उत्तरेच्या दक्षिणायनास प्रारंभ…!!!

 

२७ एप्रिल २०१८  हा दिवस यापुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अतिशय महत्वाचा दिवस म्हणून गणला जाईल. उत्तर  कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जेई-इन यांची भेट घेतली. ही भेट अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. या भेटीमुळे यापुढे  पॅसिफिक महासागरातील शांती प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर यानिमित्ताने जाणून घेऊयात की आंतरराष्ट्रीय राजकारणात नेमकं असं काय घडतंय की नेहमीच ‘फ्रंटफूट’वर  खेळणारे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग हे ‘बॅकफूट’वर गेलेले बघायला मिळताहेत आणि त्याचे काय परिणाम  नजीकच्या भविष्यकाळात संभवतात…

आंतरराष्ट्रीय राजकारण हा दबावतंत्राचा आणि मुत्सद्दीपणे स्वहित साधण्याचा खेळ असतो. या खेळात ज्यावेळी संपूर्ण जग तुम्हांला एकट पाडण्याच्या दृष्टीने डावपेच आखत असतं, त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील तुमच्या एखाद्या मित्राने देखील  या कटात आपला एखादा फासा टाकलाच तर तुम्हाला या मित्र-राष्ट्राच्या तालावर देखील थया-थया नाचावं लागतं. अशा वेळी तुमच्यापासून दुरावल्या गेलेल्या  मित्र-राष्ट्रांच्या  कवाडावर तुम्हांला थाप द्यायला लागते.  परक्या झालेल्या मित्राची  मिनतवारी करून तो शत्रुराष्ट्रांच्या कह्यात खेचला जाणार नाही, याची काळजी घ्यायला लागते. अशीच काहीशी परिस्थिती चीनने सध्या उत्तर कोरियावर आणून ठेवली आहे.

उत्तर कोरियाचा अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र प्रकल्प यांमुळे उत्तर कोरिया मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंधांचा सामना करतच होता. त्यात भरीस भर तेव्हा पडली जेव्हा मार्च-एप्रिल महिन्यात चीनने पेट्रोलियम, वाहने अशी अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्यात थांबवली. चीनने आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे गेल्या कित्येक वर्षात प्रथमच उत्तर कोरिया चीनपुढं हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळतंय.  याच  पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘किम जोंग उन’ यांनी द्विपक्षीय चर्चेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या भूमीवर पाय ठेवला आणि  ‘उत्तरेच्या दक्षिणायना’ला सुरवात झाली, असं म्हणणं  सयुक्तिक ठरेल.

कसा असेल यापुढील काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा मार्ग…?

दक्षिण आणि  उत्तर कोरिया सीमा ही जगातील सर्वात अशांत सीमा समजली जाते. त्यामुळे सीमेवर शांतता क्षेत्र विकसित करण्यावर दोन्ही देशात सामंजस्य झाल्याचे  कळते. सध्या झालेल्या भेटीत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी ‘अनुमुक्त द्वीपकल्प’ या संकल्पनेवर भर दिला असून नजीकच्या भविष्यकाळात  कोरियन द्विकल्प अनुमुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे ठरवले आहे. द्विपक्षीय शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल म्हणून ते लवकरच उत्तर कोरियाचा दौरा करणार आहेत.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष हे उत्तर कोरियामधून स्थलांतरित झालेल्या कुटुंबामधून येतात, त्यामुळे उभय देशात शांतता प्रस्थापित करणे आणि कोरियन भूमीची दक्षिण-उत्तर  अशी वाटणी झाल्यामुळे तुटलेल्या  कुटुंबांना एकत्रित आणणे  हा त्यांच्यासाठी भावनिक पातळीवर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या दृष्टीने टाकण्यात येत असलेलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणजे उभय देशांनी २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये संयुक्तरित्या सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगभरात कोरियन ऐक्याचा संदेश दिला जाऊ शकेल, असं उभय राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या भेटीचे  जागतिक राजकारणावरील पडसाद

दक्षिण-उत्तर कोरिया वादाचा  फायदा मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध कालखंडात सोविएत युनियन, अमेरिका आणि  शीतयुधोत्तर  काळात चीनने घेतला आहे. संपूर्ण जगाचा दबाव असताना  चीनने उत्तर कोरियाला खुली मदत आणि  व्यापार केला. त्यामुळे  उत्तर कोरियाच्या अनुप्रकल्पांवर  वचक   बसवण्यासाठी अमेरिकेला चीनची मदत घ्यावी लागली. तसेच दक्षिण कोरिया आणि जपानला उत्तर कोरियापासून धोका आहे, अशा प्रकारची वातावरणनिर्मिती करून अमेरिकेने पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरात आपले बस्तान बसवले आहे. या भागातून होणाऱ्या सागरी व्यापार मार्गांवर नियंत्रण नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अमेरिकेसाठी त्यांची प्रशांत महासागरातील उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे. अशा वेळी उत्तर व दक्षिण कोरियाने उचललेल्या या पाऊलाच्या पार्श्वभूमीवर  या वर्तमान महासत्ताना आपले धोरण  बदलायला लागू शकतं. दक्षिण व उत्तरेमधील व्यापार वाढीस लागला तर उत्तरेचे चीनवरील अवलंबत्व कमी होऊ शकते.अनेक जागतिक संघटनांना दक्षिण कोरियामार्फत उत्तर कोरियाला मुख्य प्रवाहात समिल करून घेता येऊ शकते. त्यामुळे या भेटीकडे   जागतिक शांततेच्या दूरगामी धोरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पाहायला हवं…!!!

 

Leave A Reply

Your email address will not be published.