एकेकाळच्या दोन कट्टर शिवसैनिकांना नारळ देणार असल्याची चर्चा का होतेय ?

शिवसेनेत पक्ष शिस्तीला प्रचंड महत्त्व आहे. पक्ष शिस्त मोडणाऱ्या किंवा पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्या व्यक्तीला नेतृत्वाबरोबरच शिवसैनिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. रामदास कदम हे त्यातील ताजं उदाहरण ठरण्याची शक्यता आहेच पण त्यांच्यासोबत अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अनंत गीते.

कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास कदम आणि अनंत गीतेंना शिवसेनेतून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.

पण या चर्चा रंगण्यामागे काही कारण आहेत. सुरुवात रामदास कदम यांच्यापासून करु.

बाळासाहेब ठाकरे यांच्या याच आक्रमतेकडे कांदिवलीमधील हनुमान नगर झोपडपट्टीमधला एक युवक आकर्षित झाला होता. तळागाळात संघटनेचं काम करायचा. त्याच्याकडे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच आक्रमकता होती, बोलण्यात शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जाणवणारी नैसर्गिक लकब होती. हाच तरुण पुढे शिवसेनेचा दोन नंबरचा नेता बनला. त्यांचं नाव रामदास कदम. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.

बाळासाहेबानंतर रामदास कदम हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ असायचे. ठाकरे यांच्यासोबत खास राजकीय संबंध असलेल्या नेत्यांमध्ये कदम हे नाव महत्त्वाचे होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कदम यांचे वजन आणखी वाढले. त्यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरणमंत्री होते.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून खासकरून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कदम हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून दुरावले.

गेल्या वर्षी मुंबईत विधीमंडळाच्या अधिवेशनात कदम यांनी गृहविभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली होती. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले गृहविभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा जाहीर आरोप त्यांनी विधानसभेत केला होता.

ते कमी काय म्हणून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात माहितीची रसद पुरवल्याचा आरोप कदम यांच्यावर झाला. तशा प्रकारची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. 

सोमय्यांना माहिती पुरविल्याच्या आरोपामुळे, पक्षविरोधी कृती केल्याच्या कारणावरुन कदम यांना शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात प्रवेश मिळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली. पण, सोमय्यांना माहिती पुरविल्याचे आरोप फेटाळत प्रकृती ठीक नसल्याने मी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका कदमांनी घेतली होती.

मात्र दसरा मेळाव्यानंतर रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनर झळकावण्यात आले.

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक…आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बापच असतो’

या अशयाचा मजकूर असलेला बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आला. शिवसेना पक्षाचा बॅनरवर उल्लेख नसला तरी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे या बॅनरवर फोटो लावण्यात आले होते.

यापार्श्वभूमीवर रामदास कदमांचा विधान परिषदेतून पत्ता कट करून कदमांच्या जागी शिवसेना नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्या. यापार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून आपल्याला पक्षात दुर्लक्षित केले जात असल्यान आपण नाराज असल्याचं  रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवलं. त्या पत्रात ते म्हणतात,

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून ज्यांना मंत्रिपदे मिळाली, ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत. शिवसेनेतील काही मंत्री आपल्याला बाजूला करत आहेत. शिवसेनेच्या गोटातून मंत्री झालेलेच आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

काही मंत्र्यांच्या नावांचादेखील पत्रात उल्लेख आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावाही आमदार कदम यांनी पत्रात केला आहे. पण त्यांच्या या पत्रामुळे शिवसेना नेतृत्व रामदास कदमांवर नाराज असून कदमच अडचणीत आल्याचं म्हंटल जातंय.

आता अनंत गीते यांचं बघूया…त्यांना नारळ का मिळू शकतो ? 

१९९६ साली अनंत गीते रत्नागिरी मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. या निवडणुकीनंतर गीते यांना लोकसभा निवडणुकांमध्ये सलग सहा वेळा विजय मिळत गेला. त्याचवेळेस त्यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाली. याकाळात शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदही त्यांना मिळालं. त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा पदभार आला आणि ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले.

कोकणातले नेते व कट्टर शिवसैनिक असलेल्या अनंत गीते यांच्यावर बाळासाहेबांना प्रचंड विश्वास होता. केंद्रात अडलेली कामे राज्याची मार्गी लागतील, पक्षाला देखील फायदा होईल म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

२००९ साली रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांनी ए. आर. अंतुले यांचा पराभव केला. २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा पराभव केला होता. मात्र गीते यांना यावेळेस अगदी निसटत्या मतांनी विजय मिळाला होता. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांना अवजड उद्योगमंत्री म्हणून स्थान मिळाले. २०१९ साली मात्र अनंत गीते यांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी पराभव केला.

पुढं राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. त्यामुळे आता आपण आपल्या मतदारसंघात काय भूमिका घ्यायची या यक्षप्रश्नात पडलेल्या गीतेंनी

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच

असं म्हणत खळबळ उडवून दिली. पण शिवसेनेनी मात्र त्यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतली. गीते यांच्या वक्तव्याविषयी मला काही माहीत नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं संजय राऊत म्हंटले. गीतेंच्या या अशा भूमिकेमुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा झडू लागल्या.

त्यामुळे आता एकेकाळी कट्टर मानल्या जाणाऱ्या या शिवसैनिकांबाबत शिवसेना नेतृत्व काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहील आहे. निदान निदान या नेत्यांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं तरी निश्चितच लक्ष आहे. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.