शरद पवारांच्या सावलीतून सुप्रिया सुळे बाहेर आल्या आहेत का?

यंदाच्या टर्मला बारामती लोकसभा मतदारसंघात काट्याची फाईट होणार अस चित्र होतं. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. मागील वर्षी कपबशीच्या चिन्हावर लढण्याची चूक यंदा होणार नव्हती. त्यातही चंद्रकांत पाटलांनी दिवसरात्र हा मतदारसंघ पिंजून काढला होता. महिला उमेदवाराविरोधात एका महिलेलाच तिकीट देवून गणित मांडण्यात आली होती. इलेक्शनच्या आदल्या दिवशी देखील लोकांमध्ये चर्चा होती की यंदा वातावरण टाईट आहे.

पण झालं काय सुप्रियाताई दिड लाखांच्या फरकाने निवडून आल्या.

प्रत्येकाने सुप्रियाताईंच्या विजयाचं गणित मांडण्यास सुरवात केली. कोण म्हणाले ताई लोकसभेत अभ्यासू पद्धतीने मते मांडतात लोकांना ते दिसलं म्हणून मत दिल. तर कोण म्हणालं, लोकसभा मतदार संघातली कामे लोकांना कळाली म्हणून मतं मिळाली. विजयाची कारणे अनेक असतील पण एका शब्दात या विजयाचं गणित सांगायचं झालं तर गेल्या पंधरा वर्षात पवार कुटूंबाच्या बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व तयार केलेल्या सुप्रियाताई सुळे या नावामुळे हे यश खेचून आणण्यात आलं.

पवार कुटूंबातून अजित पवार राजकारणात सक्रिय होतेच. अशा वेळी दूसरं कोण राजकारणात येईल याची शक्यता कमीच होती. मात्र सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. पवार कुटूंब म्हणलं की राजकारणात प्रवेश करणं हि अवघड गोष्ट नव्हती. सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर निवडून आणायचं हा निर्णय पक्षाने घेतला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवसेनेकडून उमेदवार दिला नाही.  २००६ साली अगदी सोप्या पद्धतीने त्या खासदार झाल्या. बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते सुप्रिया लहान असताना आमच्या घरात खेळलेली आहे. ती मुलीसारखी तिच्या विरोधात सेना उमेदवार देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मनाचा हा मोठ्ठेपणा मान्य केला तरी कुठेतरी शरद पवारांच्या राजकारणाच ते यश होतं हे मान्य करावच लागतं. पवारांमुळे पुढचं राजकारण अगदी निवांत जावू शकतं या कल्पनाविलासात सुप्रिया सुळे राहू शकल्या असत्या पण पुढे शरद पवारांनी माढ्यातून उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीतून निवडणूक लढवली.

२००६ असो की २००९. नाही म्हणायला या दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवारांची लेक ही ओळख त्यांच्या सोबत होतीच पण २०१४ आणि २०१९ या निवडणुका पाहिल्या तर शरद पवारांची लेक ही ओळख जावून सुप्रिया सुळे हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं हे खुलेपणाने मान्य करावं लागतं. नेमक्या कोणत्या टप्यात हे झालं सांगण अवघड असलं तरी नेमकं काय झालं हे सांगण तस सोप्प आहे.

दिल्लीतल्या सुप्रियाताई.

शरद पवार यांच्यानंतर दूसऱ्या फळीत कोणता नेता आहे जो दिल्लीत संवाद साधू शकतो. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसोबत मैत्रीचे हितसंबध ठेवू शकतो ? आज सुप्रिया सुळे यांच्याशिवाय राष्ट्रवादी पक्षाकडे दुसरे नाव नाही. सुप्रिया सुळे यांनी जाणिवपुर्वक म्हणा किवा माणसं जोडून घेण्याच्या सवयीमुळे म्हणा पक्षाच्या पलीकडे जावून हे हितसंबध जपले अनुराग ठाकूर, कनिमोळी, हरमनप्रित सिंग बादल यांच्यासोबत त्यांची असणारी मैत्री वारंवार दिसत असते. पक्षाच्या विचारसरणीच्या मर्यादा या मैत्रीत येत नाहीत. मुळात राजकारणात अशी वृत्ती यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अशा निवडक नेत्यांनाच जपता आली.

राजकारणापलीकडे या गोष्टी जपत असताना दूसरीकडे लोकसभेतील प्रगतीपत्रकावर सुप्रिया सुळे क्रमांक एकवरच राहिल्या. वारंवार उत्कृष्ट संसदपट्टूचा किताब असो की खाजगी विधेयक मांडताना केलेला अभ्यास असो. राईट टू डिस्कनेक्ट हे सुप्रिया सुळेंनी मांडलेले विधेयक संपुर्ण भारतात चर्चेचा विषय ठरलं होतं. विविध विषयांवर त्यांनी लोकसभेत केलेली भाषण तर गाजत असतातच.

मतदारसंघात करण्यात आलेली कामे.

सुप्रिया सुळेंनी आपला बालेकिल्ला म्हणून मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही. आरोग्याच्या प्रश्नावर केलेली कामे असतो की सातत्याने दौरे आखून जाणिवपुर्वक स्वत:चा संपर्क वाढवणं असो यातून “सुप्रियाताई” लोकांना परिचित होत गेल्या. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेत्याकडून दोन गोष्टी अपेक्षित असतात. पहिली म्हणजे नेत्यासोबत कार्यकर्त्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट हवा असतो आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असतं. अशा ठिकाणी एक महिला असण्याचा मर्यादा निर्माण होतात. सुप्रिया सुळे मात्र महिला असण्याचा मर्यादेत न राहता कार्यकर्त्यांच्या बुलेटवर बसून सभेच्या ठिकाणी जाताना लोकांनी पाहिल्या. घरातील महिलांसोबत तितक्याच ताकदीने संपर्क वाढवला. आरोग्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी व्यक्तिगत प्रयत्नातून शिबीरे घेण्यास सुरवात केली.

सुप्रिया सुळेंना सुरवातीपासून घराणेशाहीचा आरोप सहन करावा लागला.

घराणेशाहीच्या फायद्याबरोबरच त्याचे दुष्परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागले. कळतय तेव्हा पासून वडिलांवर वेगवेगळे आरोप, यांना काय कमी आहे, हे परदेशातून आले या गोष्टीचा सामना करत आपली कारकीर्द घडवणे ही साधी गोष्ट नसते. जेव्हा सुरवातीला राजकारणात आल्या तेव्हा चर्चा झाली की त्या इंग्लिशमध्ये मराठी बोलतात यांना काय प्रश्नांची समज असणार या सगळ्या गोष्टीना तोंड देत त्या उभ्या राहिल्या. घराणेशाही फक्त निवडणूक जिंकून देते पण सभागृहात अभ्यासपूर्वक प्रश्न मांडणे, तिथल्या चर्चेत प्रभावी बोलून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणे यासाठी घराणेशाही उपयोगी पडत नाही.

घराणेशाही आज महाराष्ट्रात विनोदाचा विषय आहे. आज कुठलाच पक्ष असा नाही की ज्याला घराणेशाहीची लागण झाली नाही. आज लोकसभेत बघायला गेलं तर वीस पंचवीस टक्के खासदार घराणेशाही मधूनच आलेले असतात. पण घराणेशाही संसदरत्न पुरस्कार मिळवायला कामी येत नाही. एखाद स्टेडियम भरेल इतकी मूलं गोळा करून त्यांना कानातील यंत्र वाटप करणे हे कोणालाही सुचत नाही. गावागावातल्या मुलीना शिक्षणासाठी सायकल वाटायचं घराणेशाही मूळ सुचत नाही.जेव्हा तुम्ही मैदानात उतरता मतदारसंघात फिरता तेव्हा तुम्हाला हे प्रश्न जाणवत असतात.संसदेतील उपस्थिती घराणेशाहीमुळे वाढत नाही. ती समज तुम्हाला प्रश्नांची समज आल्यावरच वाढते.

लोकसभेमधील महाराष्ट्रातल्या खासदारांच प्रगतीपुस्तक बघता घराणेशाही पेक्षा कर्तबगारी महत्वाची ठरते.

पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या, मुलींचं शिक्षण सुरु करणाऱ्या महाराष्ट्राला अजून पर्यंत महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. याच कारण काय याचा त्यांनी स्वतःच शोध घेतला पाहिजे. कारण छत्रछायेतून बाहेर येऊन स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणे हे दुर्दैवाने आजपर्यंतच्या कोणत्याही महिला नेतृत्वाला जमले नाही. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात त्या यशस्वी ठरल्या तर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्यांची उणीव भरून काढण्यात त्या यशस्वी ठरतील. पण त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. मुळात ही अपेक्षा महाराष्ट्र कोणाकडूनही करत नाही. ज्या दोन तीन महिला नेत्यांकडून अपेक्षा आहेत त्यात सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.