स्पिन आवडणाऱ्या प्रत्येक पोरानं ज्याची बॉलिंग स्टाईल कॉपी केली, तो कार्यकर्ता म्हणजे भज्जी
साल २००१, स्थळ कोलकात्याचं ईडन गार्डन्स स्टेडियम. ग्राऊंडमधल्या खुर्च्यांपासून पायऱ्यांपर्यंत खच्चून गर्दी झाली होती. कमेंट्री बॉक्समध्ये टोनी ग्रेग आणि रवी शास्त्री ही दोन मोठी नावं होती. भारत इतिहास लिहीण्यापासून फक्त एक विकेट दूर होता. क्रिझवर होता, ग्लेन मॅकग्रा आणि बॉलिंग करत होता हरभजन सिंग.
भज्जीनं मॅकग्राला पायचीत पकडलं आणि सगळ्या भारतात एकच जल्लोष झाला. कारणही तसंच होतं, जगात कुणालाच वाटत नव्हतं की भारत ती मॅच जिंकेल. पण लक्ष्मण आणि द्रविडच्या बॅटींगनं पाया रचला आणि त्यावर कळस चढवला कोवळ्या हरभजन सिंगनं.
आयुष्यात क्रिकेट खेळला असाल, तर तुम्ही हरभजन सिंगची बॉलिंग स्टाईल हजार टक्के कॉपी केली असणार. उड्या मारत मारत सुरु होणारी ॲक्शन आणि आळस दिल्यासारखे लांब होणारे हात. विकेट मिळाल्यावरच्या सेलिब्रेशनपेक्षा विकेट न मिळाल्यावर होणारा भज्जीचा चेहरा जास्त लक्षात राहतो.
परत जाऊयात जरा फ्लॅशबॅकमध्ये. २००० च्या शेवटी भारताच्या बॉलिंग युनिटचा आधारस्तंभ असणाऱ्या अनिल कुंबळेला दुखापत झाली. आता मेन कार्यकर्ताच नव्हता आणि त्यात भारताच्या मॅचेस होत्या बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध. आपण जिंकलो खरं पण या लिम्बू-टिम्बू टीम्सनं लई घाम गाळायला लावला.
खरं चॅलेंज तर पुढे होतं. ते म्हणजे स्टीव्ह वॉची ऑस्ट्रेलियन टीम. फॉर्ममध्ये असणाऱ्या कांगारुंनी पहिल्याच टेस्टमध्ये आपला बल्ल्या केला. ईडन्सवर ही बाजार उठलाच होता. पण हरभजनच्या बॉलिंगमुळे भारत तरला. पहिल्या इनिंगमध्ये सात आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सहा विकेट घेत हरभजननं कोलकात्याच्या मातीवर एक गोष्ट सिद्ध केली, ती म्हणजे ‘सिंग इस किंग.’
हे कमी की काय म्हणत भज्जीनं तिसऱ्या टेस्टमध्ये एकूण १५ विकेट्स घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये सात आणि दुसऱ्यात आठ. सगळ्या जगाचा बाजार उठवून माजात भारतात आलेली ऑस्ट्रेलियन टीम कवळ्या भज्जीच्या माऱ्यापुढे कोसळली होती.
आता ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहितीये. पण भज्जी फक्त विकेट्स काढल्या म्हणून किंवा मॅन ऑफ द मॅच होता म्हणून भारी नाहीये. तो भारीये कारण त्याचा स्ट्रगल.
भज्जीनं १९९८ मध्येच टेस्ट डेब्यू केला होता, पण भावाचा फॉर्म गंडला आणि त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं. बरं एवढ्यावरच भागलं नाही, आगाऊपणा करायचा म्हणून त्याला नॅशनल क्रिकेट अकादमीमधून घरी जायला सांगितलं होतं. पंजाबच्या रणजी टीममधलं स्थानही त्यानं जवळपास गमावलंच होतं. या सगळ्या परिस्थितीत त्याचे वडील वारले.
१९-२० वर्षांच्या पोरासाठी हा मोठा धक्का होता. तीन बहिणींची लग्न, कुटुंबाची जबाबदारी आणि क्रिकेटर बनायचं स्वप्न अशी तारेवरची कसरत पार करत भज्जीनं भारतीय संघात कमबॅक तर केलंच, पण पुढे जाऊन इतिहासही घडवला. आज भज्जीच्या नावावर दोन वर्ल्डकप आहेत. विकेट्सचं म्हणाल, कसोटी क्रिकेटमध्ये ४१७, वनडे क्रिकेटमध्ये २६९ आणि टी२० इंटरनॅशनलमध्ये २५ अशा ७०० हून अधिक विकेट्स आहेत. बरं फक्त बॉलिंगच नाही तर भज्जीनं बॅटिंगमध्येही चमक दाखवलीये, भावाच्या नावावर दोन कसोटी शतकंही जमा आहेत.
आता आर्टिकल उघडतानाच तुमच्या डोक्यात एक गोष्ट आली असणार, ती म्हणजे हरभजन सिंग आणि राडे. ऑस्ट्रेलियाच्या राक्षस सेनेत खैस म्हणून कुणी शोभलं असेल, तर अँड्र्यू सायमंड्स. भज्जीनं कांगारू टीममधल्या किरकोळ पोरांना अंगावर घेतलंच नाही. त्यानं डायरेक्ट खोडावर घाव घातला. तो नडला सायमंड्स आणि रिकी पॉन्टिंगला. पॉन्टिंग सारख्या वाढीव बॅटरलाही त्यानं लय सतावलं.
टीम संकटात आहे, गांगुली, धोनीनं भज्जीकडे बॉल सोपवलाय आणि विकेट मिळाली नाही, असं होणंच शक्य नाही.
पुढं भावानं श्रीसंतच्या कानाखाली काढलेला आवाजही देशभर घुमला. भज्जी प्लेअर्सना नडायला कधीच मागं राहिला नाही आणि टीमला प्राधान्य द्यायलाही विसरला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर त्यानं आयपीएलही गाजवली, काही काळ तो कमेंट्री बॉक्समध्येही दिसला.
आज त्यानं क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅट्समधून निवृत्ती घेतली, नाही म्हणलं तरी ड्रिंक्स घेऊन मैदानात धावणारा भज्जी बघितला की, मनाच्या एका कोपऱ्यात दुःख व्हायचंच.
एक मात्र झालं, उड्या मारत पळत येऊन… दोन हात बाजूला करून बॉलिंग टाकताना भज्जीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाच भिडू:
- हरभजनसिंगच पाक खेळाडू बरोबर भांडण झालं तरी सचिन ते सोडवायला गेला नाही.
- हरभजनने लेहमनला मैदानावरच विचारलं, तू प्रेग्नंट आहेस का..?
- पठाण असल्याचं सिद्ध करण्यापायी कंट्रोल सुटला आणि पाकिस्तानची वर्ल्ड कप मधून सुट्टी झाली