ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते.

आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या दोघांनी ब्रिटीश सत्तेला असे हादरे दिले की ते परत कधीच सावरले नाहीत. क्रांतिसिंह नाना पाटलांचे डावाउजवा हात असणारे संताजी धनाजी म्हणजे जी.डी.बापू (लाड) आणि  नागनाथ आण्णा(नायकवडी).

गणपती दादा लाड अर्थात जी.डी.बापू हे कुंडलचे तर नागनाथ नायकवडी वाळव्याचे.

तो काळ होता जेव्हा सांगली-साताऱ्याच्या गावागांवातून सायकलीला तिरंगा लावून नाना पाटील नावाचं वादळ भिरभिरायच. नागनाथ आणि गणपतीला शाळकरी वयातच या वादळान झपाटल. कोल्हापूरच्या प्रिन्स बोर्डिंगमध्ये त्या दोघांची पहिली भेट झाली. स्वतंत्र भारताच स्वप्न पाहतच त्यांनी आयुष्याचा होम करण्याच्या आणाभाका घेतल्या आणि बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याला भिडले.

कागल तालुक्यातल्या कसबे सांगाव गावच्या पोलीस चौकीवर जी.डी.बापू, नागनाथ आण्णा यांनी दोघा सहकाऱ्याना सोबत घेऊन हल्ला केला आणि तिथल्या बंदुका पळवल्या. पुढे जेव्हा बंदूकाचा तुटवडा भासू लागला तेव्हा दोघांनी पोर्तुगीज गोव्यातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा एक आराखडा विकसित केला आणि हजारो बंदुका या मार्गाने प्रतीसरकारला मिळाल्या.

७ जून १९४३ रोजी जी.डी.बापु आणि नागनाथ आण्णानी आपल्या १८ साथीदारांसह शेणोलीजवळ पे स्पेशल ट्रेन अडवली आणि लुटली. अशा एकाहून एक मोहिमा त्यांनी फत्ते केल्या.

एव्हाना प्रतिसरकारचा पसारा प्रचंड वाढला होता. ब्रिटीश सरकारला पर्यायी सरकार चालवायचे म्हणजे प्रशासन यंत्रणा,न्यायव्यवस्था, पोलीस अशा सर्वच अंगाची गरज होती आणि या सगळ्यासाठी खूप सारा पैसा गरजेचा होता. श्रीमंत जमीनदार आणि सावकारांना लुटून पैसा जमवण्याचा मार्ग क्रां. नाना पाटील यांच्या तत्वात बसत नव्हता.

लुट करायची तर ती ब्रिटीश सरकारची करायची स्वकीयांची नाही याबाबत सर्वांचे एकमत होते.

एकदा क्रांतिकारकांना खबर लागली की १५ एप्रिल १९४४ ला धुळ्याहून नंदुरबारकडे साडे पाच लाखाचा सरकारी खजिना जाणार आहे. बातमी मिळताच जी.डी.बापूंच्या नेतृत्वाखाली सातारच्या आठ क्रांतीकारकांची टीम धुळ्याला रवाना झाली.तिथे त्यांना डॉ. उत्तमराव पाटील आणि रामचंद्र पाटील येवून मिळाले. योजना पक्की झाली.

नंदुरबार जवळच्या चिमठाणे गावाजवळच्या एका चढावावर रस्त्याच्या बरोबरमध्ये दारू पिलेल्या दोन तरुणांची हाणामारी चालली होती. रस्त्याच्याबरोबर मध्ये हे चालू असल्याने रहदारीला अडथला होत होता. कित्येक गाड्या आल्या व गेल्या पण ही हाणामारी थांबत नव्हती.

दुपारी बाराच्या सुमारास एक सर्व्हिस मोटार त्या चढावाजवळ आली. रस्त्याच्या मध्ये चालू असलेल्या या भांडणामुळे गाडीचा वेग कमी झाला. गाडीच्या आत बसलेल्या काही लोकांची या दोघा भांडखोरांबरोबर नजरानजर झाली आणि अचानक काही क्षणात ते दोघे तरूण उठले .त्यांनी गाडी अडवली. गाडीत सरकारी खजिना होता.

ते दोन दारू पिऊन भांडल्याचे नाटक करणारे तरुण होते जी.डी.बापू आणि नागनाथ आण्णा. 

गाडीच्या ड्रायव्हरला याची शंका येताच त्याने वेग वाढवायचा प्रयत्न केला. पण नागनाथ आण्णांनी त्याच्या छातीवर एक गोळी झाडली.  त्याचा ताबा सुटला. त्याचवेळी गाडीत बसलेल्या चार क्रांतिकारकांनी  गाडीच्या आत  खजिन्याच्या सुरक्षिततेसाठी  बसलेल्या पोलिसांवर हल्ला केला व त्यांच्या बंदुका काढून घेतल्या. सर्व प्रवासी थबकले.

मागच्या ट्रक मधून उत्तमराव पाटील आणि शंकरराव माळींनी उड्या टाकल्या. क्रांतिकारकांनी खजिन्याचा ताबा घेतला.

उत्तमराव पाटील, शंकर माळी, धोंडूराम माळी यांना खजिना घेऊन पुढे पाठवले.  नागनाथ अण्णा आणि जी.डी बापू मागे राहिले. तेवढ्यात तिथल्या गर्दीतील  एक लहान मुलगा पळाला आणि त्याने जवळच्या सोनगीर पोलीस स्टेशन ला खबर दिली. पण एव्हाना  सर्वच क्रांतिकारक पसार झाले होते.

खानदेशातले ते उन्हाचे चटके . त्यात प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. रात्र होईपर्यंत पश्चिमेच्या दिशेने पळत राहायचे असा विचार करून सर्व क्रांतिकारक पळत राहिले. पण अखेर घात झालाच. सांयकाळी ६ वाजता पंचवीस तीस बंदुकधारी पोलिसांची एक तुकडी क्रांतिकारक लपलेल्या गावावर चालून आली.

जी.डी बापूनी निर्णय घेतला कि बाकीच्यांनी खजिना घेऊन पुढे निघायचे आणि नागनाथ आण्णा व ते स्वतः असे दोघे पोलिसांबरोबर लढतील.

संध्याकाळ होत होती. पोलिसांचा बेधुंद गोळीबार होत होता. पण जी.डी बापू आणि नागनाथ आण्णा  यांच्याकडे दोन रिव्हॉल्व्हर आणि फक्त वीस गोळ्या !

२५-३० पोलीस, त्यांच्या बरोबर दोनशे तीनशे गाववाल्यांचा बघ्यांचा जमाव विरुद्ध हे दोघे अशी ही विषम लढाई होती.  त्याच वेळी एक गोळी आली आणि जी.डी बापूंच्या पिंढरीतून आरपार झाली. दुसरी गोळी नागनाथ  आण्णांच्या खांद्याला चाटून गेली. तेव्हा मात्र दोघांनी अतिशय त्वेषाने गोळीबार केला. दोन पोलीस जागीच आडवे झाले. अंधारानेही साथ दिली.

पोलीस घाबरले. मागे सरले. तसेच इतर लोकही मागे सरले. आणि नागनाथ आण्णा व बापू त्या सापळ्यातून निसटले. 

उत्तमरावनी शंकरराव माळी यांना घेऊन रातोरात चाळीसगाव तालुक्यातील तळोजा गाठले. साडेपाच लाखांपैकी पाच लाख प्रत्यक्ष क्रांतिकारकांच्या हाताला लागले. ज्यापैकी एक लाख रुपये चळवळीसाठी राष्ट्रीय पातळीवर अच्युतराव पटवर्धन यांच्याकरवी सोपवले. उर्वरित रक्कम प्रतीसरकारच्या भविष्यकालीन योजनांसाठी वापरली गेली.

जी.डी बापू आणि नागनाथ  आण्णा  यांच्या क्रांतिकार्यात जीवावर बेतणारे असे कित्येक प्रसंग आले. पण ते कधीच डळमळले नाहीत. आज नागनाथ आण्णा आणि जी.डी बापू हयात नाहीत. पण प्रिन्स शिवाजी बोर्डिंग च्या प्रांगणात घेतलेल्या शपथा त्यांनी पाळल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा होम केला.

स्वातंत्र्यानंतर देखील गरीब शेतकरी कष्टकरयांचे राज्य आणण्यासाठी स्वतः झिजत राहिले. परकीय गोऱ्यांच्या विरुद्ध लढले. तसेच स्वकीयांच्या दडपशाही विरुद्ध देखील झुंजले. अखेर क्रांतिसिंहच्या तालमीत तयार झालेले पठ्ठे होते ते. हार खातील तर शपथ.    

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.