेब, शाहू छत्रपती औरंगजेबाच्या कैदेत होते. गादीवर विराजमान असलेला राजा दूर जिंजीत राहून झुंजत होता. तरीसुद्धा मराठ्यांनी औरंगजेबासमोर हार मानली नाही..

राजाराम महाराज इतिहास संशोधकांकडून कायम उपेक्षित राहिलेले छत्रपती. दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या मराठ्यांच्या तरुण राजाने अकरा वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले.

इसवी सन १६८९ ला रायगडाचा पाडाव झाल्यावर राजाराम महाराज दक्षिणेत जिंजी प्रांती निघून गेले आणि तिकडून स्वराज्याचा लढा अखंड सुरू ठेवला.. याच दरम्यान, ४ जून १६९१ रोजी त्यांनी हणमंतराव आणि कृष्णाजी घोरपडेंना एक सनद दिली. ही केवळ सनद नाही तर मराठ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा पुरावा आहे.

राजाराम महाराजांनी प्रचंड मोठी जबाबदारी आपल्या सरदारांवर सोपवली होती. थेट दिल्लीवर हल्ला करण्याची.

राजाराम महाराज काय म्हणतात, ते पाहूया,

“वजारतमाब राजेश्री हणमंतराव घोरपडे गोसावी यासी.. तुम्हाला स्वराज्यात यायचे आहे, स्वामींची सेवा करायची आहे, ही बाब आमच्या कानावर आली आहे. महाराष्ट्रधर्माचे रक्षण तुम्हाला करायचे आहे, हा मनोदय समजला. यामुळे तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवत आहोत..”

राजाराम महाराजांच्या छत्रछायेखाली राहून स्वराज्यसेवा करण्यासाठी हणमंतराव आणि कृष्णाजी घोरपडे उत्सुक होते. या दोघांवर राजाराम महाराजांनी प्रचंड मोठी कामगिरी सोपवली. त्या बदल्यात हणमंतरावांना ५ लक्ष होन तर कृष्णाजींना एक लक्ष होन देण्याचे वचन छत्रपतींनी दिले.
पण हा सरंजाम देण्याचे स्वरूप मात्र जबरदस्त होते.

या सनदेमध्ये राजाराम महाराजांनी ही रक्कम त्यांच्या विजयानुसार वाटून दिली आहे.

रायगड प्रांत काबीज केल्यावर हणमंतरावांना ६२ हजार ५०० होन तर कृष्णाजींना १२ हजार ५०० होनांचा सरंजाम मिळेल. विजापूर प्रांत, भागानगर प्रांत आणि औरंगाबाद घेतल्यावर प्रत्येक विजयमागे हणमंतरावांना ६५ हजार ५०० होन आणि कृष्णाजींना १२ हजार ५०० होन एवढा सरंजाम बक्षीस स्वरूपात देण्याचे मान्य केले..

आणि सर्वात मोठा विजय, दिल्ली काबीज केल्यावर हणमंतरावांना अडीच लक्ष होन तर कृष्णाजींना पन्नास हजार होन सरंजाम बक्षीसस्वरूपात देऊ असे राजाराम महाराज लिहितात..

पत्राची तारीख आहे ४ जून १६९१…

अवघ्या दोन वर्षांआधी छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. महाराणी येसूबाई राणीसाहेब, बाल शाहू आणि इतर महत्वाचे राजपरिवारातील व्यक्ती औरंगजेबाच्या कैदेत होते. रायगड शत्रूच्या ताब्यात होता.

स्वराज्याची राजधानी असलेली जिंजी महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर होती. त्या राजधानीस शत्रूचा वेढा पडलेला. विद्यमान छत्रपती जिंजीस बसून संपूर्ण घडी व्यवस्थित बसावी यासाठी प्रयत्न करत होते.

त्यातल्या त्यात संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव यांसारखे सरदार जिंजीपासून रायगड पर्यंत पसरलेल्या मुलुखात तुफान घौडदौड करत आणि मुघलांना सळो की पळो करून सोडत. सगळं काही अस्तव्यस्त झालं आहे की काय, असं ते वातावरण.

आणि अशा परिस्थितीत, मराठ्यांचा वीस-बावीस वर्षांचा तरुण छत्रपती काय म्हणतो? दिल्लीवर भगवा फडकवा? ही हिम्मत आणि निडरपणा रक्तातच होता…

स्वराज्याची राजधानी आणि औरंगजेबाच्या ताब्यात गेलेलं विजापूर, गोवळकोंडा या शत्रूच्या ताब्यातून सोडवायचं. एवढं करून थांबायचं नाही तर थेट नर्मदा ओलांडून दिल्लीवर हल्ला करायचा. म्हणजे महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेल्या औरंगजेबाचे पाळेमुळे उखडून टाकायचे.

त्याला राजकारणात काटशह द्यायचा आणि दिल्लीवर आपला ताबा प्रस्थापित करून संपूर्ण देशावर मराठ्यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित करायचा. काय थोर राजकारण..

मराठ्यांनी दिल्ली जिंकावी हे शिवरायांचे स्वप्न होते. जर सगळी गणिते जुळून आली असती तर त्यांच्या महान, पराक्रमी पुत्राने दिल्ली जिंकून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असते. अवघ्या दोन वर्षात औरंगजेबाचे फासे पलटवणाऱ्या या महान छत्रपतीस आणि त्यांच्या राजकीय बुद्धीमत्तेस त्रिवार मुजरा.

  • केतन पुरी

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.