इस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई देगी…

“डॉक्टर डैंग को आज पहली बार किसी ने थप्पड़ मारा है..फर्स्ट टाइम..इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने..इस गूंज की गूंज तुम्हें सुनाई देगी…पूरी ज़िंदगी सुनाई देगी.”

एका थोबाडीत मारल्याचे पडसाद खूप लांबपर्यंत उमटतात याचा किस्सा आपल्याला पहिल्यांदा सांगितला सुभाष घईंच्या कर्मा पिक्चरमधल्या डॉक्टर डैंगने. पण याचा शेवट मृत्यूत होत असेल हे सांगितलं नव्हतं. पण ते दिसलय पश्चिम बंगालमध्ये..

पश्चिम बंगालमध्ये, भाजपाचा कार्यकर्ता देबाशिष आचार्य याचा गुरुवारी, १७ जून रोजी संशयास्पद मृत्यू झालाय. हा तोच देबाशीष आचार्य आहे ज्याने २०१५ मध्ये भर जाहीर सभेत अभिषेक बॅनर्जी यांना मंचावर जाऊन थोबाडीत मारली होती. 

आणि आता या देबाशीष आचार्यच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. देबाशिषच्या कुटुंबीयांनी अभिषेक बॅनर्जींवर देबाशीषचा खून केल्याचा आरोप केलाय.

देबाशीषला रुग्णालयात दाखल करणारे झालेत गायब..

देबाशीष आचार्यला १७ जूनच्या पहाटे काही जणांनी गंभीर अवस्थेत मिदनापूरच्या टॉमलक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. आज तकचे प्रतिनिधी अनुपम मिश्रा यांनी रुग्णालयाच्या नोंदीचा हवाला देत सांगितले की,

पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी काही लोक देबाशिषला रुग्णालयात घेऊन आले होते. देबाशिषला दाखल करून घेतल्यानंतर ते लोक तेथून निघून गेले. जखमी देबाशिषचा दुपारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची माहिती देबाशिषच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस अधिकारीही रुग्णालयात पोहोचले.

पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले की, १६ जूनच्या रात्री देबाशिष आपल्या दोन मित्रांसह मोटारसायकलवरून फिरायला गेला होता. सोनापेटा टोल प्लाझा जवळील चहाच्या स्टॉलवर त्या सर्वांनी चहा पिला. यावेळी देबाशिषच्या मोबाइलवर एक कॉल आला. दोन्ही मित्रांना सोडून तो तेथून निघून गेला. काही तासांनंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

देबाशीषला रुग्णालयात कोणी दाखल केले याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

२०१५ मध्ये पूर्व मिदनापूरच्या चांदीपुरात झालेल्या जाहीर सभेत अभिषेक बॅनर्जी यांना थोबाडीत मारल्याने देबाशिष आचार्य नाव चर्चेत आले होते. यानंतर देबाशिषला टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा देबाशीषची मानसिक प्रकृती ठीक नसल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता.

या घटनेनंतर टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी देबाशिषला माफ करण्यास सांगितले होते. टीएमसी नेते सुब्रत मुखर्जी यांनी थोबाडीत मारण्याच्या या घटनेची तुलना १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येशी केली. सुब्रत मुखर्जी म्हणाले

“जब इंदिरा गांधी की हत्या हुई थी तो बहुत से लोग मरे थे. यहां पर ऐसा कुछ नहीं हुआ है. युवक अब भी जिंदा है.”

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवर सारवासारव करत सुब्रत मुखर्जी म्हणाले कि,

त्याने थोबाडीत मारली त्याचे हे पडसाद होते. हे वाईट असू शकते. पण सर्वच लोक भारत सेवाश्रम संघ किंवा रामकृष्ण मिशनमधून राजकारणात येत नाहीत. काहीही मोठं घडलेलं नाही आणि तो तरुण अजून जिवंत आहे. जे झाले ते काहीच नव्हते.

हे प्रकरण अभिषेकच्या सांगण्यावरून बंद करण्यात आले होते. 

जेव्हा देबाशिषला बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गंभीर कलमांखाली गुन्हाही दाखल केला. देबाशिषवर आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी), 3२3 (दुखापत करणे ) आणि ५०६ (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचबरोबर, मारहाण करणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांवरही कलम ३० अन्वये (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण अभिषेक बॅनर्जी यांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण रफा दफा करण्यात आले.

या घटनेनंतर २०२० च्या बंगाल निवडणुकी दरम्यान देबाशिष भाजपमध्ये दाखल झाला. या विधानसभा निवडणुकीत त्याने भाजपसाठी प्रचारही केला होता. 

पण आता त्याच्या मृत्यूमुळे बंगालचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत. कारण देबाशिष  भाजपाचा कार्यकर्ता होता आणि त्यात त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूला डायरेक्ट अभिषेक बॅनर्जींलाच जबाबदार धरलंय.

त्यामुळे आता, इस थप्पड गुंज कहा तक सुनाई देती है? बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू   

Leave A Reply

Your email address will not be published.