बिच्छु, बादल आणि जीवन मामा..

काल चॅनेल सर्फिंग करताना कुठल्या तरी चॅनल वर ‘चलते चलते’ मधला जॉनी लिव्हर चा सिन पाहायला मिळाला. एरवी विनोदी भूमिकेत दिसणारा जॉनी इथे थोड्या गंभीर भूमिकेत आहे. बेवडा, एका कुत्र्याची सोबत असलेला, आणि कायम भिकाऱ्यासारखा त्या ठराविक जागीच पडलेला. त्याच्या आयुष्यात काहीतरी ट्रेजेडी घडली असावी. बायको त्याला किंवा बहुतेक जग सोडून गेलेली. शाहरुख जॉनीला जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा जॉनीच्या तोंडी एकच गाणं,- ‘ले जाएंगे ले जाएंगे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे…’ शाहरुखला सांगतो त्याप्रमाणे जॉनीचं आयुष्य ‘सिर्फ एक जिंदगी, एक गाणा’ यातच सामावले आहे.

2003 साली चलते चलते पहिल्यांदा पहिला तेव्हा आश्चर्य वाटायचं. फक्त एका गाण्यात, एका सिनेमात माणसाचं आयुष्य कसं काय सामावू शकतं ? माझ्यासारख्याला जिथे रोज वेगवेगळे सिनेमे पचवल्याशिवाय झोप येत नाही, तिथे एखाद्या माणसाला एक गाणं, एक सिनेमा आयुष्यभर कसा पुरू शकतो ? नंतरच्या वर्षांत सिनेमाने छळलेली, जाळलेली, जगवलेली माणसं पाहून समजलं की पिक्चर मॅक्रो लेव्हलला नसेल करत पण मायक्रो लेव्हल काय काय उलथापालथ करू शकतो !

हि गोष्ट अशाच माझ्या एका मामाची आहे. जीवन मामा. 

तेव्हा मी 10वी ला असेल. जीवन मामा ला ‘मामा’ का म्हणतात ते माहित नव्हतं. वयाने बराच मोठा असला तरी लग्न झालेलं नसल्याने त्याला काका म्हणत नसावे. अशा माणसाला मजाक मध्ये मामा, मामु बोलवलं जातं. ज्या सलूनच्या दुकानात टाईमपास ला आम्ही बसायचो, तिथेच हा मामा दिवसभर पडीक असायचा. सकाळी सलूनवाल्याची सप्तशृंगीच्या गाण्यांची कैसेट वाजवून झाली की बिच्छु-बादल च्या एकत्र गाण्यांची कैसेट वाजवायचा. दुकानात मोजून 4-5 कॅसेटस् असल्याने आलटून पालटून त्याच वाजायच्या.

मला आठवतो तो पिरियड फक्त बिच्छु-बादल च्या गाण्याने भारलेला असायचा. जीवन मामा ची ह्या दोघं पिक्चरची गाणी फेवरेट होती. फेवरेट हा शब्द चुकीचा खरं तर. कारण जीवन ने हि गाणी सोडून दूसरी कुठली गाणी ऐकलीच नसावी. तेव्हा बहुतेक तो ३० एक वर्षांचा असेल पण तोपर्यंत त्याने एक पण पिक्चर पाहिलेला नव्हता. जीवन मामा शोले न पाहिलेला माणूस होता. यावरून आम्ही त्याला चिडवायचो. कधी रंगात आला की माझ्या पॅन्टच्या चैन जवळ हाताने दाबत गाणं म्हणायचा, – ‘कंगन कंगन ना कर यार, कंगन के संग लाया हार…’. बिच्छु च्या ‘दिल टोटे टोटे हो गया’ गाण्याच्या त्या ओळी असायच्या. ‘कुणाला हार देतोय मामा?’ असं विचारल्यावर एक डोळा बंद करून सांगायचा कि सांगायचा कि त्याच्या घराशेजारची कुठलीतरी अंटी आहे, तिला द्यायचय. त्या अंटी बद्दल बरच काही रंगवून सांगायचा. आमच्या पोरांच्या भावना चाळवल्या जात असल्याने आम्ही सुद्धा त्याच्या स्टोर्या उत्सुकतेने ऐकायचो. मात्र जीवन मामा बाहेर गेल्यावर सलून वाला दोस्त सांगायचं कि ‘असं काही नाही. अंटी-बिंटी सगळं भप आहे. याच्या लिंगाला काहीतरी भयानक आजार झाला आहे. काही होत नाही याच्याच्याने.’

मी 11वी ला पोचलो तरी जीवन मामा तिथेच पडलेला असायचा. अजून पण तीच गाणी, बिच्छू-बादल ची. कॉलेजला गेल्यापासून माझं पिक्चर पाहने सुसाट झाले होते. किरणला ते समजल्यावर त्याने विचारलं,

‘बिच्छू चालू असेल का रे थेटरला? किंवा बादल?’

‘नाही रे, दोघ मागच्या वर्षीच येऊन गेले. आत कायचे परत लागतात. बादल असाही काय खास नव्हता. बिच्छू बरा होता त्यामानाने. तू काबर विचारतो ए पण? तू तर असेही कुठेच पिक्चर पाहत नाही ना?’

‘कसेही असो. मला पहायचे ए दोघं. भारी असतील.’ मामाने असं बोलून लगेच ‘जुगनी जुगनी, ओय जुगनी जुगनी’ करत माझ्या पॅन्ट ला हात लावला. आता हे मला असं आवडायचं नाही.

एकदा प्रभात वरून बिपी पाहून येताना भद्रकालीच्या विडीओ हॉल ला बिच्छू आणि बादल दोघी लागलेले दिसले. घरी जाण्याअगोदर सलूनला गेलो अन जीवन मामा ला सांगितले, ‘तुझे दोघी पिक्चर लागले ए रे हॉलला. पाहून..’

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर एवढ्या मोठ्या वयाचा मामा केवीलवान तोंड करत मला सोबत यायचा हट्ट करू लागला. त्याला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. न्हाव्याकडून भाड्याचे, तिकिटचे पैसे घेऊन लगेच भद्रकाली गाठली. 3 ते 6 बिच्छू आणि 6 ते 9 बादल असे दोन शो सलग पाहिले. मला तर तेव्हाही ते पिक्चर सामान्यच वाटलेले. मामा ला काय झालं माहित नाही पिक्चर पाहून तो प्रचंड अस्वस्थ झाला. पिक्चर सुरु होण्याअगोदर मळायला काढलेली तंबाखू त्याने बिच्छू च्या सुरुवातीला हंस राज हंस चं ‘दिल टोटे टोटे गया’ गाण वाजलं तेव्हाच टाकून दिली.

‘ना नशा करो ना वार करो, करना है अगर तो प्यार करो’ ही कडवी छोट्या पडद्यावर पिक्चर पाहताना ऐकली तेव्हा तो अक्षरशः शहारून आला होता. एरवी हसत खेळत असणारा जीवन मामा पिक्चर पाहून अंतर्बाह्य बदलला होता. 

नंतर नंतर तो मोजकच बोलायचा. जेवढ विचारलं तितकच सांगायचा. शेजारच्या अंटीचे किस्से परत त्याने सांगितले नाही. माझ्या पॅन्टच्या चैनीला परत हात लावला नाही. त्याने बिच्छू वा बादल च्या बॉबी देओल सारखे दिसायचा कधीच प्रयत्न केला नाही. बिच्छूच्या ‘जीवा’ चा इंटेन्स लूक आणि स्वभाव मात्र जीवन मामा मध्ये आपोआप उतरला होता. फक्त 3-3 तासाचे दोन टुकार पिक्चर पाहून पडद्यातला हिरो ‘जीवा’ म्हणजेज बॉबी देओल त्याच्या सुख-दुखासहित जीवन मामामध्ये संक्रमित झाला होता.

त्याला आता कुणी मामा म्हटलं कि राग यायचा. तो सांगायचा कि माझ नाव ‘जीवा’ आहे, तशीच हाक मारत चला. दुपारी दुकाना बाहेरच्या बंद कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी आडवं पडून झोप काढण्याऐवजी बसून झोपायचा प्रयत्न करायचा. अगदी बिच्छू मधल्या बॉबी देओल सारखं. भले त्याला तशी झोप लागायची नाही,

पण खुर्चीवर बसल्या बसल्या झोप घेणारा बॉबी देओल जीवन मध्ये इतका भिनला होता कि बिच्छू ची सगळी दुखे तो स्वतःची समजायला लागला होता. त्याच्या अशा विचित्र वागण्याच सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. त्याच्या सोबत काय केमिकल लोचा झालाय हे फक्त मलाच माहित होत. शेजारच्या अंटी सोबत त्याचे संबंध होते असं सांगायचा, त्याच अंटीच्या छोट्या मुलीला शाळेत कुणीतरी त्रास दिला म्हणून हा त्या पोरांना बदडून आला. अंटी सोबत त्याचे काय संबंध होते त्याच त्यालाच माहित.

पण त्या पोरांना दणादण मारताना मी स्वतः पाहिलं आहे. हे सर्व तर अगदी तसच तंतोतंत घडलं, जसं बादल मध्ये बॉबी देओल अमरीश पुरीच्या मुलीला त्रास देणाऱ्या गुंडांना धप्पी देतो. केस, कपडे, राहणीमान अगदीच क्रांतिवीरच्या नाना पाटेकर सारखं असलं तरी बिच्छू-बादल चा बॉबी जीवन मामा मध्ये पुरेपूर उतरला होता.

आम्ही त्या एरीयातून दुसरीकडे राहायला शिफ्ट झालो, तसं त्या सलूनच्या दुकानात माझं जाणं बंदच झालं. पुढे बऱ्याच वर्षांनी चक्कर मारली आणि जीवन बद्दल विचारल तेव्हा तो कुठल्यातरी कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागल्याचं कळालं. माझी कंपनी जवळच असल्याने त्याच्या कंपनीबाहेर वाट पाहत बसलो. बॉबी देओल ला टिबी झाल्यावर जसा चेहरा होईल तसा जीवनचा चेहरा झाला होता. मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन भेटी वाढवल्या. लग्न अजून पण झालेलं नव्हत याचं. हा बिच्छू रोज सायकल ला डबा टांगत अंबड MIDC तुडवायचा.

बिच्छू-बादल चं बाकी सर्व सुटल तरी ‘ज़िन्दगी जो दे, उसे लेलो’ हे तत्वज्ञान त्याने पुरेपूर अवलंबलेलं दिसत होतं! गुड्डू धनोआ बॉबीला घेऊन बिच्छू चा sequel काढतोय असं जीवन ला सांगितलं तेव्हा तो उत्साही झाला, पण क्षणभरच. थोडा वेळ पॉज घेऊन बोलला, ‘जाऊ आपण बिच्छू 2 ला पण’.

कुठला पिक्चर कुणाच्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका बजावतो याला काय नियम. पण अशा व्यक्तीला पिक्चर दाखवणारे आपण आणि त्याच्या बदलणाऱ्या घडामोडींना साक्षीदार पण आपणच यासारखं सुख नाही. काही वर्षांपुरता का होईना मी जीवन ला जवळून पाहिलंय. तो मला नंतर एकदा बोलला पण, ‘त्या पिरिअड मध्ये माझ्यात कसा काय माहित पण बॉबी देओल घुसला होता. मी स्वतहून तसं दाखवायचा प्रयत्न कधीच केला नाही पण मी असा का वागतोय हे कुणाला तरी समजाव असं खूप वाटायचं.

पण तुझ्याशिवाय कुणालाच नाही समजलं ते’ मला मिळालेली सर्वात चांगली कॉम्प्लीमेन्ट होती ती. काही महिन्यांनी जीवन ची आई वारली. मला रात्री 11ला फोन आला. त्याच्या घरात फक्त 5-6 नातेवाईक आणि मी. रडून रडून थकल्यावर रात्री एक दीड वाजता बाहेर आला. खुर्चीवर बसला अन लगेच झोप लागली. पहाटे मला जाग आली तेव्हा तो तसाच झोपला होता. खुर्चीवर बसल्या बसल्या.

मला शून्य सेकंदात ‘बिच्छू’ मधला खुर्चीवर झोप घेणारा बॉबी आठवला. मला आता खरच नाही वाटत आश्चर्य. एक गाणं, एक पिक्चर एखाद्याला आयुष्यभर कसा पुरतो याचं !

  • जितेद्र घाटगे 
Screen Shot 2018 07 07 at 4.46.11 PM
भिडू जितेंद्र घाटगे

 

2 Comments
  1. Deepak says

    दिल को छू लिया भाई तेरी कहाणी ने

Leave A Reply

Your email address will not be published.