फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन का करण्यात येतंय…?

‘फेसबुक’ आणि ‘केंब्रिज अॅनालिटीका’ या दोन कंपन्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटलेले बघायला मिळताहेत. जगभरातून फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन करण्यात येतंय. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला तर आता या प्रकरणात माफी देखील मागावी लागलीये. भारतातही प्रकरण गाजतंय. नेमकं काय आहे प्रकरण आणि त्याचा आपल्याशी नेमका काय संबंध यावर टाकलेला हा प्रकाशझोत..

‘केंब्रिज अॅनालिटीका’

‘केंब्रिज अॅनालिटीका’ ही डाटा अॅनालीटिक्समध्ये काम करणारी कंपनी आहे. या कंपनीने २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान तसंच ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं की पडू नये यासाठी घेण्यात आलेल्या  सार्वमतात सहभागी मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या खासगी माहितीचा वापर केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. साधारणतः ५ कोटी लोकांची खासगी माहिती या कंपनीने मिळवली आणि या माहितीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय डोनाल्ड ट्रंप यांची प्रचारयंत्रणा तसेच ‘ब्रेक्झिट’ प्रभावित करण्यासाठी करण्यात आला.

केंब्रिज अॅनालिटीकाला ही माहिती मिळाली कशी..?

तुमच्या फेसबुकवरच्या न्यूजफीडमध्ये अनेक अॅपच्या लिंक तुम्ही बघितल्या असतीलच. तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या राजकीय नेत्यासारखं आहे..? तुम्ही कुठल्या अभिनेत्यासारखे दिसता..? इ. प्रकारची ही अॅप असतात. उदाहरणार्थ, सद्यस्थितीत ट्रेंड करत असलेलं मल्लू अॅप. तुम्ही ज्यावेळी संबंधित अॅपच्या लिंकवर क्लिक करता, त्यावेळी तुमची खासगी माहिती संबंधित अॅप डेव्हलपरशी तुमच्याही नकळत शेअर करत असता. तशी परवानगी तुम्ही त्या अॅप डेव्हलपरला देत असता.

अशाच प्रकारची एक पर्सनॅलिटी क्विझ २०१४ मध्ये डिझाईन करण्यात आली होती. आपली पर्सनॅलिटी नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक लोक या क्विझमध्ये सहभागी झाले. त्या माध्यमातून क्विझमधील सहभागी लोकं तसंच त्यांच्या फेसबुक फ्रेंडलिस्ट मधील लोकांची माहिती मिळविण्यात आली. ही माहिती केंब्रिज अॅनालिटीकाने विकत घेतली आणि त्याचा वापर उपर्रोलीखीत मोहिमांमध्ये करण्यात आला.

प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं..?

channel 4
www.channel4.com

       ‘चॅनेल ४’ या ब्रिटीश न्यूज चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हे प्रकरण उघडकीस आलं. ‘चॅनेल ४’ चा पत्रकार केंब्रिज अॅनालिटीकाच्या प्रतिनिधींना भेटला आणि आपण श्रीलंकेतील निवडणुका प्रभावित करू इच्छित असल्याचं त्यानं भासवलं. त्यावेळी केंब्रिज अॅनालिटीकाच्या अलेक्झांडर निक्स यांनी यासाठी केंब्रिज अॅनालिटीका त्यांना कशी उपयुक्त ठरू शकते, याचं वर्णन करताना आपल्या मोहिमांचा पाढा कॅमेऱ्यासमोर वाचला. राजकीय प्रचार मोहिमांमध्ये आपल्या ग्राहकाची प्रतिमा निर्मिती आणि विरोधाकाचे प्रतिमाहनन करण्यासाठी कंपनीमार्फत वापरल्या गेलेल्या टिप्सची त्यांनी कबुली दिली.

अर्थात हे स्टिंग ऑपरेशन ज्यावेळी समोर आलं त्यानंतर मात्र हे सगळे आरोप अलेक्झांडर निक्स यांनी फेटाळून लावले. केंब्रिज अॅनालिटीकाला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण समोर आणण्यात आलं आहे, आम्ही अशा प्रकारचं कुठलंही काम करत नाही. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काटछाट करण्यात आली आहे, असं निक्स यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं.

भारताशी काय संबंध..?

हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे परिणाम भारतीय राजकारणावरही होताना बघायला मिळताहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केलीये. देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तर मार्क झुकरबर्गला आव्हान दिलंय. भारतात असं काही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही फेसबुक डिलीट करूत, अशा आशयाचं विधान त्यांनी केलंय. या प्रकरणावरील पत्रकार परिषदेत त्यांनी कॉंग्रेसवरही हल्ला केला आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत राबविल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमांच्या तयारीसाठी केंब्रिज अॅनालिटीकाचे मुख्य कार्यकरी अधिकारी अलेक्झांडर निक्स यांनी अनेक कॉग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याचा आरोप रवी शंकर प्रसाद यांनी केला तर प्रत्युत्तरादाखल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी रवी शंकर प्रसाद यांच्या आरोपांचे खंडन करत २०१० बिहार विधानसभा निवडणुकीत ‘भाजप-जनता दल(यू)’ यांनी आपली प्रचार मोहीम राबविण्यासाठी केंब्रिज अॅनालिटीकाची सेवा घेतल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केंब्रिज अॅनालिटीकाच्या वेबसाईटचा संदर्भ देत केला. ‘ओवेलीना बिझनेस इंटेलीजंस’ (ओबीआय) ही केंब्रिज अॅनालिटीकाची भारतातील सहायक कंपनी असून भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदार पुत्राकडून ही कंपनी चालवण्यात येते. याच ओबीआयने २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचं काम बघितलं आणि २७२+ हे भाजपचं मिशन यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावली असल्याचंही सुरजेवाला यांनी कंपनीचे उपाध्यक्ष  हिमांशू शर्मा यांच्या ‘लिंकड-इन’ प्रोफाईलवरील माहितीचा संदर्भ देत सांगितलं.

 फेसबुकची भूमिका  

FACEBOOK

या प्रकरणात सुरुवातीला फेसबुकने सावध भूमिका घेतली. “नियमांचा भंग झाल्याचे लक्षात आल्यावर फेसबुकवरून अॅप डिलीट करण्यात आलं. तसंच फेसबुकच्या माध्यमातून मिळविण्यात आलेली माहिती देखील डिलीट करण्याविषयी अॅप डेव्हलपरला सांगण्यात आलं” असा दावा प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुकने केला. पण जसंजसं प्रकरणाचं गांभीर्य वाढत गेलं आणि जगभरातून फेसबुकवर टीकेची झोड उठविण्यात येऊ लागली त्या पार्श्वभूमीवर आता फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यानं माफी मागितलीये. “आमच्याकडून चुका झाल्या. त्या चुकातून शिकून वापरकर्त्यांसाठी फेसबुक अधिक सुरक्षित कसं करता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. फेसबुकवरच्या अनेक अॅपच्या माध्यमातून ग्राहकांच्या माहितीचा अॅक्सेस अॅप डेव्हलपरला मिळतो, तो अधिक सुरक्षित कसा राहील हे आम्ही बघत आहोत. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर यापुढे आम्ही कठोर कारवाई करू. फेसबुकचा संस्थापक या नात्याने फेसबुकवर जे काही बरं-वाईट आहे त्याची जबाबदारी आपण स्वीकारत आहोत भविष्यात केंब्रिज अॅनालिटीका सारखी प्रकरणं होऊ नयेत याची आम्ही काळजी घेऊ” असं झुकरबर्गनं सांगितलंय.

परिणाम

या प्रकरणाने फेसबुकच्या विश्वासार्हतेवर आणि फेसबुक वापर कर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षेसंबंधी मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तुमची खासगी माहिती किती सुरक्षित आहे आणि त्या माहितीचा वापर नेमका कशासाठी होतो, या प्रश्नाने आता अनेक जण चक्रावून गेलेत. आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तीचा गैरवापर टाळण्यासाठी आता ऑनलाईन जगतात फेसबुक डिलीट करण्याविषयीचं आवाहन करणारी मोहीम राबविली जातेय. #DeleteFacebook या हॅशटॅगखाली ही मोहीम राबविली जातेय. फेसबुकबरोबरच फेसबुकची मालकी असणाऱ्या व्हॉटसअॅप आणि इंस्टाग्राम सारखे इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मही डिलीट करण्याची मागणी होतेय. विशेष म्हणजे व्हॉटसअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी या मोहिमेला पाठींबा देऊन तसं करण्याचं आवाहन ट्विटरवर केलंय.

प्रकरणाचा फेसबुकला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसलाय. भांडवली बाजारात फेसबुकच्या शेअर्सच्या किमती कोसळल्या असून गेल्या २ दिवसात फेसबुकला ५२ बिलिअन डॉलरपेक्षा अधिकचं नुकसान सहन करायला लागलंय. यात अजूनही मोठ्या प्रमाणात भर पडू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.