खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नातून पॉलिटिकल स्पेस तयार करतायत का?

मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा, मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा.

आणि जर हा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा असेल, तर मला मुख्यमंत्री करा,

मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या कर्यक्रमात येऊन संभाजीराजे व्यासपीठावर असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. आणि मग संभाजी राजे आक्रमक झाले. ‘आणि मला मुख्यमंत्री करा’ असं म्हंटले.

त्यांच्या याच वक्तव्यावरून त्यांची छुपी राजकीय आकांक्षा ते आता उघड उघड बोलून दाखवतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरून संभाजीराजे स्वतःसाठी पॉलिटिकल स्पेस तयार करतायत का?

तर यासाठी थोडं मागं गेलं पाहिजे.

खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर २००७ सालापासूनच ते ऍक्टिव्ह आहेत. आणि २०१३ साली त्यांच्याच नेतृत्वात मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मोर्चा काढण्यात आला होता. पण २०१६ नंतर आंदोलन मोठं व्हायला सुरुवात झाली होती.

आता संपूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वावर गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या नाशिकमधील सभेत बोलताना संभाजीराजेंना तेथील उपस्थितांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. तेव्हा संभाजीराजे यांनी म्हटले होते की,

छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार.

आणि त्यानंतर अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे संभाजीराजेंचे नेतृत्व पुढे येत गेले.

त्यानंतर, आपल्या भूमिकेमुळे आपलं राजकीय नुकसान होणार असल्याचं ही वक्तव्य केलं होत. पण त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची खरं तर राजकीय ताकद वाढल्याचंच चित्र आहे. 

संभाजी राजेंनी २००९ सालची लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली. या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला. २०११ पर्यंत ते स्थानिक राजकारणात सक्रीय होते. मात्र, त्यानंतर मात्र त्यांनी राजकारणातून फारकत घेतली होती. त्यांनी आजवर कोणतीच राजकीय भूमिका घेतली नाही. त्यांनी कधी ही कोणती पक्षीय भूमिका घेतली नाही.

मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी वेळ देणं, भेटी घेणं यामुळं मराठा समाजात त्यांना मोठं स्थान मिळालं. २००७ पासून आरक्षणासाठी त्यांनी किमान २ वेळा तरी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तसंच त्यांनी समाजतल्या तरुणांची मोट बांधायला सुरुवात केली. आपले कार्यकर्ते उभे केले. त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या भूमिकेतूनच त्यांची राजकीय ताकद वाढली आहे.

अशातच मराठा आरक्षण प्रश्न चिघळत असताना संभाजीराजेंनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या सोशल मीडियातील चर्चांना हवा दिली होती.

खरं तर संभाजीराजेंना भाजपने राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदार म्हणून नियुक्त केलं होतं. यानंतर संभाजीराजेंनी राज्यसभेत भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारत भाजपशी जवळीक साधली होती. मात्र, भाजपने पक्षात नव्याने आलेल्या मराठा नेत्यांना पक्षात सक्रीय करीत महाराजांना बाजूला ठेवल्याचे चित्र निर्माण झालं होत.

त्यामुळे अस्वस्थ असलेल्या संभाजीराजेंच्या मनात नव्या राजकीय चाचपणीसाठी विचार सुरु आहेत अशी चर्चा सुरु असतानाच, राजे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु झाली. त्यावर संभाजी राजे म्हंटले,

“बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करण्याचा नक्की विचार करू”

त्यामुळे संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करण्यासंदर्भात चाचपणी करत असल्याचे संकेत मिळाले होते.

आता महाराष्ट्रात त्यांना बहुजनांचे बळ मिळावे म्हणून वेळोवेळी आपली भूमिका मांडली. ही भूमिका घेताना ते म्हणतात,

मराठा समाजाला मुख्य प्रवाहात कस आणता येईल यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शाहू आणि शिवाजी महाराज यांचा मी वंशज असल्यानं अठरा पगड जातींना एकत्र ठरवण्याची माझी जबाबदारी आहे.

आणि म्हणूनच संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याच भेटीनंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे राजे आता मराठा आरक्षणावरुन आता थेट बहुजनांच्या राजकारणावर शिफ्ट होतायत.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. भविष्यात हे दोन्ही नेते सोबत येणार या विचारांना बळ मिळण्याचं कारण म्हणजे भेटीनंतरची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हंटले की,

राज्यसत्तेशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.

म्हणजे राजेंनी सत्तेत सहभागी झालं पाहिजे असा त्याचा अर्थ निघतो.

याच पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुती सूमने उधळली. याबरोबरच भविष्यात सोबत काम करण्याचे संकेत देत नव्या राजकीय आघाडीचे सुतोवाचही केले. 

२००९ च्या पराभवानंतर संभाजी राजेंनी स्वतःला जाणीवपूर्वक राजकारणापासून लांब ठेवलं. त्यांनी महाराष्ट्रातल्या जनेतच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केलं. त्यात कालच त्यांचं ‘जाब विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा’ हे वक्तव्य. यावरुन संभाजी राजेंच्या राजकीय आकांक्षांना राजकीय धुमारे फुटत असल्याचं चित्र निर्माण होत आहे.

शाहू महाराजांचे थेट वंशज, मराठा क्रांती मोर्चातील सक्रीय सहभाग, साधेपणा आणि संयमी नेतृत्व अशी संभाजीराजेंची ओळख राज्यभरात आहे. पक्षीय राजकारणात दुभागलेल्या घटकांना संभाजी राजे राजकारणापासून तटस्थ आहेत हा विश्वास मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे आताशा राजकीय वक्तव्य करून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी ते लिटमस टेस्ट करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर बोल भिडूने राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात,

राजेंनी केलेलं वक्तव्य हे काय एवढं सिरियसली केलं नसेल, बोलण्याच्या ओघात, भाषणाच्या ओघात ते तस म्हंटले असतील. मुख्यमंत्री पदासाठी फोकस करण्यासारखं हे वक्तव्य नाही. पण ते पॉलिटिकल स्पेस तयार करत आहेत हे निश्चित. मराठा आरक्षणाच्या प्रश्नातून ते एक रेपो सेट करतायत. त्यांचं हे केलेलं वक्तव्य राजकीय त्यादृष्टीने केलेली चाचपणी, टेस्टिंग वॉटर असू शकेल.

तर विजय चोरमारे यांच्याशी संपर्क साधला असताना ते म्हणतात, 

तर या वक्तव्याला आणि संभाजी राजेंना फार महत्व देण्यासारखं असं काहीच नाही. पॉलिटिकल स्पेसपेक्षा मीडिया फोकस मिळावा या हेतूनं प्रेरित असं हे वक्तव्य आहे. पॉलिटिकल स्पेस तयार करण्याएवढी त्यांची क्षमता नाही. फक्त मराठा आरक्षणाची एकच लाईन घेऊन जाणं कठीण आहे. काही करता टीव्ही वरची जागा मिळते, प्रसिद्धी मिळते तेवढाच उद्देश आहे त्यांचा. आणि आरक्षणाचा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे. इथं बीड, कोल्हापुरात घासून काय होणार?

 तर संभाजीराजेंचे अत्यंत निकटवर्तीय आणि छावा संघटनेचे धनंजय जाधव यावर वक्तव्यावर म्हणतात कि,

ते वक्तव्य केलं यापाठीमागं एक कारण आहे. त्या चर्चेवेळी प्रशोत्तरांचा तास सुरु असताना ओबीसी मधून मागणी का करत नाही? केलीच पाहिजे, या प्रश्नाला अनुसरून हे उत्तर होत.  त्यात त्यांच्या राजकीय भावनेचा अभिनिवेष नव्हता.

मग ही चर्चा खरीच असेल का? 

तर महाराष्ट्र ही राजकीय प्रयोगांची रंगभूमी आहे. त्यामूळे राजकारणातील शिळे’पणा दूर करण्यासाठी त्याला कशाची राजकीय ‘फोडणी’ देऊन ‘ताजेपण’ आणला जाईल हे काही सांगता यायचं नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.