मार्क झुकरबर्ग- माफीचा साक्षीदार

सॉरी, माझं चुकलं. मी फेसबूकची स्थापना केली आणि मीच फेसबुक चालवतो. त्यामुळे फेसबुकवर घडणाऱ्या ज्या कुठल्या बऱ्या-वाईट गोष्टी आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझीच” फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बोलत होता. केंब्रिज अॅनालिटिका डेटा लिक प्रकरणानंतर मार्क झुकरबर्ग अमेरिकन संसदेसमोर उपस्थित झाला. अमेरिकन संसदेतील खासदारांनी त्याची जवळपास पाच तास कसून चौकशी केली. अनेक तिखट प्रश्नांची उत्तरं झुकरबर्गला द्यायला लागली. अनेकदा आपल्या चुका झाल्याचं झुकरबर्गनं मान्य केलं. आपल्या चुका मान्य करून त्यासाठी त्यानं लोकांची माफी देखील मागितली. अशीच काही प्रश्न आणि त्याची झुकरबर्गनं दिलेली उत्तरं यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप…

गोपानियतीच्या संदर्भातील एक प्रश्न सिनेटर डिक डर्बिन यांनी झुकरबर्गला विचारला की, “आदल्या रात्री आपण कुठल्या हॉटेलात मुक्कामास होते, हे सांगायला आवडेल का…? या प्रश्नावर थोडासा विचार करून ‘नाही’ असं उत्तर देताना झुकरबर्ग चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणायचा प्रयत्न करत होता, पण या प्रश्नामागची खोच माहित असल्याने त्याचा पडलेला चेहराही वाचता येत होता. त्यानंतर आलेला याच संदर्भातील दुसरा प्रश्न असा की, गेल्या आठवड्याभरात तुम्ही कुणाला मेसेज केले असतील तर त्या लोकांची नावे आम्हाला सांगाल का..? त्यावर परत नकारार्थी उत्तर देताना झुकरबर्ग म्हणतो की, “नाही, या सार्वजनिक व्यासपीठावर मला तसं करायला आवडणार नाही.” तुमची-आमची आपल्या सर्वांची गोपनीय माहिती आपल्याही नकळत मिळवणारा माणूस स्वतः विषयीच्या त्याच प्रश्नावर काहीच बोलायला तयार नव्हता, आपली वैयक्तिक माहिती तो इतर कुणाशी शेअर करू इच्छित नव्हता. अमेरिकन संसदेतील खासदार नेमकी हीच बाब या माध्यमातून अधोरेखित करू पाहत होते. झुकरबर्गने ज्यावेळी या प्रश्नांची नकारार्थक उत्तरं दिली त्यावेळी हाच धागा पकडत फेसबुककडून आपल्या  युजर्सच्या माहितीची  गोपनीयता राखली जात नसेल तर ही युजर्ससोबतची प्रतारणा नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना झुकरबर्गला केविलवाणी धडपड करावी लागली, पण त्यानं कशीबशी वेळ मारून नेली.

Screenshot 3 1

‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात अलेक्झांडर कोगन यांनी फेसबुकची  फसवणूक करत युजर्सची माहिती केंब्रिज अॅनालिटिकाला विकली, अशा प्रकारचा खुलासा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मार्क झुकरबर्गनं केला होता. परंतु अलेक्झांडर कोगन यांनी फेसबुकवर अॅप तयार केल्यानंतर युजर्सची गोळा केलेली माहिती आपण विकू शकतो, असं फेसबुकशी केलेल्या  करारासंदर्भातील अटींमध्येच नमूद केलं होतं, असं सांगत सिनेटर रिचर्ड ब्लूमेंथल यांनी झुकरबर्गच्या  खुलाशातील हवाच काढून घेतली. या गोष्टीची झुकरबर्गला कल्पना होती का…? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर परत झुकरबर्गचं नकारार्थी उत्तर. जर झुकरबर्गला या गोष्टीची कल्पना नव्हती तर मग त्यासाठी जबाबदार कोण आणि संबंधितांवर याबाबतीत काही कारवाई करण्यात आलीये का, हा ब्लूमेंथल यांचा दुसरा प्रश्न. इथंही झुकरबर्ग निरुत्तर झालेला बघायला मिळतो. अॅप डेव्हलपर टीमचं हे काम असल्याचं, तसंच यासंदर्भात कुणावर कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती झुकरबर्ग देतो.

‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात नियमांचा भंग करून युजर्सची माहिती मिळवली गेल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित अॅप फेसबुकवरून डिलीट करण्यात आलं होतं. तसंच फेसबुकच्या माध्यमातून मिळविण्यात आलेली माहिती डिलीट करण्यात आल्याचंदेखील आम्हाला अॅप डेव्हलपरकडून कळविण्यात आलं होतं. केंब्रिज अॅनालिटिकाने देखील युजर्सची माहिती डिलीट केल्याचं कळवलं होतं. इथं आम्ही केंब्रिज अॅनालिटिकावर विश्वास ठेवला, ही आमची मोठी चूक झाली. त्यानंतर यापुढे आमच्याकडून पुन्हा अशा चुका होणार नाहीत यासाठी आम्ही आमच्या धोरणांमध्ये बदल केले, असंही बिल नेल्सन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात झुकरबर्ग म्हणाला.

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात लोकांची माथी भडकावणाऱ्या अनेक पोस्ट फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. लोकांची माथी भडकाउन रोहिंग्या मुस्लिमांची कत्तल घडवून आणण्यात आली. चिथावणीखोर कंटेंटच्या प्रसारासाठी   फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात आला. तेव्हा हे सगळं होत असताना फेसबुकने वेळीच खबरदारी घेऊन चिथावणीखोर कंटेंट २४ तासांच्या आत काढून का नाही टाकला, असा प्रश्न सिनेटर पॅट्रिक लेही यांनी ज्यावेळी विचारला त्यावेळी त्यावर उत्तर देताना , “या प्रकरणात आमची चूक झाली, हे झुकरबर्गनं मान्य केलं. प्रादेशिक भाषेतील चिथावणीखोर कंटेंटच्या प्रसारास आळा घालण्यासाठी फेसबुक प्रादेशिक भाषेतील लोकांची नेमणूक करत आहे. तसंच म्यानमारमधील नागरी समाज संस्थांशी चर्चा करून चिथावणीखोर कंटेंटचा प्रसार करणारे अकाऊंट बंद करण्यात येत आहेत, असं झुकरबर्गनं सांगितलं”

Leave A Reply

Your email address will not be published.