प्रत्येकाचा एक खास ‘सिनेमा’ असावा अन ‘सॉंग ऑफ लाईफ’ सुद्धा !!!

मला सिनेमा आणि गाणी थोडेफार समजायला लागले किंवा ‘समजताय’ असा स्वतःचा ‘समज’ झाला तेव्हापासून मी समोरच्याला आवडते सिनेमे, आवडती गाणी याबद्दल विचारणं बंद केलय.

‘A wednesday’ मधला ‘कॉमन मॅन’ म्हणतो की ‘इंसान नाम मे मज़हब ढूंढ लेता है’. अगदी तसंच आपल्या आवडत्या सिनेमाबद्दल, गाण्यांबद्दल समोरच्याला काही सांगताना जरा कचरतो. तुझा पगार किती असं अजूनही विचारणारे काही नग भेटतात. मी आधीच कमी असलेला पगार अजून कमी करून सांगतो. तेव्हा समोरच्या चेहऱ्यावर स्वतःबद्दल कौतुक, माझ्याबद्दल कीव अन मायक्रो सेकंदात माझ्या परिस्थितीबद्दल आखाडे बांधणारे एक्सप्रेशन्स दिसतात. सिनेमाची शपथ घेऊन सांगतो की तेव्हा मला जे वाटतं ते अगदीच किरकोळ असतं.

माझ्या आवडत्या सिनेमाबद्दल समजल्यावर किंवा माझ्या मोबाइलच्या प्लेलिस्टला हात लावून त्यात असणाऱ्या गाण्यांवरून मला जज करणारे भेटतात तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही. मोबाईलला हात लावला तर माझ्याविषयी अत्यंत टोकाची दोन मतं होऊ शकतात. अर्थात स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल unapologetic  राहायला अन समोरच्या जजमेंटल एक्सप्रेशन्सकडे निर्विकारपणे पाहायला शिकलो असलो तरी आधीपासून मी असा नव्हतो. अन त्याच दरम्यान अजाणतेपणी का असेना माझ्या हातून दुखावल्या गेलेल्या मित्राची ही गोष्ट. टेबलाच्या पलीकडे मी होतो तेव्हाची गोष्ट.

विनोद आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. मित्र म्हणता येईल असं नातं तेव्हा नव्हतं. पण मी ज्या ग्रुपच्या मागेमागे घुटमळायचो, त्याच ग्रुपमध्ये विनोद सतत दिसायचा. काही सिनियर अन काही बोलघेवडे पोरं असलेल्या ग्रुपमध्ये आम्ही त्या अर्थाने आऊटसायडर होतो.

ग्रुपमध्ये पिक्चरच्या गप्पा सुरु व्हायच्या तेव्हा माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर काही असायचं. माझा हाच गुण मला इतरांपेक्षा भारी ठरवून जायचा. काही दिवसातच सगळ्यांचा लाडका बनलो. कुठलाही नवीन पिक्चर आला की तो बघायचा की नाही हे मला विचारून ठरवलं जायचं, अन मला अर्थातच फार फार भारी वाटायचं.

विनोदची ग्रुप पोजिशन आधीपासून तशीच. कित्येकांना त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. तो काही अगदीच घुम्या, एकलकोंड्या किंवा माणुसघाण्या नव्हता. चार  चौघात आमच्यासारखं बोलायचा, हसायचा. १७-१८ वयाची पोरं आम्ही. ग्रुपमध्ये रोज नवनवीन ‘तकीया कलाम’ यायचे अन त्यावरून दुसऱ्याला चिडवलं जायचं.

हल्ली ‘सेक्रेड गेम्स’च्या ‘काटेकर’वरून निघालेले मिम्स प्रचंड गाजत आहे. ‘आई xxx काटेकर’ वरून ‘आई जेवली काटेकर’चा अपभ्रंश असणारे मिम्स सोशल मीडियात फिरत आहेत. मी कॉलेजला असताना असच एक वाक्य कुठूनतरी ऐकलं आणि ग्रुप मध्ये मोठायकी करत सगळ्यांसमोर मारलं. ‘तू जेवला का > तुझी आई जेवली का > तुझी आई xxx का > च्याई xxx? > छाया xxx?’ असा तो शब्दांचा खेळ. या शब्दांमागचा विनोद(?) ज्याला समजत नाही त्याला पकडून ‘छाया xxx?’ असं विचारायला फार गम्मत वाटायची. समोरच्याला काही समजत नव्हतं त्यामुळे कोण छाया, तिची आई घालो, मला काय घेणं देणं असं उत्तर द्यायचा, अन ग्रुपमध्ये स्टेडियम गाजवणारा हशा घुमायचा.

विनोद त्या जोकवर पोट धरून हसायचा, पण त्यावेळी तो हसण्याऐवजी गप्प बसला तर जास्त बरा दिसेल एवढा केविलवाणा चेहरा केलेला असायचा. मला काय घंटा फरक पडत होता असाही. मी ‘छाया xxx’ची ट्रिक परत दुसऱ्या कुठल्यातरी नवीन मुलावर ट्राय करायचो.

त्यादिवशी जवळजवळ १०-१२ मुलांचा आमचा ग्रुप पिक्चरला सोबत गेला. ‘हम तुम्हारे है सनम’. पिक्चर लै म्हणजे लै रद्दड निघाला. पण आम्हाला कसला फरक पडतो. मोठ्या आवाजात चेष्टा-मस्करी अन पडद्यावरच्या शाहरुखला शिव्या देणं चालू होतं. विनोद माझ्या शेजारच्या खुर्चीवर होता. ‘तारों का चमकता गहना हो’ ह्या गाण्यात हा गडी ढसाढसा रडायला लागला. मी माझ्या दुसऱ्या बाजूने बसलेल्या मित्राला इशारा करून विनोद रडतोय हे हसून सांगितलं.

‘अबे येडगांड्या, माधुरीचा भाऊ सुद्धा तुझ्याएव्हढा रडत नाहीये’ हे तो इतक्या मोठ्याने विनोदवर हसून ओरडला आणि आमच्या मागच्या पुढच्या २-४  लाईन्मध्ये हशा पिकला. विनोदला पार ओशाळल्यासारखं झालं. त्या हसण्यात माझा आवाज सर्वात जास्त मोठा अन भसाडा होता हे वेगळं सांगायला नको.

मला आठवतंय, माझ्या घरात ऑडिओ कॅसेट रेकॉर्ड करू शकणारा नवीन टेपरेकॉर्डर आला तेव्हा तर मला आकाश ठेंगणं झालेलं. घरात आधीच असंख्य प्रकारची कॅसेट्स असल्याने त्याची कॉपी करून दुसरी कॅसेट्स देण्याचं काम मी मित्रांसाठी सुरू केलं. पैसे घेत नसलो तरी मित्रांमध्ये भाव वधारला होता. एकदा स्टेडियमवर मी एकटाच बसलेलो असताना विनोद आला. खिशातून चिठ्ठी काढली अन गाण्यांची लिस्ट देऊन म्हणाला मलाही ही भरून हवीये.

एक तर मी फक्त एका कॅसेटवरून दुसरी कॅसेट कॉपी करू शकत होतो. अन दुसरं म्हणजे त्याने दिलेल्या लिस्टमधलं एकही गाणं माझ्याकडे नव्हतं. लिस्टच्यावर ‘बिदाई गीत’ असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं अन खाली गाण्यांची अन त्या पिक्चरची नावं. वीसेक गाणी तरी असतील. मुळात एवढी बिदाई गीत बॉलीवूडमध्ये आहेत हेच मला माहित नव्हतं. अन च्यायला बिदाई गीत कुणी ऐकत का! कायपण bc.

‘जानी दुश्मन’चं ‘चलो रे डोली उठाओ कहार’, मिथुनच्या ‘दाता’मधलं ‘बाबुल का ये घर गोरी’, सनी देओलच्या ‘शंकरा’चं ‘बहना ओ बहना’ एवढीच फक्त माझ्या ओळखीची गाणी. मी विनोदकडून लिस्ट ठेऊन घेतली अन सध्या शक्य नाही एवढच बोललो. मोठ्या मुश्किलने हसू दाबत!

दुसऱ्याच्या आवडीवर दात विचकायचा स्वभावच तो. असा थोडीच सुटणार होता. मी दुसऱ्या दिवशी ग्रुपमध्ये विनोद नसताना ती लिस्ट काढली अन सगळ्यांना हसत हसत वाचून दाखवली. त्या दिवशी स्टेडियमवर हसण्याचा आवाज इतका मोठ्ठा होता की अजूनपर्यंत माझ्या कानात घुमतोय.

आठवडाभराची सुट्टी संपल्यावर विनोद कॉलेजला परत यायला लागला. इतक्या दिवस तो कुठे होता हे त्याला कुणीच विचारलं नाही. एवढा कुठे भारी होता का तो. एक मात्र झालं तो समोरून जात असला की ग्रुपमधले काही आगाऊ पोट्टे मुद्दाम ‘बाबूल का ये घर गोरी’ गुणगुणायला लागायचे. आपल्याला पाहून पोरं नेमकी तीच गाणी का म्हणताहेत याबद्दल विनोद पुर्णपणे अनभिज्ञ असावा. मुलांनी तशी गाणी म्हटल्यावर हा हसायचा नाही की चिडायचा नाही. त्याला काहीच फरक पडत नाही हे समजल्यावर पोरांनी चिडवणं बंद केलं.

एक दिवस विनोद एकटाच KTHMच्या बोटक्लबवर बसला होता. मला कुठून कीव आली माहीत नाही पण स्वतःहून जवळ गेलो अन तुझ्या लिस्ट मधल्या गाण्यांचं काय झालं ते विचारलं. मी तसं बोलायचा उशीर, तो लहान मुलासारखा मोठा आवाज करत रडायला लागला. अशा वेळी काय बोलायचं, कसं वागायचं हे मला तेव्हा समजायचं नाही. आताही समजत नाहीच म्हणा. २ मिनिटांनी काही झालच नाही असा आव आणत लगेच गप्प झाला. अगदी नॉर्मल. पुढची ५ मिनिटं मी काहीच न बोलता गंगेत दगड मारत बसलो.

एक टप्पा खाऊन माझा दगड लगेच नदीत पडतो नेहमी. विनोदने खालून ३ दगड उचलले. हात जोरात फिरवत एकेक दगड असा फेकत गेला की त्यातल्या दोन दगडाने चक्क पाण्यात 4 टप्पे खात जीव सोडला, तर तिसरा दगड ३ उंच टप्पे खात नदीपार झाडात जाऊन पडला.

‘छायी xxx !’ मी जोरात ओरडलो.

विनोद माझ्या शेजारी आला अन अगदीच स्वगत असल्यासारखं नदीकडे पाहून बोलू लागला. ‘मागच्या आठवड्यात माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. तिला लग्नानंतर माझी आठवण राहावी म्हणून ती कॅसेट भरून मागत होतो. लग्नाच्या 2 दिवस आधीच घर सोडून पळून गेलीये ती. आता नको ती गाणी. राहू दे. ती गाणी ऐकून आई खूप रडायची. आता ऐकवली तर सहन होणार नाही. बहिणीच्या लग्नात खूप खूप रडावं असं मलाही नेहमी वाटायचं. ह्या पद्धतीने रडेल हा विचार मात्र कधीच केला नव्हता.’

क्षणभर असं वाटलं की मघाशी विनोदने पाण्यात फेकलेली दगडं एकेक करत माझ्या डोक्यात पडत आहेत. टप्पे खात खात कवटीमध्ये घुमत आहेत. ‘तारों का चमकता गहना हो’ पासून ‘बाबूल का ये घर बहना’ पर्यंत कित्येक वेळा त्याच्यावर मित्रांमध्ये हसलोय ते सगळं झर्रकन डोळ्यासमोरून जायला लागलं. त्याने दिलेली लिस्ट मी अख्ख्या ग्रुपसमोर मोठ्याने वाजवून टाळ्या मिळवल्या हे पण आठवलं.

ही गोष्ट विनोद ला समजली तर नसेल ना? अन समजली असेल तर हा माणूस माझ्याशी एवढ्या शांतपणे कसा बोलू शकतो? त्याच्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टचा मी केलेला मजाक त्याला समजला आहे असं जर विनोद बोलला असता तर त्यादिवशी मी पळत जाऊन नदीत उडी मारली असती हे नक्की! त्या दिवसानंतर आम्ही फार कमी वेळा भेटलो असेल. बाहेरून असं समजलं की त्याला घरात दोन मोठ्या बहिणी आहेत. त्यातलीच एक पळून गेलीये.

कॉलेज करणं, लेक्चरला बसणं मला कधी जमलंच नाही. पुढे जाऊन पिक्चर, गाणी, पुस्तकं, भटकणं यात एवढा गुरफटलो की १५-१५ दिवस कॉलेजमध्ये पाय पडायचा नाही. १२ वी फेल झालो होतो मी. नवल काहीच नव्हतं त्यात. मोबाईलचा जमाना नव्हता. आमचा कॉन्टॅक्ट पुर्णपणे तुटला.

काही वर्षांने हा भेटला ते डायरेक्ट माझ्या बायकोकडच्या एका नात्यातल्या लग्नात. नंबर एक्सचेंज केले. मोबाईल अगदीच महागडा अन भारी होता त्याचा. कुतूहल म्हणून हातात घेतला अन सवयीप्रमाणे म्युजिक प्लेयरमध्ये जाऊन ‘लिस्ट’ चेक केली. विनोदच्या मोबाईलमध्ये हिंदी आणि भोजपुरी मिळून एकूण १७३ गाणी असलेलं ‘बिदाई गीत’चं फोल्डर होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गाणी सोडून दुसरं एकही गाणं त्यात नव्हतं. माझ्या सवयीची अजून एकदा लाज वाटली त्यादिवशी.

जाताना मला बोलला, ‘अरे माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न आहे. व्हाट्सअपवर पत्रिका टाकतो. ये नक्की.’ मी तेवढ्यापुरतं हो म्हणून निरोप घेतला. घरी येऊन व्हाट्सअप चेक केलं तेव्हा बहिणीच्या पत्रिकेची सॉफ्ट कॉपी त्यावर होती. अगदीच सहज म्हणून नावाकडे नजर गेली. नवऱ्या मुलीचं म्हणजे त्याच्या मोठ्या बहिणीचं नाव ‘छाया’ होतं. ‘छाया’ नाव घेऊन मी केलेले सगळे जोक त्यादिवशी रात्रभर आठवत होते. बोटक्लबवर विनोद रडला तसाच तासभर बाथरूममध्ये मोठ्या आवाजात रडत होतो.

देव वैगरे मानत नव्हतोच. त्यादिवशी विनोदचा चेहरा डोळयांसमोर आणून हात जोडले ते शेवटचे. त्याला भेटून मी काय काय वागलोय हे सगळं खरं सांगावं अन माफी मागावी असं फार फार वाटत होतं. माझ्यात नव्हती तेवढी हिम्मत. त्याच्या बहिणीच्या लग्नाला गेलो नाही की नंतर कधी मी कॉल सुद्धा केला नाही.

कुणाला कुठलं गाणं आवडेल याचा काय नियम. कुठल्या सिनेमाशी, गाण्याशी कुणाचे कसे भावनिक ऋणानुबंध जुळले असतील याला कसला आलाय तर्क. रडण्याचा आणि दुबळेपणाचा आपल्याकडे विनाकारण संबंध जोडला जातो. दुसऱ्याला बोलून उपयोग नाही. मी स्वतः फार मोठा अपराधी आहे त्याबाबतीत. कोण कुठल्या सिनेमात कुठल्या सिनला रडेल हे अगदीच सापेक्ष आहे.

सो कॉल्ड बॉलीवूड मेलोड्रामा निर्विकारपणे पाहणारा मी जर सिनेमात कौटुंबिक गुंतागुंत असेल तर अनपेक्षितपणे ओढला जातो. माझ्यातला ठुसका समीक्षक बॅकफूटवर येतो. आणि हो. मी आता unapologetically रडतो. कुठलाही संकोच न ठेवता. मला नाही वाटत लाज. माझे  आवडते जख्म, घातक, अपने, कपूर अँड सन्स,  आंखो देखी, Cinderella man पाहताना अगणित वेळा रडतो. हे पिक्चर किती साधारण अन किती ग्रेट याचा मला घंटा फरक पडत नाही. ‘बजरंगी भाईजान’चं ‘चिकन कुकुडू कु’ पाहताना रडतो. ‘दम लगा के हैशा’चं ‘प्रेम थीम’ ऐकताना रडतो. ‘गुलाबजाम’मधली राधा एकट्याने चालायला शिकते तेव्हाही रडतो, ‘सोनू के टीटू की स्वीटी’च्या विनोदी प्रसंगात रडतो आणि गोविंदाचा ‘भाभी’ पाहताना सुद्धा.

काही महिन्यांपूर्वी ‘राज़ी’चं ‘दिलबरो’ पडदयावर पाहिलं अन झटक्यात विनोद आठवला. त्याच्या दुसऱ्या बहिणीच्या लग्नात तरी त्याला मनसोक्त रडायला मिळालं की नाही माहीत नाही. पुरुषांनी रडण्याचा अन दुबळेपणाचा काहीएक संबंध नसतो हे मला फार उशिरा समजलं.

‘जो सोबत असताना कधीच एकटं वाटू नये’ असा प्रत्येकाचा स्वतःचा खास सिनेमा असावा अन ‘सॉग ऑफ दि लाईफ’ सुद्धा. ‘बिदाई गीत’ सोडून कुठलंच गाणं न ऐकणाऱ्या अन कुठलेच सिनेमे न बघणाऱ्या विनोदला ती समज होती अन मला नव्हती इतकच !!!

  • जितेंद्र घाटगे
  • jitendra

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.