दलित समाजातून आलेला हा मुलगा भारतासाठी १०० विकेट्स घेणारा पहिला वेगवान बॉलर ठरला !

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. तेव्हा भारताकडे बॉलर म्हणजे स्पिनर असायचे. फास्टर बॉलर नव्हतेच. असायचे ते मिडीयम पेसर. त्यांचा वापर बॉलची चमक घालवण्यासाठी व्हायचा. अशा काळात एक बॉलर आला ज्याच्या बाउन्सरची भीती ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप उडवायची.

त्याच नाव कर्सन घावरी. 

समाजाने वाळीत टाकलेलं स्वच्छतेच काम कराव लागणाऱ्या घरात जन्मलेला मुलगा. मुळचा गुजरातचा. घरची परिस्थिती गरीबीची. काकामुळे क्रिकेटची आवड निर्माण झालेली. त्याचा काका जीवा माला देखील फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला होता. पण काही गोष्टी आडव्या आल्या आणि त्याला देशाकडून खेळायला मिळाले नाही. जीवाभाईने ठरवलेलं की माझ्या बाबतीत जे झाल ते माझ्या पुतण्याच्या बाबतीत होऊ देणार नाही.

कर्सन घावरीच्या पाठीशी तो डोंगराप्रमाणे उभा राहिला. शाळेत स्पिन बॉलिंग टाकणाऱ्या घावरीने कोचच्या सांगण्यावरून एकदा सहज म्हणून फास्ट बॉलिंग टाकली आणि ५ विकेट घेतले. तिथून त्याला फास्टर म्हणून ट्रेन करण्यात आलं. त्याकाळातही राजकोटमध्ये त्याची बॉलिंग कोणाला खेळता यायची नाही. कर्सन घावरी काम चलाऊ फलंदाजी देखील करायचा.

कर्सन घावरीची निवड ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या ज्युनियर टीममध्ये झाली.

त्यावेळी मोहिंदर अमरनाथ ब्रिजेश पटेल सुद्धा त्या टीममध्ये होते. तेव्हा त्यांचा सामना ऑस्ट्रेलियन बाउन्सरशी झाला. कर्सन घावरी सांगतात की आम्ही तेव्हा जेफ थोमसनला पहिल्यांदा पाहिले. त्याने बाउन्सर टाकून टाकून आम्हाला दांडिया खेळायला लावला. तेव्हा मला बाउन्सरची खरी ताकद कळाली.

भारतीय विकेट पाटा असायचे. इथे बाउन्सर टाकणे खूप अवघड असायचं. कर्सन घावरीने आपल्या बाउन्सरच्या जोरावर सौराष्ट्रच्या टीममध्ये जागा मिळवली. तो दिसायला देखणा होता. त्याची रनअप त्याची स्टाईल खूप जबरदस्त होती. त्याच्यावर अख्खा राजकोट जीव ओवाळून टाकायचा.

पण पोटापाण्याचा प्रश्न होताच. त्याकाळात क्रिकेटवर पोट भरणे अशक्य होतं.

मुंबईला येणाऱ्या पूर्वी कर्सन घावरीने रेल्वेकडे अर्ज केला होता. मात्र मुलाखतीमध्ये इंग्लिश बोलता न आल्यामुळे रेल्वेने त्याला वर्ग-४ची नोकरी देऊ केली. यात जेव्हा सामने नसायचे तेव्हा रेल्वेच्या स्टीम इंजिनमध्ये कोळसा भरण्याच काम करावं लागणार होतं.

 पण एकदा एका मुंबईच्या सामन्यामुळे त्याच आयुष्य बदलून गेल.

भारतातले सर्वोत्कृष्ट फलंदाज तेव्हा मुंबईकडून खेळायचे. कर्सन घावरीची जबरदस्त बॉलिंग बघून त्यांनी आपल्या कोचकडे मागणी केली होती की याला टीम मध्ये घ्या म्हणजे आम्हाला त्याचे बाउन्सर खेळावे लागणार नाही.

कर्सन घावरी मुंबईकडून खेळू लागला शिवाय एसीसी सिमेंटमध्ये नोकरी देखील मिळवून देण्यात आली. मुंबईकडून खेळणे म्हणजे एक्स्पोजरदेखील मोठे मिळू लागले. लवकरच त्याची भारताच्या टीममध्ये निवड झाली.

त्याकाळात भारताच्या स्पिनर चौकडीची संपूर्ण जगात दहशत होती.

भारतात पीचसुद्धा स्पिनसाठीच बनवलेले असायचे. नावापुरता एक फास्ट बॉलर खेळवला जायचा, तोही ऑल राउंडर. कप्तान आपल्या फास्टर बॉलरना सांगायचा की

तुम्हाला फक्त २ ओव्हर मिळणार. त्यानंतर स्पिनर येणार. त्याआधी जे काही करायचं आहे ते करा.

कर्सन घावरी आणि मदनलाल हे दोघे नवीनच टीममध्ये आलेले फास्टर होते. दोघांपैकी एकालाच संधी मिळायची. तरीही या दोघांनी खूप मेहनत घेतली. जेवढी संधी मिळते त्यातूनही खोऱ्याने विकेट मिळवल्या. विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये घावरीची डावखुरी मिडियम फास्ट बॉलिंग जबरदस्त चालायची.

स्पिनर चौकडीपैकी एक असलेला बिशनसिंग बेदी तेव्हा कप्तान होता.

त्याने घावरीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठे मोठे बाउन्सर टाकायला लावले. घावरीने देखील त्वेषाने बॉलिंग टाकली. त्याला एक खास कारण होतं. लहानपणी ज्याने त्याला दांडिया खेळायला लावला होता तो जेफ थोमसन आता समोर होता आणि त्याचा जुना हिशोब चुकता करायचा होता.

पण घावरीचे हे बाउन्सर बघून आपले भारतीय फलंदाज घाबरले. आणि त्याला सांगु लागले की तूझी बॉलिंग बघून चिडलेले ऑस्ट्रेलियन आम्हाला सुद्धा बाउन्सर टाकतील. पण घावरी ऐकायचा नाही.

त्याने त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम स्पेल टाकली.

घावरी वेळ प्रसंगी स्पिन बॉलिंग देखील टाकायचा. पण एकदा त्याने स्पिन करून पाच विकेट घेतल्यावर बिशनसिंग बेदीने त्याला आमच्या पोटावर पाय देऊ नको म्हणून धमकावल आणि स्पिन करण्याला बंदी घातली. पण त्याची विकेटची भूक थाबली नाही. त्याच्या याच चिवटपणामुळे गुजरातमध्ये त्याला कडूभाई म्हणून ओळखल जायचं.

कर्सन घावरी हा भारतातला कसोटीमध्ये १०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला.

पुढे त्याच्या जोडीला कपिल देव आला आणि या दोघांनी भारतीय फास्ट बॉलिंगची जगभरात दहशत पसरवली. भारताचे फास्टर सुद्धा मॅच जिंकुन देऊ शकतात हा आत्मविश्वास या दोघांच्या बॉलिंगमुळे आपल्याला मिळाला.

घावरी १९८२ मध्ये रिटायर झाला. एका छोट्या शहरातला मागासवर्गीय जातीतून आलेला मुलगा एवढ मोठ यश मिळवतो हे देखील स्वप्नवत होतं.

रिटायरमेंट नंतर देखील कोचिंग व मॅनेजमेंट मधून तो क्रिकेटशी जोडलेला राहिला. घावरीची लोकप्रियता बघून गुजरात भाजपने त्याला पाटण या SC आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्याची विंनती केली होती पण त्याने नम्रपणे याला नकार दिला.

हे ही वाच भिडू.