चेष्टा नाय…रस्ते बांधणीत गडकरींनी ४ विश्वविक्रमांची नोंद केलेय…!!!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. आपल्या नावाने नाही तर कामाने ओळखला जाणारा हा नेता. जेव्हापासून त्यांच्याकडे हे खातं आलं तसं त्यांनी देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं टार्गेटच हाती घेतलं. कदाचित त्यांच्या याच कामगिरीमुळे गडकरींना ‘रोडकरी’ नाव पडलं.

त्यांनी नुकतंच राज्यसभेत विधान केलेलं कि, ‘२०२४ पर्यंत भारतातलं रस्त्यांचं जाळं आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं प्लॅनिंग केंद्र सरकारनं केलं आहे. २०२४ च्या शेवटपर्यंत भारतातील रस्ते आणि येथील पायाभूत सुविधा अमेरिकेएवढ्याच प्रगत असतील. कमी खर्चात चांगल्या क्वालिटीचे रस्ते बनवणे हाच आमचा उद्देश आहे असं सांगितलं. 

तर हे अमेरिकेचं गणित थोडंसं बाजूला ठेवलं तर आता नवीन गोष्ट हाती लागलीये ते म्हणजे गडकरींनी ४ विश्वविक्रमांची नोंद केली…खोटं नाही हे स्वतः गडकरींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं आहे.

२०२२ चं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या दरम्यान लोकसभेत बोलतांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आमच्या रस्ते वाहतूक विभागाने रस्तेनिर्मितीमध्ये ४ वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत आणि त्याची यादी देखील त्यांनी वाचून दाखवली.  

कोणते आहेत ते रेकॉर्ड ते थोडक्यात बघूया….   

१) दररोज ३८ किमी च रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणे. 

देशात रस्तेनिर्मितीचं काम प्रचंड गतीने सुरु आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते वाहतूक विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं ये म्हणजे दररोज ३८ किलोमीटर रस्त्याचं बांधकाम दरदिवशी पूर्ण करणे. ३८ किमी चं बांधकाम करणं काय साधारण गोष्ट नाही. तेच आधी दिवसाकाठी २ किमी च बांधकाम पूर्ण होत असे तेच सद्याच्या घडीला ३८ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण होतायेत आणि हा जागतिक विक्रम आहे असं गडकरी यांनी सांगितलं.  

२ ) १०० तासांमध्ये ५० किमी रस्त्याचं बांधकाम पूर्ण करणे.

गडकरींनी सांगितल्याप्रमाणे, मागील आठवड्यातच बांधकाम विभागाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं ते म्हणजे ५० किलोमीटर एकपदरी रस्त्याचं काम अवघ्या १०० तासांमध्ये पूर्ण केलं. हे वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली-वडोदरा मार्गावर पूर्ण पडलं. 

या रेकॉर्डची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. 

या कामगिरीची जबाबदारी नितीन गडकरी यांनी पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडला दिली होती. पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडने याआधी देखील अनेक विक्रम केलेत त्यात १०० तासांमध्ये रस्ता बांधण्याच्या रेकॉर्डचाही समावेश झालाय.  

तर या रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात NH-४७ च्या जंक्शनपासून सुरु होऊन पंचमहाल जिल्ह्यातील बलेटीया गावापर्यंत  SH-१७५ जंक्शनपर्यंत हे बांधकाम चाललं. 

 ३) फक्त २४ तासांमध्ये अडीच किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्याचा विक्रम. 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वडोदराजवळ २.५ किलोमीटर लांब असा चार पदरी सिमेंट काँक्रीट रोड बांधला गेला तोही फक्त २४ तासांमध्ये बांधून पूर्ण झाला आणि या रेकॉर्ड ने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एंट्री मारल्याचं देखील नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. 

ही कामगिरी २०२१ च्या फेब्रुवारीमध्ये पार पडलेली आहे. या रस्त्याचं बांधकाम १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सुरु केलं ते दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत २,५८० मीटर लांब चारपदरी रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं. त्या रस्त्याची रुंदी १८.७५ मीटर होती. हा ग्रीनफिल्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवे प्रकल्पाचा भाग होता. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिली होती. तर या कॉन्ट्रॅक्टरने २४ तासांमध्ये अडीच किलोमीटर लांबीचा चौपदरी महामार्ग बांधून जागतिक विक्रम केलाय. 

४)  फक्त २१ तासांमध्ये २६ किमी लांब रोडचं बांधकाम पूर्ण केलं.

सोलापूर-विजापूर विभागात NH५२ या २६ किलोमीटर रस्त्याचं बांधकाम चालू असतांना, यातील २६ किमीच्या रस्त्याच्या चौपदरी पट्ट्यातील सिंगल-लेन रोड फक्त २१ तासांमध्ये बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं गडकरी यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बांधकामाची जबाबदारी हैदराबाद च्या आयजेएम इंडिया या कंपनीकडे सोपवली होती अशी माहिती मिळतेय.

याशिवाय आणखी एका रेकॉर्ड चा उल्लेख करणं आवश्यक ठरतं ते म्हणजे, 

गडकरींच्या नेतृत्वात आसाम मधील जोरहाट ते माजुली असा ७ किलोमीटर अंतर असलेला ६००० हजार कोटींचा पूल फक्त ६८० कोटी रुपयांमध्ये बांधला जातोय. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत बोलतांना म्हणाले कि, सर्बानंद सोनोवाल जेंव्हा मुख्यमंत्री होते.  तेंव्हा गडकरी त्यांच्या प्रचाराला गेले होते. त्यांनी गडकरींच्या मागे लागून माजुली पूल बांधण्याची घोषणा करवली. गडकरी यांनी त्यांच्या हट्टापायी हा पूल बांधण्याची घोषणा तर केली पण ते नंतर दिल्लीला परतल्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, ज्या पुलाची तुम्ही घोषणा केली तो पूल बांधण्यासाठी ६००० कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. 

हे माहिती झाल्यानंतर मात्र गडकरी निराश झाले कि, एकाच पुलासाठी एवढ्या मोठ्या पैशांची तरतूद कशी काय होणार ? पण त्यावर त्यांनी सिंगापूर आणि मलेशयाच्या टेक्नोलॉजीचा वापर करत ६००० हजार कोटींचा पूल फक्त ६८० कोटी रुपयांमध्ये बांधला जाणार आणि त्याच काम एका वर्षात पूर्ण होण्याचा दावा देखील त्यांनी यावेळेस केला आहे.

थोडक्यात गडकरी म्हणतात तसे कि देशाचा विकास तेंव्हाच होतो जेंव्हा देशात रस्ते चांगले असतील. आता गडकरींने केलेले विश्वविक्रम पाहता ते खरंच २०२४ पर्यंत देशात अमेरिकेएवढ्याच प्रगत रस्त्यांचं जाळं निर्माण करतील अशी अपेक्षा तुम्हा-आम्हाला लागलीये..

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.