बंडाची स्क्रिप्ट सेम वाटत असली, तरी अजित पवार शिंदेंपेक्षा उजवे ठरतात ते या कारणांमुळे…

अजित पवार अखेर भाजपबरोबर गेले. २०१९ च्या निवडणुकांनंतर जवळपास प्रत्येक सहा महिन्यांनी अजित पवार भाजपसोबत जाणार याच्या बातम्या येत होत्या मात्र प्रत्येकवेळी अजित पवार यांना संधी साधता आली नाही. त्यामुळेच पहाटेचा शपथविधी आणि केवळ दोन दिवसांचा उपमुख्यमंत्री होण्याची नामुष्की देखील अजित पवार यांच्यावर ओढवली होती.

 मधल्या काळात तर कोणाच्या ध्यान मनात नसताना एकनाथ शिंदे थेट सरकार उलथवून मुख्यमंत्री झाले. त्यामुळे अजित पवार यांची खिल्ली उडवण्याचे प्रकारही झाले.

आता मात्र अजित पवार यांनी फायनली शरद पवार यांच्याविरोधात बंड केलंय. समर्थक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन भाजपबरोबर जाणं, मग आम्हीच संपूर्ण पक्ष असल्याचा दावा करणं, सत्तेत मंत्रिपद स्वीकारणं यामुळे अजित पवार यांचं हे बंड जरी वरकरणी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचीच स्क्रिप्ट वाटत असली, तरी अनेक कारणांनी अजित पवार यांचं आपलं बंड एकनाथ शिंदेपेक्षा वेगळं आहे.

अजित पवार यांनी बंड आणि बंडानंतर जे निर्णय घेतले आहेत, त्यात त्यांनी राजकारणाच्या बाबतीत ते एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठच असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे अजित पवारांचं बंड एकनाथ शिंदेंपेक्षा कसं वेगळं आहे? कोणत्या गोष्टींमध्ये अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मात दिली आहे? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांनी सर्वात महत्वाची गोष्ट केली आहे ती म्हणजे टायमिंग…

एकनाथ शिंदेंच्या बंडातली सर्वात विरोधात जाणारी गोष्ट ठरली ती म्हणजे बंडाचं टायमिंग. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये महत्वाचे मंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय होतोय असं नॅरेटिव्हही तेव्हा सेट होत नव्हतं. त्याचदरम्यान विधानपरिषद आणी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं देखील फुटली होती.

त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आमदारांसोबत नॉट रिचेबल झाले आणि ठाकरे सरकार पडलं. त्यानंतरही आपल्या पाठीमागे महाशक्ती असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत राहिले. त्यामुळेच भाजपच्या इशाऱ्यावर चालत शिवसेना फोडण्याचा, उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याचा आणि सत्ता असतानाही केवळ मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी केल्याचा आरोप एकनाथ शिदेंवर लागला.

यातूनच खोके सरकारचा ठपका त्यांच्यावर बसला. या आरोपातून सरकारला एक वर्ष झालं तरी एकनाथ शिंदेंना बाहेर पडता आलेलं नाही.

अजित पवार यांनी मात्र योग्य टायमिंग साधत हा गद्दारीचा शिक्का टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्याचा दिसतो.

एकतर आपल्यावर अन्याय होत असल्याचं नॅरेटिव्ह सेट व्हायला त्यांनी वेळ दिला. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीचं कार्यकारी अध्यक्षपद दिल्यानंतर अजित पवार यांच्यावर अन्याय होत असल्याच्या नॅरेटिव्हला बळ दिलं. त्यानंतर संघटनेत काम करण्याची इच्छा असूनही पद दिलं जात नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि परफेक्ट टायमिंग साधत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यातच पक्ष सत्तेत नसल्याने एकनाथ शिंदेंसारखा सत्ता पाडण्याचा आरोपही त्यांच्यावर नाहीये.

त्यामुळे पक्ष फोडण्यावरून अजित पवारांवर टीका झाली असली तरी गद्दारीचा शिक्का मात्र त्यांच्यावर नसणार आहे.

अजित पवार यांचं बंड एकनाथ शिदेंपेक्षा वेगळं ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे आमदारांना घेऊन थेट राजभवनातच पोहोचणं

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची क्रोनोलॉजी बघितली तर, 

आधी सुरत, मग गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ, असा मार्ग आपल्याला दिसतो. यामुळे दबावाचं राजकारण करुन पक्ष फोडल्याचा एकनाथ शिदेंवर आरोप झाला. आमदार गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये असताना हे आमदार आणि एकनाथ शिंदेंबद्दल मोठ्या प्रमाणत अविश्वास निर्माण झाला आणि शिंदे गटाची लोकप्रियता ढासळली. शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी काय डोंगार’ हा डायलॉग ज्या वेगानं व्हायरल होत होता, त्याच वेगानं शिंदेंच्या लोकप्रियेतवर फरक पडत होता.

मात्र अजित पवार यांनी तसं होऊ दिलं नाही. 

अजित पवार यांनी शरद पवार यांना थेट अल्टिमेटम देऊन त्यांच्या डोळ्यादेखत आमदार फिरवले. यामुळे अजित पवार यांची पक्षावर पकड होती. बहुसंख्य आमदार त्यांच्या बाजूने होते, पण तरीही त्यांना संधी दिली जात नव्हती. अशावेळी आमदारांनी स्वखुशीने सत्तेत सहभाग घेतला हे नॅरेटिव्ह सेट करण्यात अजित पवारांना स्कोप असणार आहे.

अजित पवार यांचं बंड एकनाथ शिदेंपेक्षा वेगळं असल्याचं तिसरं कारण म्हणजे बंडानंतरचा मंत्रिमंडळ विस्तार

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर ३० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये महाविकास आघाडीत जे मंत्री होते, त्यांनाच मंत्रिपद हा निकष लावण्यात आला. त्यानंतर आता वर्ष झालं तरी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळ विस्तार करता आलेला नाहीये. आपल्या समर्थक आमदारांची कोणतीही सोय न लावता केवळ मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेले असा आरोप यामुळे अजूनच बळकट झाला.

मात्र अजित पवार यांनी ही चूक टाळली त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना आपल्या आठ समर्थक आमदारांना देखील मंत्री केलं. 

विशेष म्हणजे बंडाच्या पहिल्या दिवशी त्यांनी ९ मंत्रिपद मिळवली. त्यामुळे स्वतःबरोबरच समर्थक आमदारांची सोय अजित पवार यांनी केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मंत्रिपदाचं वाटप करतानाही अजित पवार यांनी त्यांची राजकारणातली समज दाखूवन दिली. 

मंत्रिमंडळात अजित पवार यांनी तीन मराठा, दोन ओबीसी,एक शेड्युल कास्ट, एक आदिवासी, एक महिला आणि एक मुस्लिम असं सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देत त्यांची राजकीय चुणूक दाखवून दिली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातुन चार, मराठवाड्यातून दोन, विदर्भातून एक, खानदेशातून एक, कोकणातून एक असा प्रादेशिक समतोलही ठेवला आहे. त्याचबरोबर अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या तरुण चेहऱ्यांना संधी देत अजित पवार यांनी तरुण आणि ज्येष्ठांचा बॅलन्स करण्याचं गणितही साध्य केलं आहे.

त्यामुळेच जरी शिदेंएवढीच मंत्रिपदं देण्यात आली असली, तरी अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवून दिली आहे.

त्यामुळे त्यांचं बंड हे भावनेत येऊन घेतलेला निर्णय नव्हता तर लॉंग टर्म सत्तेचं राजकारण करण्यासाठी घेतलेला एक प्रॅक्टिकल निर्णय होता हे देखील स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे जरी अजित पवार यांचं बंड एकनाथ शिंदेंच्या बंडासारखंच वाटलं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या बंडातील त्रुटी आणि स्वतःचा राजकीय अनुभव याची अजित पवार यांनी चांगली मोट बांधल्याचं सध्यातरी दिसून येतंय.

हे ही वाच भिडू:

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.