श्रीधर नाईक प्रकरणात राणे निर्दोष सुटले पण पुढं जाऊन त्यांना राजकीय फटका बसला

आजचा विषय आहे नारायण तातू राणेंचा. श्रीधर नाईक प्रकरणात राणे निर्दोष सुटले पण पुढं जाऊन त्यांना राजकीय फटका कसा बसला याचाच हा विषय.

हा जो विषय आहे तो एखाद्या ‘खून का बदला खून’ अशा पठडीतल्या सिनेमाला सुद्धा मागे टाकेल असा आहे. म्हणजे ज्या काँग्रेसच्या श्रीधर नाईकांच्या खुनाचा आरोप राणेंवर होता त्याच श्रीधर नाईकांच्या पुतण्याने म्हणजेच वैभव नाईकांनी राणेंच्या बालेकिल्ल्यातच राणेंना धोबीपछाड देत जुने उट्टे काढले.

तर ह्या स्टोरीला सुरुवात होते १९९० सालात. शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा रोवण्याचं काम नारायण राणे यांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या खेळानं विरोधकांच नव्हे तर स्वपक्षीय यांना सुद्धा जेरीस आणणारा मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे नारायण राणे. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकापासून ते बेस्ट चेअरमन पर्यंत त्यांची झेप पाहून १९९० साली बाळासाहेबांनी राणेंवर सिंधुदुर्गची जबाबदारी स्वरूप सोपवली. नारायण राणे यांनी पहिल्याच दमात आमदारकी जिंकली आणि कोकणात आपल्या समर्थकांसह साम्राज्य निर्माण केलं.

त्याच काळात कणकवलीत एक युवा नेतृत्व उदयाला येत होतं. काँग्रेसच्या श्रीधर नाईक यांचं. श्रीधर नाईक काँग्रेसचे नेते होते. कोकणात समाजवादी आणि काँग्रेस या पक्षांचा जोर होता. मात्र शिवसेना जशी वाढली तसा तिचा जोर कोकणातही वाढला.

२२ जून १९९१ रोजी भरदुपारी श्रीधर नाईक यांची मुंबईच्या भाडोत्री गुंडांकरवी हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा तेव्हा रंगली. या खुनाची प्रचंड चर्चा त्यावेळी झाली होती कारण कोकणच्या भूमित असा प्रकार तोपर्यंत तरी घडला नव्हता. पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती.

राजकीय हत्येतून कोकणातली  लाल माती अजूनच लाल झाली. यामध्ये आऱोपपत्र दाखल झालं ते १३ जणांच्या विरोधात. यातलं महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे नारायण राणे.

नारायण राणेंनी हे आरोप फेटाळले. मात्र सुमारे पाच वर्षे हा खटला सुरू होता. श्रीधर नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वारंवार हे सांगितलं की ही हत्या राजकीय वैमनस्यातूनच झाली आहे. सत्र न्यायायसमोर हा खटला सुरू होता. मार्च १९९७ मध्ये या खटल्याचा निकाल लागला १३ पैकी ४ जणांना शिक्षा झाली आणि ९ जणांची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. या नऊ जणांमध्ये नारायण राणे होते. नारायण राणे सांगतच होते की माझा या प्रकरणाशी संबंध नाही.

श्रीधर नाईक यांची हत्या करणाऱ्या आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ही वैभव नाईक यांच्या जिव्हारी लागली. लहान वयातच आपल्या काकाची हत्या पाहणारे वैभव नाईक यांच्या मनात राजकीय दहशतीविरुद्ध बंड आणि असंतोषाचा अग्नी भडकला होता. अशातच ज्या राजकारणाने आपल्या काकाचा जीव घेतला त्याच धगधगत्या राजकारणात सक्रिय होण्याचा संकल्प वैभव नाईक यांनी केला. पण नाईक कुटुंबीयांनी या सगळ्या प्रकारानंतर काही काळ राजकारणापासून दूर राहणंच पसंत केलं.

एव्हाना पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं.

२००५ साली नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविरोधात आपला राग व्यक्त करत सेनेत आपली घुसमट होते आहे सांगून शिवसेना सोडली. शिवसेनेने राणेंवर कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली. नारायण राणेंनी त्यानंतर थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं असं नारायण राणेंनीच वारंवार सांगितलं आहे. मात्र त्यांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना महसुलमंत्री पद देण्यात आलं.

मालवणमध्ये पोट निवडणूक झाली. त्यामध्ये नारायण राणे विजयी झाले. शिवसेनेचं डिपॉझिट जप्त झालं इतका दारूण पराभव झाला. नारायण राणेंच्या रूपाने काँग्रेसला पहिल्यांदाच इतका मोठा विजय कोकणात मिळाला. या सगळ्या काळात झालं असं की श्रीधर नाईक परिवार जे कट्टर काँग्रेसी होत ते शिवसेनेत गेलं. आणि राणे सेनेतून काँग्रेस मध्ये आले होते.

या नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला.

शिवसेना विरूद्ध काँग्रेस हा संघर्ष तसाच राहिला पण राजकीय नेत्यांचे संदर्भ बदलले. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले आणि नाईक काँग्रेसमधून शिवसेनेत. २००९ मध्ये वैभव नाईक यांना नारायण राणेंच्या विरोधात पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली. यात वैभव नाईक यांचा पराभव झाला आणि राणे निवडून आले. मात्र त्या निवडणुकीत वैभव नाईक यांना ४८ हजार मतं पडली होती.

२००९ मध्ये नारायण राणे यांचा काँग्रेसमध्येही संघर्ष सुरू झाला होता. ते जेव्हा काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यांचं ते स्वप्न स्वप्नच राहिलं. २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २००९ ला विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनाच मुख्यमंत्री करण्यात आलं.

या सगळ्याचा परिपाक नाराय़ण राणे नाराज झाले आणि त्यांनी हायकमांडवरच तोफ डागायला सुरुवात केली. काँग्रेसने यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. काही काळासाठी त्यांना निलंबितही केलं. हा सगळा काळ नारायण राणे यांचा काँग्रेसमधील संघर्षाचा काळ मानला जातो. नारायण राणे यांचं या काळात कोकणाकडे दुर्लक्ष झालं. यातून संधी साधली ती वैभव नाईकांनी.

त्यांनी कोकणात आपला जम बसवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला. नारायण राणेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणं सोपं नव्हतं पण वैभव नाईक यांनी ते करून दाखवलं. पुढे २०१४ मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये जो राणेंचा पराभव झाला त्याचा संदर्भ थेट श्रीधर नाईक प्रकरणाशी अनेकांनी जोडला. आज ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरूद्ध नाईक या संघर्षाची चर्चा होते.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.