युध्दपटांच्या गौरवशाली इतिहासात पुढचं पाऊल आणि एक ऍचिव्हमेंट म्हणून या सिनेमाची नोंद होईल.

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं कुणीतरी म्हटलंय. चित्रपटात तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब दिसतं.
युद्धपटांच्या बाबतीतही वेगळी गोष्ट नाही. त्या त्या काळात समाज युद्धाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या पद्धतीचे सिनेमे बनवले जातात. सुरुवातीच्या काळात युद्धाकडे थ्रिल आणि पौरुषत्वाचा आविष्कार म्हणून पाहिलं जायचं. समाजात युद्धज्वर चढलेला असायचा. तेंव्हा त्या पद्धतीचे सिनेमे आले.

पण पहिल्या आणि दुसऱ्या विश्वायुद्धानंतर समाजाचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. युद्धानंतर होणाऱ्या अपरिमित जीवित आणि आर्थिक हानीने समाज होरपळून निघाला. शहरंच्या शहरं उध्वस्त झाली. दोन ते तीन पिढ्या बरबाद झाल्या. याचंही प्रतिबिंब चित्रपटांवर पडलं नसतं तरच नवल.

ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, पॅटन, प्लाटून, एपोकॅलिप्स नाऊ यांसारख्या सिनेमांत ते दिसत गेलं. प्रत्यक्ष युद्धभूमीवरचे हेलावून टाकणारे प्रसंग दाखवणारा स्टीव्हन स्पिलबर्गचा सेव्हिंग प्रायव्हेट रायन हा सिनेमा उत्कृष्ट युद्धपट म्हणून गणला गेला. थिन रेड लाईन, द हर्ट लॉकर, ब्लॅक हॉक डाऊन, इनग्लोरियस बास्टर्डस या सिनेमांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. काही वर्षांपूर्वी आलेल्या डंकर्क या ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाने सिनेमातील वेळ काळाच्या परिमाणांशी खेळत युद्धभूमीवर अडकलेल्या सैनिकांना परत आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नांवर आधारित सिनेमा बनवला.

मागच्या काही दशकांत आलेल्या युद्धपटांचे विषय पाहता जग अजून युध्द सहन करू शकणार नाही. युद्धात दोन्ही बाजूंची माणसं मरतात. त्यातून काही साध्य होत नाही. अपरिमित आर्थिक हानी होते. राजकारणी मात्र त्यांच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी देशाला बिनदिक्कत युद्धाच्या खाईत लोटतात. त्यात सैनिकांचा हकनाक बळी जातो. समाज होरपळून निघतो. सध्या युद्ध नकोय. शांती हवी आहे असा संदेश सिनेमांतून दिला जातोय.

नुकताच रिलीज झालेला 1917 हा पहिल्या महायुद्धातील एका दिवसाचा, एका घटनेचा मागोवा घेणारा व थेट युद्धभूमीवरचा दाहक अनुभव देणारा सिनेमा आहे.

दिग्दर्शक सॅम मेंडीस सिनेमात मानवी नातेसंबंध आणि भावभावनांना कमालीच्या ताकदीने हाताळतो. अमेरिकन ब्युटी या त्याच्या पहिल्या सिनेमाला अकादमीचा पुरस्कार मिळाल्यापासून तो एक महत्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला.

रिव्हॉल्युशनरी रोड, जारहेड, रोड टू पर्डीशन, स्कायफॉल यांसारख्या सिनेमांतून त्याने स्वतःसह प्रेक्षकांनाही समृध्द केलं आहे. स्कायफॉल तर बॉण्डपट आहे. ऍक्शन, अद्ययावत उपकरणं, स्टाईल यांच्या गदारोळात बॉण्डपटात पूर्वी मानवी भावभावनांना दुर्लक्षित केलं जायचं. मेंडीसने मात्र स्वतःचा खास टच देऊन या फिल्मला इतर बॉण्डपटांपेक्षा वेगळं बनवलं. 1917 या सिनेमाद्वारे त्याने एक पाऊल अजून पुढे टाकलं आहे. फिल्मसाठी त्याने आपला आजपर्यंतचा अभ्यास, अनुभव व कौशल्य यांचा पूर्ण ताकदीने वापर केला आहे.

मेंडीस आणि क्रिस्टी विल्सन-केर्नस या दोघांनी बांधीव आणि दमदार पटकथा लिहिली आहे. विशेष म्हणजे क्रिस्टीची ही पहिलीच फिचर फिल्म आहे. सॅम मेंडीसने फिल्मचं अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. ब्लॉकिंग, फ्रेमिंग आणि कलाकारांच्या मूव्हमेंट्स कडक झाल्या आहेत. अगदी एक्सट्रा कलाकारांची कामंही लक्षात राहतात.

या फिल्मची सिनेमॅटोग्राफी अर्थात छायाचित्रण ही अतिशय महत्त्वाची बाजू आहे.

सॅम मेंडीस, कोयेन ब्रदर्स, मार्टिन स्कोर्सेस यांच्यासोबत बरंचसं काम केलेल्या व ब्लेड रनर 2019 साठी अकादमी अवॉर्ड मिळवलेल्या आणि सिनेमॅटोग्राफीचे पितामह समजले गेलेल्या रॉजर डिकन्स यांची या फिल्मची सिनेमॅटोग्राफी पाण्यासारखी प्रवाही व वाऱ्यासारखी मुक्त आहे.

Facebook

फिल्म वन टेक शॉट सारखी चित्रित केली आहे. लक्ष देऊन पाहिलं तर काही ठिकाणी ते लक्षात येतं. पण फिल्मच्या मोशनमध्ये ते इतकं बेमालूमपणे मिसळलं आहे की सहज लक्षात येत नाही. सिनेमा सुरू झाल्यास सुरुवातीची काही मिनिटं कॅमेऱ्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. पण जसं जसं आपण युद्धासाठी खोदलेल्या खंदकात घुसत जातो तसं तसं आपण कॅमेऱ्याचं अस्तित्व विसरून जातो व ब्लेक आणि विल या दोन सैनिकांसह सामोरं येणाऱ्या असंख्य सैनिकांच्या सानिध्यात येतो. काही वेळाने त्यांना एका विशिष्ट कामगिरीवर सोपवलं जातं तेंव्हा आपण त्यांच्या पावलागणिक त्यांच्यासोबत प्रवास करू लागतो.

आपण तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहोत आणि आपल्या समोर सर्व घडतंय असं वाटणं हे या फिल्मचं वैशिष्ट्य आहे. युरोपच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी विस्तृत, हिरवीगार मैदानं, मोहक टेकड्या, चेरीची झाडं, नद्या, पावसाचं सावट असणारं वातावरण, चिखल यांच्या पार्श्वभूमीवर युद्धाच्या खाणाखुणा दाखवणारी, जागोजागी पडलेली, सडलेली माणसांची व जनावरांची प्रेतं, तारांचे जाळे, उध्वस्त रणगाडे, तोफा, ओसाड शहरं, भूमीगत स्ट्रक्चर्स या गोष्टी ज्या पद्धतीने समोर येत राहतात ते पाहून हादरून जायला होतं. एवढ्या सुंदर निसर्गात माणसाने रोमॅण्टिक व्हायला हवं, कविता लिहायला हव्यात, कलांना बहर यायला हवा, समृद्ध आयुष्य जगायला हवं,

पण माणूस काय करतो ? युद्ध !

थॉमस न्यूमॅनचं पार्श्वसंगीत समोरच्या वातावरणाशी आणि तिथे घडणाऱ्या घटनांशी आपल्याला एकरूप करतं. अगदी पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत पार्श्वसंगीत आपल्याला सोबत करतं. आय ऍम अ पुअर वेफेरिंग स्ट्रेंजर हे गाणं सिनेमाच्या परिणामात अजून भर घालतं.

मोठा आवाका असलेलं सिनेमाचं प्रोडक्शन डिझाईन अचूकपणे केलं आहे. बारीक बारीक गोष्टींचा विचार करून अफाट सेट उभे केले आहेत. दूरवर पसरलेले खंदक, त्यांची बांधणी, तारांचे वेटोळे, पडीक शहर, अस्ताव्यस्त पडलेली प्रेतं, आकाशात भिरभिरणारी विमानं असोत की क्षितिजावर धुराचे लोळ उठलेले असोत किंवा निसर्गाचाही वापर सेट म्हणून करणं असो, केवळ कमाल काम केलं आहे. सिनेमाचे कॉस्च्युम्सही अचूक व प्रोडक्शन तसेच सिनेमाच्या मूडला सुसंगत आहेत. शेकडो सैनिकांचे कॉस्च्युम्स बनवून घेणं ही अजून एक अफाट गोष्ट.

हा सिनेमा घडवून आणण्यासाठी काय काय गणितं मांडली असतील, प्रत्येक घटना अचूकपणे कशी घडवून आणली असेल याचा विचार करता अचंबित व्हायला होतं. जॉर्ज मकाय, डीन – चार्ल्स चॅपमॅन या दोन तरुणांनी लान्स कारपोरर्ल्सच्या मुख्य भूमिका कडक केल्या आहेत. मोजून टाकलं जाणारं प्रत्येक पाऊल, प्रत्येक वाक्य, क्षणात बदलणारे प्रसंग, त्यानुसार बदलणारे हावभाव, समोर येणाऱ्या पात्रांना दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, सलग एका लॉंग टेकमध्ये करण्याचं अवघड काम त्यांनी केलं आहे. बदलत गेलेली देहबोली आणि शेवटचा, फ्रंटवरचा सीन जॉर्ज मकायनं ज्या पद्धतीने खेचून आणलाय ते केवळ अप्रतिम !

कोलिन फर्थ आणि बेनेडिक्ट क्यूम्बरबॅच यांचे कॅमिओज प्रभावी झाले आहेत. त्यांना दिलेल्या वेळेत भाव खाऊन जातात. आर्मी ऑफिसर्स म्हणून ते शोभले आहेत. रिचर्ड मॅडन ब्लेकच्या भावाच्या भूमिकेत लक्षात राहतो. छोट्या छोट्या भूमिकांतून समोर येणारे, एखादं वाक्य, एखादा शब्द किंवा नुसता पासिंग सीन असणारे कलाकारही ठळकपणे लक्षात राहतात.

चित्रीकरणाचं नियोजन, कलाकारांना दिलेल्या सूचना, ब्लॉकिंग, क्लूज, टायमिंग आणि हे सर्व एका विशिष्ट कालावधीत घडवून आणण्यासाठी केलेलं दिग्दर्शन अफाट आहे. युद्धासारख्या रुक्ष, हादरवून सोडणाऱ्या विषयावर उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीताच्या साहाय्याने अशी काव्यात्म, सुंदर व त्याचवेळी वास्तववादी व पॅशनेट फिल्म बनवणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण सिनेमा हे असं क्षेत्र आहे जिथे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या जातात आणि सॅम मेंडीसने हे करून दाखवलं आहे.

युध्दपटांच्या गौरवशाली इतिहासात पुढचं पाऊल आणि एक ऍचिव्हमेंट म्हणून या सिनेमाची नोंद होईल.

सैन्यात असलेल्या आपल्या आजोबांकडून लहानपणी युद्धातील किस्से, गोष्टी ऐकलेल्या सॅम मेंडीसला फार पूर्वीच ही फिल्म बनवायची होती पण गोष्टी जुळून येत नव्हत्या. आता ही फिल्म बनवल्यानंतर मेंडीसने आपले आजोबा आल्फ्रेड एच. मेंडीस यांना समर्पित केली आहे.

या वर्षीच्या अकादमी पुरस्कारांसाठी फिल्मला दहा विभागांत नामांकन मिळालं आहे. पैकी सिनेमॅटोग्राफीसह इतर चार ते पाच अवॉर्डस सिनेमाला नक्की मिळतील.

फिल्म सध्या थिएटर्समध्ये आहे. शक्यतो आयमॅक्स किंवा मोठ्यात मोठ्या पडद्यावर पाहायला हवी.

काही फिल्म्स थियटरलाच पहायच्या असतात.

– नारायण शिवाजी अंधारे

Leave A Reply

Your email address will not be published.