ज्यांनी आपल्या आवाजाने बातमीत जीव आणला ते ‘कमाल खान’ गेले !

‘कमाल’ माणूस गेला….

उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे आज पहाटे निधन झाले. लखनौ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशी माहिती मिळतेय, त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले….

अगोदर अनेकांना वाटलं ही अफवा असावी, कारण कालच रात्री लाईव्ह चर्चेत त्यांना आपल्यातल्या अनेकांनी ऐकलं होतं. पण हि बातमी आली अन सर्वांनाच धक्का बसला….

कमाल खान यांचा विवाह देखील पत्रकार असलेल्या रुचि कुमार यांच्यासोबत झाला होता. बटलर पॅलेस, लखनौ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. 

त्यांचं वैशिष्ट्ये म्हणजे……

उत्तम रिपोर्टिंग, विशिष्ट लखनवी अंदाजाचे हिंदी, त्यांचा लहेजा, शांतपणे आणि विस्ताराने बातमी सांगण्याची पद्धत, आणि त्यांचा अभ्यास, राजकीय आकलन अनेक छोट्या-मोठ्या पत्रकारांना शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.  रिपोर्टच्या शेवटी शेर शायरी आणि मंडल ते कमंडल असा प्रवास पाहिलेल्या उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ३० वर्षे अगदी निर्भीडपणे रिपोर्टिंग करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

देशाच्या अन राज्याच्या राजकारण आणि समाजकारणाची उत्तम जाण असलेले पत्रकार, प्रत्येक घडामोडींचा व्यापक विचार करत असायचे. त्यांच्या बातमीत प्रत्येक विषयाबाबत खूप संदर्भ असायचे. अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातही सोशल मीडियावर उमटत आहेत.

आधीच पत्रकारितेला वाईट दिवस ….अन त्यात ‘कमाल’ यांच्या जाण्याने मोठं नुकसान झालेले आहे.

त्यांची पत्रकारितेतील कारकीर्द……

कमाल खान हे १९९५ च्या जानेवारीपासून NDTV समूहासोबत कार्यरत आहेत आणि आता U.P आणि उत्तराखंड राज्यांचे प्रभारी होते…तसेच ते लखनौ येथील निवासी संपादक होते. 

कमल खान यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी रशियातील मॉस्को विद्यापीठात रशियन भाषा आणि भाषाशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी रशियन दुभाषी म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी टाईम्स ग्रुप ‘नवभारत टाइम्स’च्या हिंदी दैनिकात काम केलं आहे. 

पत्रकारांचा सर्वोच्च सन्मान ….राम नाथ गोयंका पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

कमाल खान यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक रामनाथ गोएंका पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने स्थापित केलेला हिंदी पत्रकारितेतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजेच गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानेही भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना सर्वोत्कृष्ट हिंदी टीव्ही रिपोर्टर म्हणून आणि पर्यावरण जागृतीवरील सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी एनटी पुरस्कार मिळाला आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल कमल यांना सार्क लेखक आणि साहित्य महासंघाकडून आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

अयोध्येच्या जागेचा निकाल लागला तेंव्हाची एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत एकदा सांगितली होती,

२०१० मध्ये अयोध्येचा जागेचा निकाल लखनऊ उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावेळी कमाल खान हे तिथे उपस्थित होते. न्यायालयाच्या निकालानंतर जेव्हा त्यांनी शहरातही परिस्थिती कशी आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुमसान रस्त्यावर पोलीस आणि माध्यम प्रतिनिधी वगळता कोणीही उपस्थित नव्हते, पण शहरातील परिस्थिती कधीही चिघळू शकते हा विचार डोक्यात ठेवून ऑफिसने कमल खान याना रिपोर्टींग ला गेलात तर त्यांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये म्हणून त्यांनी ऑफिसने सुरक्षा म्हणून बुलेटप्रूफ जॅकेट आणि बुलेटप्रूफ हेल्मेट दिल्याची आठवण त्यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती..

त्यांच्या पत्रकारितेच्या सलाम करत अनेक मोठ्या नेत्यांनी आणि पत्रकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहवत ट्विट केले आहे…

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर नेत्यांनीही कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी म्हणाले की, मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे पत्रकारितेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. कमाल खान हे चौथे स्तंभ आणि निःपक्षपाती पत्रकारितेचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. 

तर समाजवादी पक्षाच्या वतीने ट्विट करून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

समाजवादी पक्षाने ट्विट करून लिहिले की, एनडीटीव्हीचे ज्येष्ठ प्रतिनिधी जनब कमाल खान साहब यांचे निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. शोकाकुल परिवारातील सदस्यांप्रती हार्दिक संवेदना, मनःपूर्वक संवेदना.

प्रियांका गांधी यांनी देखील ट्विट केले आहे..

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, “ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीत अनेक गोष्टींची आम्ही चर्चा केल्या. पत्रकारितेत त्यांनी सत्य मूल्ये जिवंत ठेवली. कमाल खान यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आणि विनम्र श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली.

 

कमाल खान हे त्याच्या उत्कृष्ट रिपोर्टिंगसाठी ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीही ते उत्तर प्रदेश निवडणुकीचे वार्तांकन करत होते…

 

Leave A Reply

Your email address will not be published.