जनावरांच पादपुराण आलय आत्ता पुस्तकरूपात !!!

पादणं !!! काहीसा अश्लिल शब्द असावा. लिहताना तर आम्हाला जाणवला म्हणून आम्ही पादणं या भावनिक शब्दाला समानार्थी शब्द नेमका काय असावा याची शोधपत्रकारिता करायचं ठरवलं. पण पादणं या शब्दाहून सुमधूर धून असणारा नेमकां शब्द सापडणं आम्हालाही अवघड ठरलं. म्हणून आम्ही पादणं हाच मुळ शब्द वापरून स्टोरी लिहावी अस ठरवलं.

तर हे आमचं पादपुराण मांडून आम्ही जरास मोकळं होण्याचा प्रयत्न केला आत्ता मुळ विषयाला येवू तर विषय असा आहे की,
चार लोकात पार्श्वभाग ढिलां सोडून सुमडीत पादणे ही जितकी तुमची वैयक्तिक बाब आहे तितकीच वैश्विकही !
तर या कथा आहे, “ वैश्विक सत्याला हुंगण्याचा जैवविविध प्रयास करायला निघालेल्या दोन माणसांची”.

Dani Rabaiotti ही झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन येथे पीएचडी शिकणारी मुलगी. एक दिवस कुटुंबासोबत सुट्टीत फिरायला गेल्यावर तिचा १९ वर्षाचा भाऊ आपल्या बहिणीला ( जी प्राणी शास्त्रातील तज्ज्ञ असल्याकारणाने ) साप पादतात की नाही असा साधा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं कोड पडल्यानं Dani हाच प्रश्न Devid Steen नावाच्या ट्विटरवरील प्रसिद्ध सर्प तज्ञाला विचारते. तो हो असे उत्तर देतो.

Screen Shot 2018 04 15 at 2.27.44 PM
Amazon

झालं साप पादतात अस उत्तर मिळतं पण प्रकरण इथच संपत नाही तर इथून सुरू होतं. Nicholas Caruso (जो या पुस्तकाचा सहलेखक आहे) याच प्रश्नावर अमेरीकेत बसून #Doesitfart असा हॅशटॅग चालवतो. लोक आपापले पादण्याविषयीचे तिरकस प्रश्न घेऊन या हॅशटॅगवर तुटून पडतात.जो Viral होतो. ही गोष्ट जानेवारी २०१७ ची. लोकांचा पादण्यावरचं प्रेम बघून ही दोघं चाळवतात. मग सुरु होतो वैश्विक सत्य हुंगायचा प्रकल्प. ज्याचं पुस्तक निघालय. आणि हे पुस्तक पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असून मुंगीपासून हत्ती पर्यंत सर्वांच्या बुडाचा वेध घेत या दोघांनी वैज्ञानिक सुगंध दरवळलाय. Does it fart? The definitive field guide to animal flatulence असं या पादपुराणाचं नाव असून इंग्लंडमध्ये ऑक्टोबर महिन्यात हे प्रकाशित झालं असून मागच्याच आठवड्यात अमेरिकेच्या प्रसिध्द  Hachette books प्रकाशन संस्थेने हे आता प्रसिद्ध केलय.

पादण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केल्यामुळे पचनसंस्थेच्या ज्ञानात नव्याने भर पडेल. माणसाच्या पादण्याविषयी आपण कमालीचे अनभिज्ञ आहोत. तिथे चक्क वेगवेगळ्या प्राण्यांच्या पादण्याविषयी सखोल विश्लेषण करत सुटलेल्या या दोन महाभागांच्या नाकाला दाद द्यावी लागेल. कोणताही प्राणी हा दिवसातून साधारणतः किती वेळा पादतो, त्याचा सुगंध कसा असतो, साधारणतः दिवसभरातून किती हवा बाहेर सोडतो हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. जसे की त्याचे अन्न, त्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया पचनसंस्थेच्या नळीची लांबी इत्यादी. फायबर युक्त खाद्य पादण्याची वारंवारता वाढवतात. तर जे प्राणी मांसाहार करतात त्यांमध्ये पचनानंतर हायड्रोजन सल्फाइड तयार होत असल्याने नाकातले केस जळतील इतकं कडक पादतात.

एका प्रजातीची अळी आहे. या अळीचं पादणं हे शब्दशः जीवघेणं ठरतं. ही आधी तिच्या शिकारीवर म्हणजेच दुसऱ्या एका किड्याच्या डोक्यावर बसून अशी पादते की कीड्याचा जीवच जातो. वाघ झडप घालून शिकारीचे अन्न मिळवतो याचा तुम्हाला कौतुक असेल तर पादून शिकार करणाऱ्या या खतरनाक अळीला तुम्ही काय म्हणाल ? काही मासे हे संवाद साधण्याची पद्धत म्हणून पादतात. हे इच्छाधारी पाद मारण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले असून communication theory च्या आपल्या अभ्यासाला याने नवी दिशा मिळू शकेल ! हा मासा हाक मारायची असली की वाट्टेल तेव्हा गुद्दद्वारातून हवा आत घेतो व परत सोडताना असा काही आवाज करतो की त्याच्या लाईनी धावत त्याच्याजवळ येतील.

Screen Shot 2018 04 15 at 2.29.14 PM

अशा एक-दोन नव्हे तर चक्क ८० प्राण्यांच्या पादण्याच्या सुमधूर गोष्टी या पुस्तकात रंगवून सांगितल्या आहेत. यातले बहुतांश प्राणी हे खात्रीने पादतात. काहींविषयी खात्रीने सांगता येत नाही तर काही पादतच नाहीत. पक्ष्यांची पचन प्रक्रिया अतिशय जलद असल्याकारणाने त्यांच्यात गॅस तयार करणारे बॅक्टेरिया कार्यरत नसतात त्यामुळे बहुतांश पक्षी हे पाद मारायच्या सुखापासून वंचितच राहतात. कोणी पादत असेल की नाही?पादत असेल तर किती आणि किती वाईट? याचं एक  साधं गणित आहे. तोंडातून अन्न घेतल्यापासून गुद्दद्वारातून बाहेर काढण्यापर्यंतचा वेळ किती आहे? हा वेळ जेवढा जास्त तेवढी पादण्याची शक्यता जास्त .

वेगवेगळ्या प्राण्यांच्या गुदद्वारात शिरून शोध घेतला जात असताना शब्दशः शी खाणारा pearlfish हा मासा आहे. हा मासा sea cucumber च्या गुदद्वारात प्रवेश करुन त्याची विष्ठा मिटक्या मारून खातो. मनसोक्त पोट भरल्यावर  sea cucumber ने मारलेल्या पादेबरोबरच बाहेर येतो ! लेखकाने इतिहासात जाऊन नामशेष झालेल्या डायनासोरच्या पादेबद्दलही भाष्य केलेले आहे. यातील एक प्रकरण चक्क डायनासोर्स पादत असतील का यावर खर्ची घातलेले आहे .

ट्विटरवरील एका विनोदापासून सुरू झालेली ही गोष्ट आज पूर्ण पुस्तक रुपात फळास आली असून पादण्याचे शौकीन असाल तर वेगवेगळ्या प्राण्यांच्या ढुंगणांचा वेध घेणारी ही सुवासिक सफारी अनुभवण्यास हरकत नसावी.

( ता.क.-सदर लेखिका वेगवेगळे प्राणी हागतात कसे व किती यावर पुढील पुस्तक काढण्याचा मानस बाळगून आहेत. आशा करूयात विष्ठेची ही जोरकस मेजवानी आपल्याला लवकरच अनुभवायास मिळेल )

Leave A Reply

Your email address will not be published.