श्रीमंत बापाची सगळीच पोरं बिघडत नाहीत, काही पुढं जाऊन राफेल नदाल बनतात…

सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एका सुपरस्टार टेनिसपटूला वाटत होतं की, आपण रिटायरमेंट जाहीर करावी. पायाची दुखापत, कोविडचा संसर्ग, वाढत चाललेले वयाचे आकडे… सगळ्याच गोष्टी त्याच्याविरुद्ध घडत होत्या. तरीही त्यानं ठरवलं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायचं. इथं त्याची खरी लढाई जोकोविच, मेदवेदेव या प्रतिस्पर्ध्यांशी नव्हती, त्याची लढाई पायाच्या दुखापतीशी, कोविडनं ग्रासलेल्या छातीशी आणि स्वतःशी होती. तो या लढाईत उतरला, एक एक खिंड जिंकत फायनलच्या रणधुमाळीत उतरला. ही रणधुमाळी ५ तास २४ मिनिटं चालली. तो लढला, फायनलच्या शेवटी मैदानावर बसला, रडला.. पण डोळ्यात आनंदाश्रु होते आणि हातात विजेतेपदाची ट्रॉफी!

त्याचं नाव राफेल नदाल. फक्त क्ले कोर्टचाच नाही.. तर सगळ्या टेनिस विश्वाचा बादशहा.

यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलनंतर टेनिस आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या प्रत्येकानं सोशल मीडियावर नदालचा फोटो लावलाय. त्याच्यामागं कारणही तसंच आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये असं झालं तरी काय?

दोन शब्दांत सांगायचं झालं तर, नदाल जिंकला. पण जसा जिंकला ते अशक्य वाटण्यासारखं होतं. स्पॅनिश नदाल फायनलमध्ये भिडला रशियन डॅनिल मेदवेदेवला. नदालचं वय ३५, तर मेदवेदेव २५ चा. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मेदवेदेवला दुसरं मानांकन होतं, तर नदालला सहावं. गेली काही वर्ष टेनिस विश्वावर अक्षरश: राज्य करणाऱ्या फेडरर, जोकोविच आणि नदालकडे प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम्स होती, नदाल विक्रमापासून एक पाऊल दूर होता. पण मेदवेदेव काय लिंबू टिंबू भिडू नव्हता. त्यामुळं नदालवर टेन्शन मजबूत होतं.

फायनलला थाटात सुरुवात झाली लोकांच्या माना इकडून तिकडे फिरू लागल्या. नदालच्या अनुभवाला मेदवेदेवचा जोश भारी पडू लागला. पहिला सेट त्यानं मारला, फरक होता २-६. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गेला, पण झाला मेदवेदेवच्या नावावर. मेदवेदेव तिसरा सेट जिंकला असता, तर नदालच्या पदरी निराशा फिक्स होती. सोशल मीडियावर मेदवेदेवच्या कौतुकाच्या पोस्ट पडायला सुरुवात झाली. कारण नदालचं जिंकणं अवघड झालं होतं.

इथून पुढं जे घडलं, तो नदालनिर्मित चमत्कार होता…

तिसरा सेट नदालनं ६-४ असा मारला. तरीही मेदवेदेवचेच हॉर्सेस विनिंगमध्ये होते. चौथ्या सेटमध्ये नदाल अक्षरश: त्याच्यावर तुटून पडला, पुन्हा एकदा ६-४ स्कोअर आणि नदालचा विजय. आता दोघांना सारखी संधी होती. या सेटमध्ये मेदवेदेव आपलं सर्वस्व पणाला लाऊन लढला, त्याच्या सर्व्हिसपासून बॅकहँडपर्यंत, प्रत्येक शॉटमध्ये जिगर होती. मोठमोठ्या रॅलीज चालत राहिल्या, जो शेवटी दमणार त्याचा विजय पक्का होता. कोर्टच्या दुसऱ्या बाजूला नदाल जे काही करत होता, ते मायावी वाटत होतं. अनुभव, मानसिक क्षमता आणि नदालचं ‘नदाल’ असणं मेदवेदेववर भारी पडलं. 

नदाल जिंकला, स्कोअर ७-५, ग्रँडस्लॅम क्रमांक २१. स्वप्नवत कमबॅक आणि तितकाच स्वप्नवत विजय.

हातात काहीही नसताना यशाची शिडी चढत जाणं तसं सोपं असतं, पण पाठीमागे मोठा वारसा, हाताशी सगळ्या सुविधा असल्या की माणूस दडपणानं जास्त खचतो. नदालचे वडील प्रथितयश बिझनेसमन, आई परफ्युमची व्यापारी, काका खेळाडू. त्याच्या घरच्यांचा पाठींबा होता, सगळ्या सोयीही होत्या. पण तरी नदालच्या डोक्यात हवा गेली नाही. त्यानं एकामागोमाग स्पर्धा जिंकल्या, स्वतःला घडवलं आणि आज तो टेनिस विश्वातला सगळ्यात यशस्वी खेळाडू झालाय. इतका पैसा होता की, टेनिस खेळला नसता तरी चाललं असतं, वाट चुकेल किंवा सुटेल असे कित्येक प्रसंग आले असतील, पण नदाल जसा मेदवेदेव विरुद्ध लढला तसा कायम लढत आलाय.

सगळ्यात जास्त दमवणाऱ्या खेळात वयाच्या ३५ व्या वर्षी, साडेपाच तास खेळणं सोपं नसतंय भिडू. नदालच्या ‘नदाल’पणानं फक्त मेदवेदेवलाच नाही, तर अपयश आणि पराभवाच्या भितीलाही हरवलंय, तेही दोन सेट गमावून कमबॅक करत…

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Akshay Kailas Wadekar says

    Amazing information Bhidu such lovely always fan of Bol Bhidu Family.

Leave A Reply

Your email address will not be published.