आणि ‘ब्रा’ महिलांच्या अत्याचाराचं प्रतिक ठरलं..

तुम्हाला आठवतंय का?  कोरोनाकाळात ट्विटर, फेसबुकवर एक हॅशटॅग #No_Bra ट्रेंडिंग होता..! या ट्रेंड मध्ये हॉलीवूडच्या जेनिफर लोपेज, रिहाना, केंडल जेनर, सेलेना गोमेज, बेला हदीद पासून ते बॉलीवूड पर्यंतच्या सेलेब्रेटी सुद्धा सहभागी होत्या.

तुम्ही म्हणाल हा असला कसला हॅशटॅग ?

हो ! कोरोनाकाळात वर्क फ्रोम होम असल्यामुळे महिलांना ब्रा घालण्यापासून सुटका मिळाली होती. महिलांनी, मुलींनी तशा पोस्टही सोशल मिडियावर शेअर केल्या होत्या.

हो सोशल मिडीयावरच बोलणार ना उघड उघड जर मुली ब्रा बद्दल बोलायला लागल्या तर ते आपल्या संस्कृतीत बसणार नाही ,असो

आजही लोकं एखाद्या मुलीच्या ‘ब्रा’चे  बेल्ट बघून डिस्टर्ब होतात, आपले हितचिंतक नाही का सांगत “अगं तुझ्या ब्रा चा बेल्ट दिसतोय” असं एकमेकांच्या कानात कुजबुजणारया लोकांमध्ये आपण राहतो.

महिलांच्या कपड्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन च कसा संकुचित आहे त्याबद्दलचा एक किस्सा सांगते…

इटलीमध्ये १९५५ च्या काळात एक फेमस सिंगर होऊन गेली, जूलिया मार्किन नावाची. एक दिवस अचानकच ती शहरातील एका चौकात चौथ-यावर जाऊन उभी राहिली, आणि स्वतः च्या छातीवरील ब्रा काढून जमलेल्या लोकांना ओरडून बोलली की, “किती देणार???

लोकांनी फटाफट..3000 डॉलर पर्यंतची बोली लावली ..!!

हा सगळा प्रकार पाहून ती जोरजोरात हसायला लागली आणि बोलली की , तुम्ही किती मूर्ख लोकं आहात ना ?? स्वतः च्या लैंगिक वासनांसाठी माझ्या कपड्यांवर इतका पैसा खर्च करत करताय.

तेंव्हा कुठं लोकांना कळलं कि ती तिच्यावर नाही तर, तिच्या ब्रा वर बोली लावायला सांगत होती…

 

या घटनेचा अर्थ कळला का ? महिलांच्या एका साध्याशा अंतर्वस्त्त्राला लोकांची बघण्याची मानसिकता इतकी खालच्या स्तरावरची आहे हेच तिला दाखवून द्यायचं होतं…असो

इथं ब्राचे बेल्ट जरी बघीतले तरी समाज अस्वस्थ होतो आणि तिकडे अमेरिकेत ५०-५५ वर्षांपूर्वी एक आगळीवेगळी चळवळ झाली होती.

“ब्रा-बर्निंग बाय फेमिनिस्टस”

१९६८ चा काळ होता. मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धा चालू होती. बाईला एक सुंदर वस्तू सारखं तयार करून प्रदर्शनाला उभं करणं चुकीचं आहे म्हणून या स्पर्धेच्या विरोधात महिलांनी आंदोलनं केलीत.  ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ असं नाव दिलेल्या एका कचर्‍याच्या डब्यामधे हाय हिल्स, ब्युटी प्रोडक्ट , ब्रा फेकल्या.

अर्थातच महिलांनी ब्रा काही शब्दशः जाळल्या नव्हत्या तर, ब्रा ही महिलांवरील अत्याचाराचं प्रतिक असल्याचं म्हणत त्यांनी ब्रा कचरापेटीत फेकून देत निषेध व्यक्त केला होता आणि तेव्हापासून ‘ब्रा बर्निंग’ हि संकल्पना स्त्रीमुक्ती चळवळीशी जोडली गेली होती.

आता तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो कि,

ब्रा हे महिलांच्या अत्याचाराचं प्रतिक कसं काय ठरू शकतं ?

स्त्रीवादी बायका म्हणजे ब्रेसियर्स न घालणार्‍या, हातापायावरचे केस न काढणाऱ्या,आयब्रोज न करणाऱ्या असं कुत्सितपणे म्हणत बऱ्याच स्त्रीवादीविरोधी लोकांनी या चळवळीची खिल्ली उडवली होती.

परंतु यामागचं वास्तव काय हे महिलांनाच माहिती…कारण,

काही मुली,महिला २४-२४ तास ब्रा घालूनच जगतात, ब्रा जर घातली नाही तर आपण बेढब दिसू या भीतीमध्ये त्या जगतात.  आपण चांगलं दिसावं, आपलं शरीर बांधेसूदच असावं, ते पुरुषाच्या नजरेला सुखावणारंच असावं यासाठी महिलांचा केवीलवाणा आटापिटा सुरु असतो. 

‘ब्रा बर्निंग’च्या चळवळीमधून हाच संदेश जातो कि, मला जसं शरीर मिळालं, ज्या आकाराचं मिळालं  त्या शरीरावर माझं प्रेम आहे . मग कोणी काळं असेल, बुटकं असेल, कोणी लठ्ठ असेल, छाती लहान-मोठ्ठी असेल या सगळ्यांनी काही फरक पडत नाही.           

या चळवळीनंतर सौंदर्य म्हणजे शरीराचा एक ठराविक आकार हा समज बदालायला लागला, आणि अंतर्वस्त्रांच्या खपावर त्याचा परिणाम झाला आणि मग कपडे डिझाईन करणाऱ्यांनी सर्वसामान्य महिलांना उपयोगी  आणि आरामदायक अश्या ब्रा डिझाइन करायला सुरूवात केली.

शरीराचा छळ करणाऱ्या घट्ट, वायर्ड ब्रा पासून महिलांची सुटका झाली.

हि चळवळ होती इतिहासातली परंतु दोनच वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातल्या महिलांनी सोशल मिडीयावर अशीच एक चळवळ चालू केली होती.

कोरियन पॉप सिंगर सुलीने स्वतःचा ब्रा न घातलेला फोटो #NoBra या हॅशटॅगसह ब्रा घालणं किंवा न घालणं हा संपूर्ण ‘वैयक्तिक विषय’ आहे असं म्हणत इन्स्टाग्राम वर फोटो शेअर केला. ती एक स्वतंत्र विचारांची  रॅडीकल फेमिनिस्ट होती. तिचे लाखो फॉलोअर्स होते, कुणाला तिची हि कृती आवडली तर कुणाला आवडली नाही. तिने सोशल मिडीयावर सुरु केलेली चळवळ रस्त्यावर उतरली. अनेक सोशल मीडिया युजर्सने तिला ‘अटेन्शन सिकर’ म्हणून टीका केली होती.

मधल्या काळात तिला अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, वाईट प्रकारच्या ट्रोलिंगला हि सामोरं जावं लागलं होतं आणि पॅनिक डिसॉर्डर मुळे तिने शेवटी आत्महत्या केली.

महिलांनी ब्रा घालावी कि नाही याबाबतीत संशोधन काय म्हणतं?

महिलांना निवडीचा अधिकार जरूर आहे. मात्र त्यांनी ब्रा नाही वापरल्या तर त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल, मानदुखी पाठदुखी सारखे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तसच सतत घट्ट ब्रा घातल्यानं देखील पाठदुखी चा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते असं काही संशोधनातून समोर आलेलं आहे.     

त्यामुळे १३ ऑक्टोबर हा दिवस ‘नो ब्रा डे’ नावाने स्तनांच्या कर्करोगाची जनजागृती करीत साजरा केला जातो.

  • मोहिनी जाधव

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.