“रेडू” – रिव्ह्यू

दोन आठवड्यांपूर्वी “सायकल” आला होता. एखाद्या वस्तू विषयी वाटणारे अतिरेकी प्रेम आणि त्याच्या वियोगातून घडणारी पुढची कथा आणि शेवटी काहीतरी मूल्यबोध असाच ढाचा असणारा आणि त्याच परिसरात (कोकण) घडणारा “रेडू” हा चित्रपट आहे. कथेत फारशा उलथापालथी नाहीत आणि वरच्या एका “लॉगलाईन” मध्ये संपूर्ण कथा मावते म्हणून तपशील सांगण्यात काही पॉईंट नाही. इथे चर्चेचे मुद्दे वेगळेच आहेत. सायकल जितका “ब्राह्मणी” वाटण्याची शक्यता आहे तितकाच “रेडू” हा बहुजन वाटू शकतो. “रेडू” ची कथा सत्तरच्या दशकात मालवण परिसरात घडते. रेडूचा (सजीव) नायक हा बहुजन समाजातला आहे. तो गावातल्या सामंतांची विहीर खंदायला जातो, समुद्रावर मासेमारी करायला जातो. गावातल्या जत्रेत ढोल वाजवतो. ही त्याच्या समाजातल्या खालच्या थरातून असण्याची लक्षणे आहेत. म्हणून त्याला रेडू म्हणजे रेडियो विषयी वाटणाऱ्या ऑबसेशन कडे याच दृष्टिकोनातून पाहावे लागेल.

चित्रपटात गावातल्या अंधश्रद्धा, सामाजिक आर्थिक स्तरामधली दरी इत्यादी गोष्टी खुबीने पेरण्यात आल्या आहेत. मालवणच्या सामाजिक जीवनाचं संपूर्ण दर्शन घडेल इतपत नसली तरी विषमतेचे अनेक पदर उलगडून दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. पण या सगळ्या गावगाड्याच्या चित्रणात “रेडू” बराच रेंगाळलेला आहे. खरंतर रेडू एक चांगली शॉर्टफिल्म होऊ शकला असता. कथेचा जीव 18- 20 मिनिटाच्या वर नाही. एखाद्या निर्जीव वस्तू भोवती फिरणाऱ्या कथानकाची ही समस्याच आहे. आपल्याला किती आणि काय दाखवायचंय हे निश्चित झाले पाहिजे. तरच असे कथानक प्रेक्षकांना बांधून ठेऊ शकते. याबाबतीत रेडू कमी पडतो. उत्तरार्धानंतरच्या घटना एकसुरी होतात. गायब झालेला रेडियो शोधण्यासाठी कौल घेऊन निघालेल्या जोडप्याच्या प्रवासात अपेक्षित घटना घडतात. त्यामुळे प्रेक्षकाचा रस हळूहळू कमी व्हायला लागतो. क्लायमॅक्स च्या अगोदरच्या काही घटना ह्या ओढूनताणून आणल्यासारख्या वाटतात. “देवाक काळजी” गाण्यावरचा मोंताजच्या वेळी कथेवरची दिग्दर्शकाची पकड सुटल्याचं जाणवते.

चित्रपटाचा शेवट खूपच प्रतिकात्मक झालेला आहे. बहुतेक प्रेक्षकांना तो पांचट, अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. शेवटाकडे येतानाचा नायकाचा प्रवास जर तसा असता तर शेवट निदान पचनी तरी पडला असता. शेवटच्या सिनमधून नेमकं काय सांगायचं आहे असं वाटून जातं. त्यामुळे रेडूनं येडू बनवलं असंही वाटून जाऊ शकतं.

चित्रपटाच्या काही सकारात्मक बाजू आहेत. संपूर्ण चित्रपट मालवणी भाषेमध्ये आहे. फक्त शहरातून रेडियो घेऊन आलेला पाहूणा तेवढा रूढार्थाने “मराठी” बोलतो. मालवणी ही मराठीची 2 जिल्ह्यांपुरती (सिंधुदुर्ग, रत्नागिरी) बोलली जाणारी पोटभाषा आहे तरीपण त्यात चित्रपट काढण्याची हिम्मत केल्याबद्दल निर्माता दिग्दर्शकाचे कौतुक करायला पाहिजे. प्रमाण भाषेचे वरणभात खाऊन सुजलेले भूत मराठी चित्रपटाच्या मानगुटीवरून उतरवायला असा जोर मारायलाच पाहिजे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे अभिनय. शशांक शेंडे आणि छाया कदम यांनी लयच जोरदार अभिनय केलेला आहे. बरेचसे संवाद तर इम्प्रोव्हायझेशन वाटतात. फक्त कथेला थोडा वेग आणि त्यांच्या व्यक्तिरेखेला ठळक आकृतिबंध असता तर मजा आली असती.

रेडू हा शेवटून फसलेला प्रयोग वाटू शकतो.पण  दिग्दर्शकाची एकूण सामाजिक आणि मानवी नातेसंबंधांची समज मात्र चांगली आहे असं जाणवतं. म्हणून त्यांच्याकडून पुढे चांगली अपेक्षा करायला हरकत नाही.

  • अरविंद जोशी

 

Leave A Reply

Your email address will not be published.