आयपीएलच्या धामधुमीत या ऐतिहासिक मॅचवर देखील लक्ष असूद्यात…!!!

 

आयपीएल आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफचा पहिला सामना सनरायजर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपरकिंग दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे पण तत्पूर्वी बीसीसीआयकडून पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी देखील आयपीएल सुरु करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. बहुतेक याचाच एक भाग म्हणून महिलांचं आयपीएल लौंच करण्यासाठी आयपीएलच्या इतिहासात प्रथमच स्पर्धेच्या ‘प्ले-ऑफ’ लढतीपूर्वी महिलांचा एक प्रदर्शनीय सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ‘आयपीएल ट्रेलब्लेझर्स’ विरुद्ध ‘आयपीएल सुपरनोवा’ या दोन संघांदरम्यान आज दुपारी दोन वाजता या मॅचची सुरुवात होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील २ स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या अनुक्रमे दोन्ही संघांच्या कर्णधार असणार आहेत. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या संघातील खेळाडू देखील या मॅचमध्ये खेळणार आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त सुझी बेट्स, मेग लॅनिंग, एलीस पेरी, डॅनिएले वॅट या महिला क्रिकेटमधील सद्यस्थितीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी असणाऱ्या परदेसी खेळाडूंचा खेळ यानिमित्ताने क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. स्टार नेटवर्कवरून प्रेक्षकांना या सामन्याचं  थेट प्रक्षेपण बघता येईल.

trail

दोन्ही संघातील महिला खेळाडू या सामन्यासाठी उत्सुक आहेत. या सामन्यामुळे भारतात महिला आयपीएलचा पाया रचला जाईल अशी त्यांना आशा आहे. आयपीएल ट्रेलब्लेझर्सची कॅप्टन स्मृती मंधाना सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाली की, “परदेसी खेळाडूंसह भारतीय भूमीवर अशा प्रकारचा आमचा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे आमच्यातील सर्वच खेळाडू या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. महिलांच्या आयपीएलमध्ये पुरुषांप्रमाणे ८ संघ खेळवणं शक्य नसलं तरी ४ किंवा ५ संघांदरम्यान रंगतदार लढती होऊ शकतात. ही एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात ठरू शकेल.”

याचवेळी बोलताना प्रतिस्पर्धी आयपीएल सुपरनोवा संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर म्हणाली की, “ या मॅचसाठी आम्ही खूप उत्सुक असून गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही या क्षणाची वाट बघत होतो. ही जी संधी आम्हाला मिळालीये त्यामुळे आम्ही खूप आनंदित असून उद्या प्रेक्षकांना एक चांगला  मॅच बघायला मिळेल अशी मला आशा आहे.

आयपीएल ट्रेलब्लेझर्स-

स्मृती मंधाना, अॅलिसा हेली, सुझी बेट्स, दीप्ती शर्मा, बेथ मुनी, जेमीमाह रॉड्रीगेझ, डॅनिएले हेझल, शिखा पांडे, लिआ ताहुहू, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पूनम यादव,  द्यालन हेमलता.

आयपीएल सुपरनोवा

हरमनप्रीत कौर, डॅनिएले वॅट, मिताली राज, मेग लॅनिंग, सुफी डीव्हाइन, एलीस पेरी, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकर, मेगन शट, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटीया.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.