रामानुजन, या माणसाने आम्हांस रडवले.

आत्ताच पुल देशपांडे यांच्या सिनेमाचा ट्रेलर पाहीला, त्यात एक वाक्य होतं या माणसाने आम्हास हसवले. पण आयुष्यात हसण्याहून अधिक क्षण रडारडीचे आले. मग आम्ही विचार केला असा कोण माणूस असेल ज्याने आम्हास रडवले. आणि एका क्षणास नाव आलं ते रामानुजन.

गणिताला रामराम करून कलाशाखेत भविष्य शोधायला भाग पाडणारे रामानुजन. हि तीच व्यक्ती ज्यांनी आपलं बालपण गणिताच्या नावाने भयभीत केले होते. कॉलेज जीवन म्हणजे गरम रक्त शरीरात घेऊन फिरण्याचे ते दिवस गणित नावाच्या भयाने थंड करून सोडले होते.

अशा रामानुजन यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे.

जन्मापासून वयाच्या तीन वर्ष अवाक्षर न बोलू शकणारे रामानुजन नंतर मात्र मोठमोठ्या विद्वानाना, शिक्षकांना गप्प करून टाकत होते. जे पाठ करता येत नाही आणि मनाने रेटता येत  नाही ते असते ‘गणित.’ शालेय जीवनाचे असोत की आयुष्याचे ‘गणित’ हे अवघडच.

ज्या गणित विषयाला घाबरून आमच्या सारखी लोक करिअर बदलवतात त्याच गणिताचा आज दिवस आहे.

श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी गणित दिवस साजरा केला जातो. २२ डिसेंबर १८८७ला तामिनाडूतील तिरोड इथे रामानुजन यांचा जन्म झाला.

सुरवातीच्या दिवसात रामानुजन यांचे शिक्षणात मन लागत नव्हते.

नंतर मात्र जिल्ह्यातून प्रथम येणारा विध्यार्थी म्हणून त्यांची ओळख झाली. सातवीला जाताच रामानुजन यांनी पदवीच्या विद्यार्थ्यांना  गणित विषय शिकवण्यास सरुवात केली.

वय वर्ष तेरा असताना त्यांनी मोठमोठ्या गणित तज्ञांना न सोडवता आलेले ट्रिग्नोमेंट्री सारखे प्रमय सोडवायला सुरवात केली. विलक्षण प्रश्न विचारून शालेय जीवनात शिक्षकांना गार करणारे रामानुजन अकरावीला असताना गणित सोडून सर्व विषयात नापास झाले.

आणि तिथूनच भेटला रामानुजन यांना गणितात बाप बनण्यास पूर्णवेळ.

गरीब कुटुंबातून आलेल्या रामानुजन यांना नोकरी भेटणार अशी त्यांच्याकडे कोणतीच डिग्री नव्हती. नोकरीच्या शोधात भटकत असलेल्या रामानुजन यांची भेट उपजिल्हाधिकारी श्री. वी. रामास्वामी अय्यर यांच्याशी झाली. अय्यर हे गणित विषयात तज्ञ होते.त्यांनी रामानुजन मधली गणिताची आवड व विलक्षण बुद्धी ओळखली.

नोकरीच्या शोधात निघालेल्या रामानुजन यांना त्याकाळी अय्यर यांनी गणिताचा अभ्यास करता यावा म्हणून तब्बल पंचवीस रुपये महिन्याची शिष्यवृत्ती लागू केली.

रामानुजन यांचा संशोधनपर पहिला लेख गणित विषयाच्या भारतातील एका नियतकालिकात १९११ साली प्रसिद्ध झाला.

याच लेखामुळे गणित जगतात त्यांच्या संशोधनविषयी व गणिती ज्ञाना विषयी माहिती झाली. यातूनच १९१३ मध्ये त्यांचा केब्रीज ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक हार्डी यांच्याशी  पत्रव्यवहार सुरु झाला.हार्डी यांनी रामानुजन यांचे ज्ञान ओळखून त्यांना लागलीच आपल्या विद्यापीठात प्रवेश दिला.

१७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला ज्याण्यासाठी रामानुजन निघाले. १९१४ ते १७ या तीन वर्षाच्या काळात केंब्रीज ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी तब्बल बत्तीस संशोधनपर लेख लिहिले.

दुर्दैवाने त्यांचे हे संशोधन तब्बल पन्नास वर्ष त्या विद्यापीठात धूळखात पडून होते.

१९७६ रोजी डॉ. जॉर्ज अँड्र्यूज यांनी त्यांना पुनर्जीवित केलं. त्यांनी लिहिलेल्या गणिती सूत्राचा जेव्हा जगभरातील गणित तज्ञांनी शोध घ्यायला सुरवात केली तेव्हा गणिताचे अनेक रहस्य उलगडून निघाले. मृत्युच्या काही दिवस आधी रामानुजन यांनी लिहून ठेवलेल्या बऱ्याच गणिती सूत्रांचा आजवरही तज्ञांना शोध लावणे कठीण होऊन बसले आहे. मॉक थिटा नामक या सूत्राचा गणित तज्ञ आजही इंटरनेट सुरक्षा व ब्लॅक होल्ससारख्या गोष्टी उलगडून काढण्यास वापर करतायत.

कागदाच्या कमतरतेमुळे एकाच पानावर वेगवेळ्या रंगाच्या शाहीने सूत्र लिहून ठेवणारे रामानुजन.

झोपेतून खडबडून जागे होऊन जगातील अवघड गणिते सोडवत असत.ते एकवीस वर्षांचे असताना त्यांचे लग्न एका दहा वर्षाच्या मुलीसोबत लावून दिले गेले.३३व्या वर्षी म्हणजेच २६ एप्रिल १९२० मद्रास येथे  त्यांचा  अद्यात आजाराने मृत्यू झाला.

केवळ ३३ वर्ष आयुष्य लाभलेल्या रामानुजन यांनी अमर राहिलं असे गणित क्षेत्रात कार्य करून ठेवले.

जगाला शून्य देणारा भारत आणि त्याच भारतातून जगाला रामानुजन भेटले. शून्यातून विश्व निर्माण होते , याच शून्यातून रामानुजन यांनी गणिताचे विश्व निर्माण केले.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.