शेतकऱ्यांच्या ऊसाचं होणार नुकसान बघून अजित दादांनी मोकाट गायी हाकलल्या होत्या

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल अडचणीत आणेल सांगता येत नाही. पण तरी हट्टाने आपली ग्रामीण पार्श्वभूमी जपणारा नेता म्हणजे अजित दादा पवार.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र, साखर उद्योग यांना रीप्रेझेंट करणाऱ्या नेत्यांच्या पिढीचा शेवटचा शिलेदार.

आजकाल राजकारणाच केंद्र ग्रामीण क्षेत्रातून शहराकडे वळलाय. राजकारणाचीपद्धत चेंज झाली आहे. पण किती तरी टीका टिप्पणी झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण अजित पवारांनी आपली स्टाईल बदलली नाही. याच कारण त्यांच्या रक्तात गावाकडचा रांगडेपणा भिनलाय.

अजित पवार आणि शेती हे एक वेगळ नातं आहे. ते राजकारणात येण्या आधी बारामतीत काही वर्ष ते शेती करत होते. त्यांच शिक्षण काही जास्त नाही. दहावी पास झाल्यावर शेतीची आवड असल्यामुळे झाल्यानंतर अजित पवार शेती कडे वळले. पवार कुटुंबासाठी शेती काही नवीन नव्हती अप्पासाहेब पवारांनी शेतीत अनेक प्रयोग केले होते. आधुनिक तंत्र आणले होती.

त्याकाळात अजित पवार पोल्ट्री, गोठा आणि शेती या तिन्ही गोष्टी मोठ्या कसबीने सांभाळत होते. सकाळी साडे पाच वाजता उठायचं आणि कामाला लागायचं असा त्यांचा दिनक्रम असे. त्यांचे वडील अनंतराव पवार हे अकाळी गेले, त्यामुळे अजित दादांच्या खांद्यावर जबाबदारी लवकर आली आणि त्यातूनच त्यांना बरच काही शिकवलं.

म्हैशींच्या धारा काढायच्या, त्यांना चारा घालायचा, गाडीवरून दुध डेरीत घालून यायचं, परत आल्यावर पोल्ट्री मधील अंडी वेचायची, कोंबड्यांना खाद्य टाकायचे,त्यांना पाणी सोडायचे. आणि मग शेतातले रोजचे काम करायचे . ते झालं की परत संध्याकाळच्या धारा. दादा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे सर्व करायचे, हातात घेतलेलं काम जीव ओतून करायचं. पर्यायचं नव्हता.

अल्पावधीतच अजित पवार प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले. मुख्यमंत्र्याचा पुतण्या कोणताच अहंपणा अंगी न बाळगता चारचौघांच्या सारखं काळ्या मातीत राबतो हे पाहून लोकांमध्ये त्यांच्याबदलचा आदर वाढू लागला.

याच दरम्यान गावात वनगाईंनी धुमाकूळ घातला होता. त्या गाईंची झुंड आली रे आली की एकाच वेळी तब्बल अर्धा एकरातला ऊस खाऊन फस्त करायच्या. आता देवाच्या गायी म्हंटल्यावर त्या गायींना हाकलायची हिंमत कोणी गावकरी करायचा नाही. पण यांतून शेतकऱ्यांच उसाच्या पिकांचं मोठं नुकसान व्हायचं. शेतकऱ्यांच होत असलेल नुकसान दादांना काय पाहवायचं नाही.

यातूनच मग दादांनी या गायींना हुसकवण्याचं काम हातात घेतल. त्यांनी आपले वीस पंचवीस मित्र बोलावले आणि सोबतीला साथ आठ ट्रॅक्टर मागवले. त्या दिवशी रात्री गायींचा कळप आलाय असं दिसताच गायींना हकलायचं काम या सगळ्या गड्यांनी सुरू केलं.

दादांनी गायी हकलल्या म्हंटल्यावर गावकऱ्यांना आधार मिळाला. आणि नंतर उसाची राखण व्हायला लागली.

आपण जे काही करू ते सर्वोत्तम करायचे ही वृत्ती आजी शारदा बाई यांच्या शिकवणीतून आली आहे असं ते सांगतात. या सर्व काळात सामान्य शेतकरी जी सारी कामं करतो ती सर्व अजित पवारांनी केली आहेत. शेण काढणे, धारा काढणे, शेतमाल बाजारात घेऊन जाने सर्व गोष्टी त्यांनी केल्यात पण स्वतःच्या राजकीय जीवनात त्या गोष्टींचा कधीच बाजार केला नाही.

ती त्यावेळची परिस्तिथी होती त्या अनुरूप ज्या गोष्टी करणे गरजेचे होते ते मी केले असच ते म्हणतात.

पुढे त्यांचा बारामतीतला जनसंपर्क बघून शरद पवारांना तिथला आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड करावी लागली. त्यानंतर अजितदादा राजकारणातील एकएक मैलाचा दगड पार करत गेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झाले.

आज त्यांचा आणि शेतीचा थेट संबंधकितपत येत असेल याची कल्पना नाही. पण एकेकाळी त्यांनी शेतात गाळलेला घाम त्यांना आपल्या कार्यकर्त्यांशी जोडून ठेवणारा धागा आहे. शरद पवार अजित पवार या नेत्यांना यश मिळाले कारण त्यांची मुळ जमिनीत घट्ट पसरली होती. हेच यश त्यांच्या पुढच्या पिढीला टिकवणे जड जातंय कारण काळ्या मातीशी संपर्क कमी झालाय हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.