अमेरिकेच्या विकासाचं गणित गडकरींनी मांडलंय…
नितीन गडकरी, कित्येक मराठी माणसांचा आवडता नेता. इतका आवडता की, रस्ते वाहतूक मंत्री म्हणून केलेल्या कामामुळं गडकरींना नाव पडलं रोडकरी. तर गडकरी नुकतंच राज्यसभेत बोलताना म्हणाले, ‘२०२४ पर्यंत भारतातलं रस्त्यांचं जाळं आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं प्लॅनिंग केंद्र सरकारनं केलंय. ‘
आता भिडूनं ही बातमी ऐकली नेहमीप्रमाणं कट्ट्यावर. निम्मी लोकं म्हणली, ‘भारतात अमेरिकेसारखे रोड शक्यच नाही.’ निम्मी लोकं ‘मेरा देश बदल रहा है,’ गाणं म्हणत होती, त्यामुळं त्यांना आनंद झाला असावा असा अंदाज आम्ही बांधला.
आम्हाला एक प्रश्न पडला, आपल्याकडं प्रत्येक निवडणुकीआधी म्हणतात की, ‘अमेरिकेसारखे रस्ते बनवू.’ यामागं नेमकं काय कारण असेल?
तर गडकरींनी मांडलेलं गणित अमेरिकेच्या रस्त्यांमधून जातं…
तिथल्या रस्त्यांना भारी म्हणलं जातं, ते त्यांच्या इंटरस्टेट सिस्टीममुळं. अमेरिकेतले रस्ते तिकडच्या वेगवेगळ्या राज्यांना कनेक्ट करतात. या रस्त्यांचा इतिहास खोदायचा झाला, तर १८२० पासून मिळतोय. म्हणजे बघा १८२० मध्ये अमेरिकेत पहिला नॅशनल रोड बांधला गेला. रेल्वे आल्यावर रस्त्यांकडं दुर्लक्ष झालं खरं, मात्र १८९० मध्ये सायकल्समुळं अमेरिकेनं पुन्हा रस्त्यांकडं लक्ष दिलं (विषय गंभीर.) १९१३ मध्ये अमेरिकेनं न्यूयॉर्क ते सॅन फ्रॅन्सिस्को असा ३००० मैलांचा लिंकन हायवे बांधला.
पण अमेरिकेचे रोडकरी होते, प्रेसिडेंट ड्वाईट आईसेनहॉवर. आर्मीमध्ये असणाऱ्या आईसेनहॉवर यांनी १९१९ मध्ये आर्मीच्या गाड्या, युद्धाचं साहित्य या सगळ्यासकट वॉशिंग्टन डीसी ते सॅन फ्रॅन्सिस्को असा प्रवास केला आणि त्यासाठी त्यांना लागले ६२ दिवस. तेव्हाच त्यांनी ठरवलेलं की, देशाला संकटापासून वाचवायचं असेल आणि लय भारी बनवायचं असेल.. तर रोड कनेक्टिव्हीटी बापच पाहिजे.
प्रेसिडेंट आईसेनहॉवर यांनी फेडरल हायवे ॲक्ट १९५६ मंजूर केला आणि अमेरिकेतलं रस्त्यांचं जाळं विस्तारायला सुरूवात झाली.
त्यांनी ४७ हजार माईल्सच्या इंटरस्टेट सिस्टीम प्रोजेक्ट उभारायला घेतला आणि अमेरिकेत रोडक्रांती झाली. हे सगळं होण्यासाठी आईसेनहॉवर जितके उत्सुक होते, तितकीच उत्सुकता आणि आतुरता जनरल मोटर्स, ट्रिपल ए या गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांनाही होतीच.
आता या इंटरस्टेट सिस्टीमनं नेमकं काय केलं, तर अमेरिकेत क्रांती घडवली. ती कशी हे थोडं डीपमध्ये सांगायला पाहिजे.
तर झालं असं की, हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला तब्बल ३० पेक्षा जास्त वर्ष लागली. या कालावधीत अमेरिकेत अनेक आर्थिक स्थित्यंतरं घडली आणि त्यात महत्त्वाचा वाटा या रोडक्रांतीचाही होता. हे रस्ते उभारण्याचं काम होण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या दादा कंपन्यांनीही सुरुवातीपासून सहभाग घेतला होता. त्यांच्या गुंतवणुकीचं फळ त्यांना साहजिकच मिळालं. जसे चांगल्या दर्जाचे आणि लांब पल्ल्याचे रस्ते उभे राहिले, तशी आपसूकच गाड्यांची संख्या वाढली. १९१५ मध्ये सगळ्या अमेरिकेत मिळून फक्त ५ लाख गाड्या होत्या. पुढं १९५६ नंतर हा आकडा वाढतच गेला आणि सध्याच्या घडीला बाघायला गेलं तर अमेरिकेत प्रत्येक घरात किमान एक-दोन गाड्या आहेतच.
खोटं नाय भिडू, अमेरिकेत शिकायला गेलेल्या आमच्या मित्रानंही फोर व्हीलर घेतलीये. गडी इकडच्या ट्रॅफिकमध्ये अडकला की, तिथल्या रोडचं कौतुक करताना थांबत नाही.
या रस्त्यांच्या उभारणीमुळं अमेरिकेत उपनगरंही मोठ्या प्रमाणावर वाढली. आता हा विषय आपल्याला नवा नाही, कारण ‘आपल्या गावातून हायवे जाणार’ अशी नुसती घोषणा झाली की आपल्याकडच्या रस्त्यांना सोन्याचे भाव येतात. गावात पैशे, गाड्या आणि फॅशन येते, साहजिकच गावाचं रूपांतर हळूहळू उपनगरात होतं. तेच अमेरिकेत झालं, हे इंटरस्टेट रोडचं जाळं सगळ्या अमेरिकेत पसरलेलं असल्यानं सगळीकडेच उपनगरं वाढली.
या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टनं अमेरिकेची रचनाच बदलली. ठिकठिकाणी बोगदे आणि पूल आले. प्रवास आणि प्रवाशांचा विचार करुन रस्त्याच्या आजूबाजूला इमारती उभ्या राहिल्या, डोंगर जरा नेटकेपणानं पोखरले गेले.
मॅक्डोनाल्ड्सपासून सबवेपर्यंत…
जगाच्याच्या खाद्यसंस्कृतीवरही या इंटररेस्ट हायवेजचा मोठा प्रभाव आहे. चेष्टा नाय भिडू, एक्सप्लेन करतो थांबा. आता हायवे आहे म्हणल्यावर गाड्या पळणार आणि ड्रायव्हर, प्रवाशी लोकांना भूका लागणार. आपल्याकडे जसे ढाबे उभे राहिले, तसंच तिकडे मॅक्डोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग अशा कित्येक फूड ब्रॅंडच्या चेन्स उभ्या झाल्या. ज्यांचं मार्केट तिकडं उभं रराहिलं आणि हळूहळू सगळ्या जगात पसरलं. आजही आपल्यातली कित्येक जण भूक लागली म्हणून मॅक्डोनाल्ड्सचा रस्ता धरतातच.
रस्त्यांनी रेल्वेचं मार्केट खाल्लं…
वाचून थोडं आश्चर्य वाटतं, पण खरंच असं घडलं. रस्त्यांचं जाळं इतक्या वेगानं पसरलं होतं, की अमेरिकन सरकारनं रेल्वे मार्गांकडे काहीसं दुर्लक्ष केलं. रस्त्यांची कनेक्टिव्हीटी भारी असल्यानं लोकं आपली गाडीला स्टार्टर मारायची दणक्यात जिथं पाहिजे तिथं जायची. प्रवासाला लागणार वेळ काहीसा वाढत असला, तरी रस्त्यांमुळं प्रवास आपल्या मर्जीनं करायचं स्वातंत्र्य होतं.
अमेरिकेचं एकंदरीत अर्थकारण बदलण्यातही या रोड क्रांतीनं मोलाची भुमीका बजावली. रस्त्यांवर शॉपिंग मॉल उभे राहिले, हॉटेल चेन्स तयार झाल्या सोबतच ट्रॅव्हलिंग बिझनेस झपाट्यानं वाढला. एकमेकांना पूरक व्यवसाय तयार होऊ लागले. गाड्यांच्या संख्या वाढल्यानं इंधनाच्या उलाढालीचे आकडे सुपरफास्ट पळू लागले. सगळे रस्ते जोडलेले असल्यानं पार्सल बिर्सल पाठवायचं असलं, तर तेही सोपं आणि फास्टमध्ये होऊ लागलं.
वर सांगितलेले मुद्दे जोडून पाहिलेत, तर अमेरिका सुपरपॉवर बनण्यात रस्त्यांची भूमिका कशी मोलाची आहे, हे आपल्या सहज लक्षात येतंय.
दुसऱ्या बाजूला या रोडक्रांतीमुळं नुकसानही झालं. कित्येक गावांचं शहरीकरण झालं. कित्येक नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं. शहराबाहेरच्या मोकळ्या जागा कमी झाल्या आणि मुळात म्हणजे शहर आणि गावातली दरीही पुसली गेली. लोकांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलनंही केली, मात्र शहरीकरणाचा रेटा आणि व्यावसायिक व विकासाच्या गणितांपुढं त्यांची डाळ शिजली नाही.
थोडक्यात काय, तर रस्ते आले आणि अमेरिका घडली आणि बिघडलीही. या घडण्याचं प्रमाण जास्त असल्यानं भारताच्या राजकारण्यांनाही आपल्याकडचे रस्ते अमेरिकन स्टाईलनं करायचे वेध लागलेत. हे गणित मांडणारे गडकरी काय पहिलेच नेते नाहीत, याआधीही लय नेत्यांनी मांडलंय… गडकरी २०२४ पर्यंत गणित सोडवून दाखवतात हे तेवढं पाहावं लागेल.
हे ही वाच भिडू:
- अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले,” पदक हीच मुलगी जिंकणार “
- जग्गू दादा म्हणाला हे काम तर फक्त गडकरीच करू शकतात
- लालबहादूर शास्त्रींनी नियमात बदल केले आणि कोकणातले रस्ते काँक्रीटचे झाले