अजय देवगणनी वाट लावली.

खरं सांगायचं तर मला तुम्हा सगळ्यांचाच हेवा वाटतो. आपल्या आवडत्या आमिर खान ने गोटी दाढी ठेवली म्हणून स्वतःला शोभत असेल नसेल हा विचार न करता ओठाखाली खुरटं तुम्हाला बिनदिक्कत वाढवता येतं. सलमान च्या ‘तेरे नाम’चा केसांचा विग खरा की खोटा हा विचार सुद्धा मनात न येऊ देता केस वाढवण्याची मुभा आहे तुम्हाला. शाहरुख ने पोनी ठेवली म्हणून तुम्हीही शेंडीला तूप लावून प्रयोग करू शकतात. सैफ सारखं जोडीदाराच्या नावाचं टेम्पररी का असेना टॅटू काढू शकतात. हिरो जुना झाला की ती स्टाईल सोडता येते, केस कापता येतात. गर्लफ्रेंड सोडून गेली की टॅटू खोडता येतं.

हा किस्सा ज्याच्याबद्दल सांगतोय त्याला हे वरवरचे मुखवटे सोयीस्करपणे फेकून देण्याचा पर्याय नव्हता.

आपल्या आवडत्या सिनेमातील आवडत्या पात्राची दुःखे अलगद आपल्यासमोर येऊन उभी राहणे यामागे अनेक सायकॉलॉजीकल कारणे आहेत. यातील मानसशास्त्राची गमंत सोडली तर हा फेनोमेना प्रत्येक सिनेप्रेमीने वयाच्या कुठल्यातरी टप्प्यात अनुभवल्या असावा. माझ्यापुरतं सांगतो.

बच्चन च्या ‘मजबूर’ ने मला लहानपणी वेड लावले होते. मला कधी काळी ब्रेन ट्युमर झालाच तर फॅमिली साठी काय काय करू शकतो अन खुनाचा आरोप स्वतःवर घेऊन परत त्यापासून पिच्छा कसा सोडवू शकतो याचा प्लॅन करताना मनाचे खेळ करायचो. ‘शान’च्या शाकाल ने मला नरभक्षक माशांच्या टॅंक मध्ये सोडलं तर मी तिथून कशा प्रकारे माझी सुटका करून घेईल याच्या शक्यता तपासायचो. माशाच्या पोटात गेल्यावर मी खिशात ठेवलेलं ब्लेड कसं काढेल त्याचं पोट फाडून कसं बाहेर येता येईल याची स्वप्न रंगवायचो.

‘शिवा’ ऐवजी मी असतो अन भवानी ने मला मारायला गुंड पाठवले असते, छोट्या पुतणीला कडेवर घेऊन कसा-कसा कोणत्या बोळकांडातून पळालो असतो याचा फुलप्रूफ प्लॅन माझ्या डोक्यात आहे. माझ्या खऱ्या आयुष्यात जर नंग्या तलवारी घेऊन गुंड मागे लागले तर ‘आघाज’ च्या सुनील शेट्टी सारखं वार झालेल्या रक्ताळलेल्या अंगाला मिरची पावडर थोपटून ओरडणार हे नक्की.

काही पिक्चर इतके आवडतात की त्यांचा परिणाम महिनोंमहिने जात नाही. आपल्यावर परिणाम करणारे सिनेमे जगवतात, जाळतात, तडफडत ठेवतात. माझ्या मनात वेळोवेळी चालणारे हे खेळ मला जगवतात. टेन्शन मध्ये असताना स्ट्रेसबस्टर्स चं काम करतात.

जिन्या मात्र तडफडतोय गेली वीसेक वर्ष! किंवा त्याहून जास्त! सिनेमाने त्याच्या आयुष्यात सोडलेलं एक पिल्लू डोक्यात कायम चकरा मारत राहतं. इवलासा गुंता त्याला एवढ्या वर्षात सोडवता आला नाही. त्याला जबाबदार कोण? अजय देवगण? त्याचे सिनेमे? की अजयने अनेक सिनेमात वारंवार उभी केलेली ‘नाजायज़’ पात्रे!!

‘जिन्या’ची अन माझी मैत्री सुरू कशी अन केव्हापासून झाली हे आता आठवत नाही. पण आम्हाला इतकी वर्षे जोडून ठेवणारा दुआ म्हणजे अजय देवगण आणि त्याचे सिनेमे. सलमान खान, रजनीकांत सारख्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या हिरोंचे फॅन बघितले तर अजब नमुने सापडतात. आयुष्यभर दुसरे कुणाचेच पिक्चर थेटरात बघणार नाही, पण आपल्या आवडत्या हिरोचा कुठलाही पिक्चर, म तो डबडा का असेना हे लोकं आवर्जून टॉकीज मध्ये जाऊन फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात.

‘गर्व’, ‘वीर’ पासून ‘ट्युबलाईट’ सारख्या अशक्य चूत्या कलाकृती यांना केवळ सलमान आहे म्हणून आवडतात. पण ‘जिन्या’ आणि मी ह्या सगळ्या फॅन चं कडबोेळं करून एकाच वेळी ढेकर न देता पचवू शकतो.

अजय चा पिक्चर पाहण्यासाठी आम्ही काय नाही केलं!

पिक्चर पाहायला पैसे नसताना घरातील पेपर ची रद्दी चोरून विकली आहे. बाहेर आडवळणावर पडलेलं भंगार सॅकमध्ये गोळा करून विकलय. एक्साम ला अजून भरपूर वेळ आहे, तेव्हाचं तेव्हा बघू असा विचार करत कॉलेजची पुस्तकं ‘ह्या’ भावात दुकानात परत केली आहे. नाशिकरोडच्या रेजिमेंटल आणि अनुराधा टॉकीज ला तिकीट दर कमी असायचे म्हणून सायकलवर तरी कधी पायी सिडकोहुन स्वतःला तंगाडलं आहे.

थेटरातल्या खाली पडलेल्या रिकाम्या थम्सअप च्या बाटल्या सॅक मध्ये भरून त्यातून पुढच्या पिक्चर साठी पैसे मिळवले आहे. सगळं तसं सेट झालं होतं. अजय ची पात्र आमच्यावर कसा ताबा मिळवत गेली हे पाहणं मात्र चमत्कारिक आहे. मी सगळ्या प्रकारचे आणि सगळ्याच कलाकारांचे सिनेमे बघायचो. त्यामुळे एकाच प्रकारचं पात्र माझ्या डोक्यात नेहमीसाठी भिनत नव्हतं. जिन्या फक्त अजयच्या प्रेमात होता.

आणि इथेच त्या ‘नाजायज़’ फेनोमेना ची सुरुवात झाली असावी.

अजय च्या बहुतांश सिनेमात त्याने साकारलेल्या भूमिका ह्या ठराविक धाग्याने एकमेकांशी जोडलेल्या होत्या. पहिल्याच ‘फुल और कांटे’ मध्ये डॉन नागेश्वर सोबत त्याचं बिनसलेलं आहे. सुहाग, नाजायज, ज़ख़्म, कच्चे धागे, गैर, राजनीती या सिनेमात बापाने मुलाला म्हणजेच अजय ला जन्म देऊन कुठल्यातरी कारणाने दूर गेला आहे.

बापाबद्दल असलेली खदखद सगळ्याच सिनेमात तो चेहऱ्यावर घेऊन वावरला आहे. ‘हलचल’ सिनेमात अजयचा लहानपणापासून सांभाळ करणारे आईबाप हे त्याचे खरे जन्मदाते नाही. जान, ज़ख़्म या सिनेमात आई सोबत अत्यंत तरल बॉंडिंग दाखवलय. जिन्या चं लफडं हे होतं की, आपण सुद्धा अजय सारखे नाजायज पैदा झालोय अन बापाचा बदला घेतल्याशिवाय आपली सुटका नाही. असा केमिकल लोचा त्याच्या डोक्यात झालाय.

वास्तविक पाहता याची घरची परिस्थिती उत्तम होती. आईबाप अत्यंत प्रेमळ तर घरात आर्थिक सुबत्ता. सिनेमा पाहताना काय येडगां#ला काय झटका बसला माहीत नाही, पण ‘ज़ख़्म’ पाहिल्यावर हा अंतर्बाह्य बदलून गेला. म्हणजे बघा एखादा सिनेमा आपल्याला खूप खूप आवडतो. त्यातील पात्रांच्या आपण इतके प्रेमात पडतो कि ते त्या व्यक्तिरेखाच आपलं प्राक्तन होऊन बसतात. सिनेमाच्या हिरो मध्ये स्वताला पाहण्याइतके ते मर्यादित नाही. पिक्चर सुटला तरी त्या व्यक्तिरेखा आपल्या अंगात इतक्या भिनतात कि आपली इच्छा नसतानाही आपला पुढचा प्रवास त्या मुळाबरहुकुम होत असतो.

‘ज़ख़्म’ मध्ये अजयने घातले तसे जिन्या देखील 12 महिने 24 तास फक्त आणि फक्त निळ्या रंगाचे शर्ट घालू लागला. अजय सारखी वन साईड हेअर स्टाईल त्याची नव्हती. केस फक्त एका बाजूला सेट व्हावे म्हणून डाव्या बाजूला कपाळावर वस्तरा मारून घेतला, म्हणजे तिथे कपाळ मोठं दिसुन केसांचा झुपका लांब दिसेल. बरं हे एवढ्यावरच थांबलं असतं तर काय प्रॉब्लम होता. पण नाही प्रत्यक्षात नसलेलं काल्पनिक दुःख सोडवायला हा एवढा गुंतला की आम्ही सोबत असल्यावर बापाला घाण घाण शिव्या हादडायचा. त्याच्या डोक्यात काय भुंगा फिरत होता माहीत नाही.

एक दिवस मिसळ खाताना, वडिलांचा किंवा सिनेमाचा कुठलाही विषय चालू नसताना याने अचानक विचित्र प्रश्न विचारला. 

“तुला माहितीयेका, सिनेमा ला सिने’माँ’ असच का म्हणतात. सिने’बा’ का नाही?

मी नकारार्थी मान हलवली.

“कारण बाप मादर** असतात!”

जिन्या कधी कधी इतका विक्षिप्त वागायचा की डोक्याची मैय्या होऊन जायची. साल्याचा बाप एवढा भारी माणूस होता. अजूनपर्यंत पोरावर त्याने हात उचललेला नव्हता. त्या दिवशी असं वाटलं की हा जे बोलतोय ते याच्या बापापर्यंत कुणीतरी पोचवायला पाहिजे. अन जिन्याला त्यांनी कुत्र्याच्या आईवानी तुडवायला पाहिजे.

आमचं सोबत पिक्चर पाहणं पूर्वीसारखं राहिलं नाही. आता तो फक्त अजय देवगण चे पिक्चर असेल स्वतःहून कॉल करायचा. एरवी दुसऱ्या कुणाच्या पिक्चरला कितीही आग्रह केला तरी तयार झाला नाही. आणि नशीब म्हणजे अजय ला सिनेमात चांगला, समजून घेणारा बाप नंतर मिळालाच नाही. ‘दृश्यम’ पाहिल्यावर जिन्या बोलला, “बघ. असं असतं. अजय ला कधी भारी बाप मिळाला नाही, म्हणून स्वतः चांगल्या बापाचं कर्तव्य निभावतोय.” मी कपाळावर हात मारून घेतला. त्याला बोललो, “अरे केळ्या, तुला कोण म्हणतय की बाप नको बनु. कर की लग्न. तुझ्या बापाने जेवढं तुझ्यासाठी केलं त्याच्या एक टक्का तर करून दाखव”.

“केळं घे!” एवढा एकच शब्द बोलून त्याने विषय बंद केला. अन मी पण त्याला समजावणं बंद केलं.

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत भेटायला आला. मला वाटलं की पोरगा सुधरला असेल. त्याला बोललो,

“अबे सोड ना आता. किती वर्ष तू नाजायज़ सारखा उदास भोसडा घेऊन फिरणार. अजय देवगण सुद्धा आता कॉमेडी रोल करायला लागला. गोलमाल अगेन पाहून ये अन थंड घे.”

तसा जिन्या बोलला,

“त्याला नाही शोभत रे ते काम. सोनम कपूर ला धक धक करने लगा… गाण्यात नाचवण्याचा प्रकार आहे तो.”

हाताने हवेत हॉर्न दाबण्याची ऍक्शन करून हातानेच ‘काय तू…’ असा प्रश्न विचारला. जिन्या सुधारण्यापलीकडे गेलाय हे मला कळून चुकलं होतं.

अजय देवगण ने एखाद्या पिक्चर मध्ये असा रोल करायला हवा ज्यात त्याचं बापासोबत सगळं आलबेल आहे. किंवा म त्याला सिनेमापूरता का असेना आदर्श बाप वैगरे लाभेल. स्वप्नाळू आणि रोमॅंटिसीजम असणाऱ्या भूमिका तो इतके वर्ष टाळत आलाय की आता पन्नाशी गाठल्यानंतर गुडीगुडी फॅमिलीपटाच्या ट्रॅक वर येणं तसं अशक्यच. साला नेहमीच कसं फक्त ह्या मोठ्या सुपरस्टार हिरोंना पडद्यावर भारी बाप मिळतात! अनुपम खेर अन बच्चन सारखे कुल बाप अजय ला का मिळत नसतील? जिन्याच्या खऱ्या आयुष्यात अजिबात नसलेला तिढा सिने’माँ’ने सोडवावा ही माझी मनापासून इच्छा होती.

हल्ली जिन्या जास्त सिनेमे पाहत नाही. स्वतःचा छोटा व्यवसाय आहे, बापासोबत सांभाळतो. पण दिवसभर सोबत काम करून सुद्धा जन्मदात्याबद्दल विनाकारण मनात अढी ठेऊन बसलाय. तेव्हा ‘आपला माणूस’ रिलीज झाला तेव्हा, ‘त्यामध्ये अजय पाहुणा कलाकार आहे, आपल्याला जावेच लागेल बाबा’  असं म्हणत बळजबरी पिक्चरला घेऊन गेलो. नाना पाटेकर ला अनेक वर्षांपासून एकटं पाडून परदेशात गेलेला मुलगा अचानक शेवटी वापस येतो अन बापाच्या हातात हात देतो.

अजय ने काही सेकंदांचा साकारलेला रोल फार विशेष नाही, पण मला त्या वेळी फार महत्वाचा वाटला. जिन्या ची अनेक वर्षांची इच्छा छोट्या सिन ने पूर्ण केली होती. डोळ्यात साचलेलं पाणी त्याने नेहमीसारखं पिऊन न घेता मनसोक्तपणे गालावर वाहू दिलं. पिक्चर सुटल्यावर आम्ही दोघं काहीच न बोलता बाईक घेऊन आपापल्या मार्गाला लागलो. ‘आपला माणूस’ मला काय एवढा आवडला नव्हता. पण जिन्या ला शेवटचा सिन भिडला होता.

रस्त्यात बाईक थांबवली आणि सदानंद बेंद्रेंच्या २ ओळी त्याला व्हाट्सअप केल्या. 

‘बाप असताना मिठी मारून घ्या रे, 

आठवण आभास देते स्पर्श नाही’

 

बरेच दिवस त्याचा मेसेज, कॉल नव्हता. परवा त्याच्या वर्कशॉप वर सहज भेटायला गेलो. वडिलांचा व्यवसाय सांभाळायला लागल्यापासून बापाच्या खुर्चीवर बसला नव्हता. बापाशी त्याचे संबंध सध्या कसे आहे याबद्दल विचारलं नाही. बरे नसतील तर होईल हळूहळू. एवढ्या वर्षांनंतर का होईना त्याच्या अंगावर निळा शर्ट नाहीये हे बघून मात्र फार बरं वाटलं. सिनेमाने दिलेल्या दुःखाला सिनेमाच उतारा असतो हे खरं !

  • जितेंद्र घाटगे.

हे ही वाचा. 

4 Comments
  1. साईनाथ राऊत says

    मस्त लिहिता सर….

  2. Kundan says

    १ नंबर, भिडू नाशिककरानी लिहिलेला लेख वाचून भारीच वाटलं, चला म्हणजे आमचे नाशिककर पण आहेत तुमच्या टीममध्ये .

  3. Babu Karad says

    रापचीक लिहिता राव मनाला भिडून गेलं.

  4. Amol says

    सिडकोत राहत असताना खूप ‘अजय देवगण” बघितले होते 90 च्या दशकात! आज एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    मस्त नाशिक स्टाईल भाषेत लेख लिहिला!

Leave A Reply

Your email address will not be published.